[1] हे परमेश्वरा, माझे ऐक, आणि मला उत्तर दे, कारण मी दीन आणि दरिद्री आहे.
[2] माझे रक्षण कर, कारण मी तुझा निष्ठावंत आहे; हे माझ्या देवा, तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सेवकाचे रक्षण कर.
[3] हे प्रभू, माझ्यावर दया कर, कारण मी दिवसभर तुला हाक मारतो.
[4] हे प्रभू, आपल्या सेवकाचा जीव आनंदित कर, कारण मी आपला जीव वर तुझ्याकडे लावतो.
[5] हे प्रभू, तू उत्तम आहेस आणि क्षमा करण्यास तयार आहेस, आणि जे सर्व तुला हाक मारतात त्यांना तू महान दया दाखवतोस.
[6] हे परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेला कान दे; माझ्या काकुळतीच्या वाणीकडे लक्ष दे.
[7] हे परमेश्वरा, मी आपल्या संकटाच्या दिवसात तुला हाक मारीन, कारण तू मला उत्तर देशील.
[8] हे प्रभू, देवांमध्ये तुझ्याशी तुलना करता येईल असा कोणीही नाही. तुझ्या कृत्यासारखी कोणीतीही कृत्ये नाहीत.
[9] हे प्रभू, तू निर्माण केलेली सर्व राष्ट्रे येतील आणि तुझ्यापुढे नमन करतील. ते तुझ्या नावाला आदर देतील.
[10] कारण तू महान आहेस व तू आश्चर्यकारक गोष्टी करतोस; तूच फक्त देव आहेस.
[11] हे परमेश्वरा, मला तुझे मार्ग शिकव, मग मी तुझ्या सत्यात चालेन. तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर.
[12] हे प्रभू, माझ्या देवा, मी अगदी आपल्या मनापासून तुझी स्तुती करीन; मी सर्वकाळ तुझ्या नावाचे गौरव करीन.
[13] कारण माझ्यावर तुझी महान दया आहे; तू माझा जीव मृत्यूलोकापासून सोडवला आहेस.
[14] हे देवा, उद्धट लोक माझ्याविरूद्ध उठले आहेत. हिंसाचारी लोकांची टोळी माझा जीव घेण्यास पाहत आहे. त्यांना तुझ्यासाठी काही आदर नाही.
[15] तरी हे प्रभू, तू दयाळू आणि कृपाळू देव आहेस. मंदक्रोध, आणि दया व सत्य यामध्ये विपुल आहेस.
[16] तू माझ्याकडे वळून माझ्यावर कृपा कर; तू आपल्या दासास आपले सामर्थ्य दे; आपल्या दासीच्या मुलाचे तारण कर.
[17] हे परमेश्वरा, तुझ्या अनुग्रहाचे चिन्ह दाखव. कारण तू माझे साहाय्य व सांत्वन केले आहे. मग माझा द्वेष करणाऱ्यांनी ते पाहावे, आणि लज्जित व्हावे.