Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 2:41

[1] हे देवा, तू आम्हास सर्वकाळ का सोडून दिले आहेस? आपल्या कुरणातील कळपांवर तुझा कोपाग्नि का भडकत आहे?

[2] तू प्राचीनकाळी जी मंडळी विकत घेतली, जिला तू आपले वारस होण्याकरता खंडणी भरून सोडविले तिचे, व ज्या सीयोन पर्वतावर तू वस्ती केली त्याची आठवण कर.

[3] पूर्णपणे विध्वंस झालेल्याकडे या, शत्रूने सर्व पवित्रस्थानाचे कसे नुकसान केले आहे ते पहा.

[4] तुझ्या सभास्थानात तुझे शत्रू गर्जना करीत आहेत; त्यांनी युद्धाची झेंडे उभारले आहेत.

[5] जसे दाट झाडीवर कुऱ्हाडीने छिन्नविछीन्न करणाऱ्या मनुष्याप्रमाणे ते त्यांना दिसले.

[6] त्यांनी कुऱ्हाडीने आणि हातोडीने सर्व कोरीव काम तोडून आणि फोडून टाकले.

[7] त्यांनी तुझ्या पवित्रस्थानाला आग लावली; जेथे तू राहतो त्याचे पावित्र्य भ्रष्ट केले, धुळीस मिळविले.

[8] ते आपल्या अंतःकरणात म्हणाले, आपण ह्यांचा नायनाट करून टाकू. त्यांनी देशात असलेली देवाची सर्व सभास्थाने जाळून टाकली आहेत.

[9] आम्हास देवाकडून कोणतेही चिन्ह मिळाले नाही, कोणी संदेष्टा उरला नाही; असे कोठवर चालेल हे जाणणारा आमच्यामध्ये कोणी नाही.

[10] हे देवा, शत्रू किती वेळ माझा अपमान करील? शत्रू तुझ्या नावाची निंदा सर्वकाळ करणार काय?

[11] तू आपला हात, आपला उजवा हात का मागे आवरून धरतोस? तू आपला उजवा हात आपल्या अंगरख्यातून काढ आणि त्यांना नष्ट कर?

[12] तरी देव, प्राचीन काळापासून माझा राजा आहे, पृथ्वीवर तारणारा तो आहे.

[13] तू आपल्या सामर्थ्याने समुद्र दुभागला; तू समुद्रातील प्रचंड प्राण्यांची मस्तके पाण्यात फोडली.

[14] तू लिव्याथानाचे मस्तक ठेचले; रानात राहणाऱ्यास तो खाऊ घातला.

[15] तू झरे आणि प्रवाह फोडून उघडले; तू वाहणाऱ्या नद्या कोरड्या केल्या.

[16] दिवस तुझा आहे आणि रात्रही तुझीच आहे; तू सूर्य आणि चंद्र त्यांच्या जागी ठेवले.

[17] तू पृथ्वीच्या सर्व सीमा ठरविल्या आहेत; तू उन्हाळा आणि हिवाळा केलास.

[18] हे परमेश्वरा, वैऱ्याने तुझ्याकडे अपमान भिरकावला आहे; आणि मूर्ख लोकांनी तुझ्या नावाची निंदा केली आहे त्याची आठवण कर

[19] तू आपल्या कबुतराचा जीव वन्यपशूच्या स्वाधीन करू नकोस. आपल्या दडपशाहीचे जिवन सर्वकाळ विसरू नकोस.

[20] तू आपल्या कराराची आठवण कर, कारण पृथ्वीवरील काळोखी प्रदेश पूर्ण हिंसाचाराची ठिकाणे आहेत.

[21] दडपलेल्यास लज्जित होऊन मागे फिरू देऊ नको; गरीब आणि दडपलेले तुझ्या नावाची स्तुती करोत.

[22] हे देवा, ऊठ, आपल्या सन्मानाचे समर्थन स्वतःच कर; मूर्ख दिवसभर तुझा अपमान करत आहे याची आठवण कर.

[23] तुझ्या शत्रूंचा आवाज विसरू नको, किंवा तुझा विरोध करणाऱ्यांचा गोंगाट एकसारखा वर चढत आहे.

स्तोत्रसंहिता — Chapters