Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 1:40

[1] हे देवा, माझ्यावर दया कर, कारण कोणीतरी मला गिळून टाकण्याची इच्छा करतो; दिवसभर तो माझ्याशी लढतो आणि अत्याचार करतो.

[2] माझे शत्रू दिवसभर मला गिळून टाकण्याची इच्छा करतात; कारण उद्धटपणे माझ्याविरूद्ध लढणारे अनेक आहेत.

[3] मी जेव्हा घाबरतो, तेव्हा मी तुझ्यावर भरंवसा ठेवीन.

[4] मी देवाच्या मदतीने, त्याच्या वचनाची स्तुती करीन, मी देवावर भरवसा ठेवला आहे; मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करील?

[5] दिवसभर ते माझ्या शब्दांचा विपरित अर्थ करतात; त्यांचे सर्व विचार माझ्याविरूद्ध माझ्या वाईटासाठी असतात.

[6] ते एकत्र जमतात, ते लपतात आणि माझ्या पावलावर लक्ष ठेवतात, जसे ते माझा जीव घेण्यासाठी वाट पाहतात.

[7] त्यांना अन्याय करण्यापासून निसटून जाऊ देऊ नको. हे देवा, तुझ्या क्रोधाने त्यांना खाली आण.

[8] तू माझ्या भटकण्याची ठिकाणे मोजली आहेत आणि माझे अश्रू आपल्या बाटलित ठेवली आहेत; तुझ्या पुस्तकात त्याची नोंद नाही का?

[9] मी तुला हाक मारीन त्यादिवशी माझे शत्रू मागे फिरतील; हे मला माहित आहे, देव माझ्या बाजूचा आहे.

[10] मी देवाच्या साहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन. मी परमेश्वराच्या साहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन.

[11] मी देवावर भरंवसा ठेवीन; मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करील?

[12] हे देवा, तुझे नवस पूर्ण करण्याचे कर्तव्य माझ्यावर आहे; मी तुला धन्यवादाची अर्पणे देईन.

[13] कारण तू माझे जीवन मृत्यूपासून सोडवले आहे; तू माझे पाय पडण्यापासून राखले, यासाठी की, मी जीवनाच्या प्रकाशात देवापुढे चालावे.

स्तोत्रसंहिता — Chapters