Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 1:47

[1] मी परमेश्वरावर प्रेम करतो कारण तो माझी वाणी आणि माझ्या विनंत्या दयेसाठी ऐकतो.

[2] कारण तो माझे ऐकतो, म्हणून मी जिवंत आहे तोपर्यंत मी त्यास हाक मारीन.

[3] मृत्यूचे दोर माझ्याभोवती आवळले, आणि मला अधोलोकांच्या यातना झाल्या, संकट व क्लेश मला झाले.

[4] नंतर मी परमेश्वराच्या नावाचा धावा केला, “हे परमेश्वरा, मी तुला विनंती करतो, मला वाचव.”

[5] परमेश्वर कृपाळू आणि न्यायी आहे; आमचा देव कनवाळू आहे.

[6] परमेश्वर भोळ्यांचे रक्षण करतो; मी दीनावस्थेत होतो तेव्हा त्याने माझे तारण केले.

[7] हे माझ्या जिवा तू आपल्या विश्रामस्थानी परत ये; कारण परमेश्वराने तुझ्यावर पुष्कळ उपकार केले आहेत.

[8] तू माझा जीव मृत्यूपासून, माझे डोळे अश्रूपासून, आणि माझे पाय अडखळण्यापासून मुक्त केले आहेत.

[9] जीवंताच्या भूमित परमेश्वराची सेवा करणे मी चालूच ठेवीन.

[10] मी फार पीडित आहे असे जेव्हा मी म्हणालो, तरी माझा त्याच्यावर विश्वास आहे.

[11] मी अविचाराने म्हणालो की, सगळे माणसे खोटारडे आहेत.

[12] परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकाराची मी कशी परतफेड करू?

[13] मी तारणाचा प्याला उंचावून परमेश्वराच्या नावाने हाक मारीन.

[14] त्याच्या सर्व लोकांसमोर, मी परमेश्वरास केलेले नवस पूर्ण करीन.

[15] परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचा मृत्यू अमोल आहे.

[16] हे परमेश्वरा, मी खरोखर तुझा सेवक आहे; मी तुझा सेवक, तुझी दासी असलेल्या स्त्रीचा मुलगा आहे; माझी बंधने तू सोडली आहेस.

[17] मी तुला उपकाराचा यज्ञ अर्पण करीन आणि मी परमेश्वराचे नामस्मरण करीन.

[18] मी त्याच्या सर्व लोकांसमोर परमेश्वरास केलेले नवस पूर्ण करीन.

[19] परमेश्वराच्या घराच्या अंगणात, यरूशलेमा तुझ्यामध्ये ते फेडीन. परमेश्वराची स्तुती करा.

स्तोत्रसंहिता — Chapters