Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 1:57

[1] हे परमेश्वरा, दावीदाकरता त्याच्या सर्व दुःखांची आठवण कर.

[2] त्याने परमेश्वराकडे कशी शपथ वाहिली, त्याने याकोबाच्या समर्थ प्रभूला कसा नवस केला, याची आठवण कर.

[3] तो म्हणाला “मी आपल्या घरात किंवा मी आपल्या अंथरुणात जाणार नाही.

[4] मी आपल्या डोळ्यांवर झोप किंवा आपल्या पापण्यास विसावा देणार नाही.

[5] परमेश्वरासाठी स्थान, याकोबाच्या सर्वसमर्थ देवासाठी निवासमंडप सापडेपर्यंत मी असेच करीन.”

[6] पाहा, आम्ही याबद्दल एफ्राथात ऐकले; आम्हास तो जारच्या रानात सापडला.

[7] आम्ही देवाच्या निवासमंडपात जाऊ; आम्ही त्याच्या पदासनापाशी आराधना करू आणि म्हणू.

[8] हे परमेश्वरा, ऊठ; तू आपल्या सामर्थ्याच्या कोशासह आपल्या विश्रांतीस्थानी ये,

[9] तुझे याजक नितीमत्तेचे वस्रे पांघरोत; तुझे विश्वासू आनंदाने जयघोष करोत.

[10] तुझा सेवक दावीदाकरिता, तू आपल्या अभिषिक्त राजापासून निघून जाऊ नकोस.

[11] परमेश्वराने विश्वसनीय दावीदाजवळ शपथ वाहिली आहे; तो त्याच्या शपथेपासून माघार घेणार नाही, मी तुझ्या वंशातून तुझ्या राजासनावर एकाला बसवीन.

[12] जर तुझ्या मुलांनी माझा करार पाळला, आणि मी त्यांना शिकवलेले नियम पाळले, तर त्यांची मुलेसुद्धा तुझ्या राजासनावर सर्वकाळ बसतील.

[13] खचित परमेश्वराने सियोन निवडून घेतली आहे; त्याच्या वस्तीसाठी त्याने इच्छा धरली आहे.

[14] “ही जागा सर्वकाळ माझ्या विसाव्याची आहे; मी येथे राहीन, कारण माझी इच्छा आहे.

[15] मी तिला विपुलतेने अन्नसामग्रीचा आशीर्वाद देईन; मी तिच्या गरीबांना भाकरीने तृप्त करीन.

[16] मी तिच्या याजकांना तारणाचे वस्त्र नेसवीन; तिचे भक्त आनंदाने मोठ्याने जयघोष करतील.

[17] तेथे दावीदाच्या शिंगाला अंकुर फुटेल असे मी करीन; तेथे मी आपल्या अभिषिक्तासाठी दिवा ठेविला आहे.

[18] मी त्याच्या शत्रूंला लाजेचे वस्रे नेसवीन, परंतु त्याचा मुकुट चमकेल.”

स्तोत्रसंहिता — Chapters