[1] हे परमेश्वरा, तुझ्या सामर्थ्यात राजा हर्ष करतो! तू दिलेल्या तारणात तो किती मोठ्या मानाने आनंद करतो!
[2] त्याच्या हृदयाची इच्छा तू पूर्ण केली आहेस. आणि त्याच्या ओठांची विनंती तू अमान्य केली नाही.
[3] कारण तो तुजकडे मोठे आशीर्वाद आणतो. तू त्याच्या डोक्यावर शुद्ध सोन्याचा मुकुट चढवतो.
[4] त्याने तुझ्याकडे जीवनाची मागणी केली आणि तू त्यास न संपणारे आयुष्य दिलेस.
[5] तुझ्या विजयामुळे त्याचे गौरव थोर आहे. तू त्यास ऐश्वर्य व वैभव बहाल केलेस.
[6] कारण तू त्यास सर्वकाळचा आशीर्वाद दिला आहे; तू तुझ्या समक्षतेत त्यास हर्षाने आनंदित करतोस.
[7] कारण राजाचा परमेश्वरावर विश्वास आहे, परात्पराच्या प्रेमदयेने तो कधीही ढळणार नाही.
[8] तुझा हात तुझ्या सर्व शत्रूला पकडणार. तुझा उजवा हात जे तुझा हेवा करतात त्यांना पकडेल.
[9] तुझ्या क्रोधसमयी तू त्यांना जळत्या भट्टीत जाळून टाकशील. परमेश्वर त्याच्या क्रोधसमयी त्यांचा नाश करणार, आणि त्याचा अग्नी त्यांना खाऊन टाकणार.
[10] तू त्यांच्या संतानांचा या पृथ्वीवरुन नाश करशील.
[11] कारण, त्या लोकांनी तुझ्याविरूद्ध वाईट योजिले, त्यांनी अशी योजना आखली जी त्यांच्याने यशस्वी झाली नाही.
[12] कारण तू त्यांना त्यांची पाठ दाखवावयास लावशील. तू आपले धनुष्य त्यांच्यावर चालवण्यास सज्ज करशील.
[13] परमेश्वरा तू आपल्या नावाने उंचावला जावो, आम्ही गाऊ व तुझ्या सामर्थ्याची स्तुती करू.