Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 2:32

[1] मी सर्व समयी परमेश्वरास स्तुती देईन. माझ्या मुखात नेहमी त्याची स्तुती असेल.

[2] मी परमेश्वराची स्तुती करणार, विनम्र ऐकतील आणि आनंद करतील.

[3] तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वरास स्तुती द्या. आपण एकत्र त्याच्या नावाला उंचावू या.

[4] मी परमेश्वराकडे मदतीसाठी गेलो आणि त्याने मला उत्तर दिले. आणि त्याने मला माझ्या सर्व भयांवर विजय दिला.

[5] जे त्याच्याकडे पाहतील ते चकाकतील, आणि त्यांची मुखे कधीच लज्जीत होणार नाहीत.

[6] या पीडलेल्या मनुष्याने आरोळी केली, आणि परमेश्वराने त्याचे ऐकले आणि त्यास त्याच्या सर्व संकटातून सोडवले.

[7] परमेश्वराचे भय धरणाऱ्याभोवती तो छावणी करतो. आणि त्यास वाचवतो.

[8] परमेश्वर किती चांगला आहे, ह्याचा अनुभव घेऊन पाहा. धन्य तो पुरुष जो त्याच्याठायी आश्रय घेतो.

[9] जे तुम्ही त्याचे निवडलेले आहा, ते तुम्ही परमेश्वराचे भय धरा. त्याचे भय धरणाऱ्यांस कशाचीच कमतरता भासत नाही.

[10] तरुण सिंहाना देखील उणे पडते आणि ते भुकेले होतात, परंतु जे परमेश्वरास शोधतात त्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टींची उणीव पडणार नाही.

[11] मुलांनो माझे ऐका आणि मी तुम्हास परमेश्वराचे भय कसे धरावे हे शिकवीन.

[12] सुख पाहण्यासाठी आयुष्याची इच्छा धरतो आणि दिवसाची आवड धरतो तो मनुष्य कोण आहे?

[13] तर वाईट बोलण्यापासून आवर, आणि तुझे ओठ खोटे बोलण्यापासून आवर.

[14] वाईट कृत्ये करणे सोडून दे आणि चांगली कृत्ये कर. शांतीचा शोध कर आणि तिच्यामागे लाग.

[15] परमेश्वराची दृष्टी नितीमानांवर आहे, त्याचे कान त्याच्या आरोळीकडे असतात.

[16] परंतु परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्याविरुध्द आहे. तो त्यांची आठवण पृथ्वीतून नाश करतो.

[17] नितीमान आरोळी करतो आणि परमेश्वर ते ऐकतो, आणि तो तुम्हास तुमच्या सर्व संकटातून वाचवेल.

[18] जे हृदयाने तुटलेले आहेत, त्यांच्याजवळ परमेश्वर आहे. आणि तो खिन्न झालेल्या आत्म्यास तारतो.

[19] नितीमानाचे कष्ट पुष्कळ आहेत, परंतू परमेश्वर त्या सर्वांवर त्यांना विजय मिळवून देईल.

[20] परमेश्वर त्याच्या सर्व हाडाचे रक्षण करेल. त्यांतले एकही हाड तो मोडू देणार नाही.

[21] परंतु दुष्टाई दुष्टाला मारुन टाकील, जो नितीमानाचा द्वेष करतो तो दोषी ठरवला जाईल.

[22] परमेश्वर त्याच्या सेवकाच्या आत्म्यांना तारेल. त्याच्यात आश्रय घेणारा कोणीही दोषी ठरवला जाणार नाही.

स्तोत्रसंहिता — Chapters