Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 7:53

[1] अहो माझ्या लोकांनो, माझी शिकवण ऐका, माझ्या तोंडच्या वचनाकडे लक्ष द्या.

[2] मी शहाणपणाचे गीत गाईन; मी पूर्वकाळच्या गुप्त गोष्टीबद्दल सांगेन.

[3] ज्या आम्ही ऐकल्या आणि ज्या आम्हास समजल्या, त्या आमच्या वाडवडिलांनी आम्हास सांगितल्या.

[4] त्या आम्ही त्यांच्या वंशजापासून गुप्त ठेवणार नाही. त्या आम्ही पुढील पिढीला परमेश्वराची स्तुत्य कृत्ये, त्याचे सामर्थ्य आणि त्याने केलेले आश्चर्ये कृत्ये सांगू.

[5] कारण त्याने याकोबात निर्बंध स्थापले आणि इस्राएलासाठी नियमशास्त्र नेमले. त्याने आमच्या पूर्वजांना आज्ञा दिल्या की, त्यांनी त्या आपल्या मुलांना शिकवाव्या.

[6] त्याने ही आज्ञा यासाठी दिली की, पुढच्या पिढीने म्हणजे जी मुले जन्माला येतील, त्यांनी त्या आज्ञा जाणाव्या, त्या आपल्या स्वतःच्या मुलांना सांगाव्या.

[7] मग ते आपली आशा देवावर ठेवतील आणि त्याची कृत्ये विसरणार नाहीत परंतु त्याच्या आज्ञा पाळतील.

[8] तर त्यांनी आपल्या पूर्वजासारखे हट्टी आणि बंडखोर पिढी होऊ नये, त्यांनी आपले अंतःकरण योग्य राखले नाही, आणि जिचा आत्मा देवाला समर्पित व प्रामाणिक नव्हता.

[9] एफ्राइमाचे वंशज धनुष्यासह सशस्र होती, परंतु त्यांनी युद्धाच्यादिवशी पाठ फिरवली.

[10] त्यांनी देवाबरोबर करार पाळला नाही, आणि त्यांनी त्याचे नियमशास्त्र पाळण्याचे नाकारले.

[11] ते त्याची कृत्ये व त्याने दाखवलेली विस्मयकारक गोष्टी ते विसरले.

[12] मिसर देशातल्या सोअन प्रांतात त्यांच्या वडिलांच्या दृष्टीसमोर त्याने आश्चर्यकारक गोष्टी केल्या.

[13] त्याने समुद्र दुभागला आणि त्यांना पलिकडे नेले, त्याने पाणी भिंतीसारखे उभे केले.

[14] तो त्यांना दिवसा मेघ व रात्रभर अग्नीच्या प्रकाशात मार्ग दाखवित घेऊन जात असे.

[15] त्याने रानात खडक फोडला, आणि समुद्राची खोली पुरे भरण्यापर्यंत त्यांना विपुल पाणी दिले.

[16] त्याने खडकातून पाण्याचे प्रवाह आणि नदीसारखे पाणी बाहेर वाहविले.

[17] तरी ते त्याच्याविरुध्द पाप करितच राहिले. रानात परात्पराविरूद्ध बंड केले.

[18] नंतर त्यांनी आपली भूक तृप्त करण्यासाठी, अन्न मागून आपल्या मनात देवाला आव्हान दिले.

[19] ते देवाविरूद्ध बोलले, ते म्हणाले, “देव खरोखर आम्हास रानात भोजन देऊ शकेल का?

[20] पहा, त्याने खडकावर प्रहार केला तेव्हा पाणी उसळून बाहेर पडले, आणि पाण्याचे प्रवाह भरून वाहू लागले. पण भाकरही देऊ शकेल काय? तो आपल्या लोकांसाठी मांसाचा पुरवठा करील काय?”

[21] जेव्हा परमेश्वराने हे ऐकले, तेव्हा तो रागावला; म्हणून याकोबावर त्याचा अग्नि भडकला, आणि त्याच्या रागाने इस्राएलवर हल्ला केला,

[22] कारण त्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही, आणि त्याच्या तारणावर भरवसा ठेवला नाही.

[23] तरी त्याने वर आभाळाला आज्ञा दिली, आणि आभाळाचे दरवाजे उघडले.

[24] खाण्यासाठी त्याने त्यांच्यावर मान्नाचा वर्षाव केला, आणि त्यांना आकाशातून धान्य दिले.

[25] देवदूतांची भाकर लोकांनी खाल्ली. त्याने त्यांना भरपूर अन्न पाठवून दिले.

[26] त्याने आकाशात पूर्वेचा वारा वाहविला, आणि त्याच्या सामर्थ्याने त्याने दक्षिणेच्या वाऱ्याला मार्ग दाखवला.

[27] त्याने त्यांच्यावर धुळीप्रमाणे मांसाचा आणि समुद्रातील वाळूप्रमाणे असंख्य पक्षांचा वर्षाव केला.

[28] ते त्यांच्या छावणीच्यामध्ये पडले, त्यांच्या तंबूच्या सर्व सभोवती पडले.

[29] मग त्यांनी ते खाल्ले आणि तृप्त झाले. त्यांच्या हावेप्रमाणे त्याने त्यांना दिले.

[30] पण अजून त्यांची तृप्ती झाली नव्हती; त्यांचे अन्न त्यांच्या तोडांतच होते.

[31] त्याच क्षणाला, देवाच्या कोपाने त्याच्यावर हल्ला केला, आणि त्यांच्यातील बलवानास मारून टाकले. त्याने इस्राएलाच्या तरुणास हाणून पाडले.

[32] इतके झाले तरी ते पाप करितच राहीले, आणि त्यांनी त्याच्या आश्चर्यकारक कृत्यांवर विश्वास ठेवला नाही.

[33] म्हणून देवाने त्यांचे दिवस थोडके केले; त्यांचे आयुष्य भयानक भयात संपवले.

[34] जेव्हा कधी देवाने त्यांना पीडिले, तेव्हा त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरवात केली. उत्सुकतेने ते त्याच्याकडे वळले.

[35] देव आमचा खडक आहे, आणि परात्पर देव आमचा सोडवणारा याची आठवण त्यांना झाली.

[36] पण त्यांनी आपल्या मुखाने त्याची खोटी स्तुती केली आणि आपल्या जीभेने त्याच्याजवळ लबाडी केली.

[37] कारण त्यांचे मन त्यांच्याठायी स्थिर नव्हते, आणि ते त्याच्या कराराशी एकनिष्ठ नव्हते.

[38] परंतु तो दयाळू असल्यामुळे त्यांच्या अपराधांची क्षमा करतो आणि त्याने त्यांचा नाश केला नाही. होय, तो अनेक वेळा आपला राग आवरून धरतो, आणि आपला सर्व राग भडकू देत नाही.

[39] ती केवळ देह आहेत, वारा वाहून निघून जातो आणि तो परत येत नाही याची त्याने आठवण केली.

[40] त्यांनी किती वेळा रानात त्याच्याविरुध्द बंडखोरी केली, आणि पडिक प्रदेशात त्यांनी त्यास दु:खी केले.

[41] पुन्हा आणि पुन्हा देवाला आव्हान केले, आणि इस्राएलाच्या पवित्र प्रभूला खूप दु:खविले.

[42] त्यांनी त्याच्या सामर्थ्याविषयी विचार केला नाही, त्याने त्यांना शत्रूपासून कसे सोडवले होते.

[43] मिसरात जेव्हा त्याने आपली घाबरून सोडणारी चिन्हे आणि सोअनाच्या प्रांतात आपले चमत्कारही दाखविले ते विसरले.

[44] त्याने मिसऱ्यांच्या नद्यांचे रक्तात रुपांतर केले. म्हणून त्याच्या प्रवाहातील पाणी त्यांच्याने पिववेना.

[45] त्याने चावणाऱ्या माशांचे थवे पाठवले त्यांनी त्यांना खाऊन टाकले, आणि बेडकांनी त्यांचा देश आच्छादला.

[46] त्याने त्यांची पिके नाकतोड्यांच्या हवाली आणि त्यांच्या श्रमाचे फळ टोळाला दिले.

[47] त्याने गारांनी त्यांच्या द्राक्षवेलींचा आणि त्यांच्या उंबराच्या झाडांचा नाश बर्फाने केला.

[48] त्याने त्यांची गुरेढोरे गारांच्या व त्यांचे कळप विजांच्या हवाली केली.

[49] त्यांने आपल्या भयंकर रागाने त्यांच्याविरुद्ध तडाखे दिले. त्याने अरिष्ट आणणाऱ्या प्रतिनीधीप्रमाणे आपला क्रोध, प्रकोप आणि संकट पाठवले.

[50] त्याने आपल्या रागासाठी मार्ग सपाट केला; त्याने त्यांना मरणापासून वाचविले नाही पण त्याने त्यांना मरीच्या हवाली केले.

[51] त्याने मिसरमध्ये प्रथम जन्मलेले सर्व, हामाच्या तंबूतील त्यांच्या शक्तीचे प्रथम जन्मलेले मारून टाकले.

[52] त्याने आपल्या लोकांस मेंढरांसारखे बाहेर नेले आणि त्याने त्याच्या कळपाप्रमाणे रानातून नेले.

[53] त्याने त्यांना सुखरुप आणि न भीता मार्गदर्शन केले, पण समुद्राने त्यांच्या शत्रूंना बुडवून टाकले.

[54] आणि त्याने त्यास आपल्या पवित्र देशात, हा जो पर्वत आपल्या उजव्या हाताने मिळवला त्याकडे आणले.

[55] त्याने त्यांच्यापुढून राष्ट्रांना हाकलून लावली, आणि त्यांना त्यांची वतने सूत्राने मापून नेमून दिली; आणि त्यांच्या तंबूत इस्राएलाचे वंश वसविले.

[56] तरी त्यांनी परात्पर देवाला आव्हान दिले आणि त्याच्याविरुध्द बंडखोरी केली, आणि त्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत.

[57] ते आपल्या पूर्वजाप्रमाणे अविश्वासू होते आणि त्यांनी विश्वासघातकी कृत्ये केली; फसव्या धनुष्याप्रमाणे ते स्वतंत्रपणे वळणारे होते.

[58] कारण त्यांनी आपल्या उंच जागा बांधल्या आणि देवाला क्रोधित केले आणि आपल्या कोरीव मूर्तींमुळे त्यास आवेशाने कोपविले.

[59] जेव्हा देवाने हे ऐकले, तो रागावला, आणि त्याने इस्राएलाला पूर्णपणे झिडकारले.

[60] त्याने शिलोतले पवित्रस्थान सोडून दिले, ज्या तंबूत लोकांच्यामध्ये तो राहत होता.

[61] त्याने आपल्या सामर्थ्याचा कोश बंदिवासात जाण्याची परवानगी दिली, आणि आपले गौरव शत्रूच्या हातात दिले.

[62] त्याने आपले लोक तलवारीच्या स्वाधीन केले, आणि आपल्या वतनावर तो रागावला.

[63] अग्नीने त्यांच्या तरुण मनुष्यास खाऊन टाकले, आणि त्यांच्या तरुण स्रीयांना लग्नगीते लाभली नाहीत.

[64] त्यांचे याजक तलवारीने पडले, आणि त्यांच्या विधवा त्यांच्यासाठी रडल्या नाहीत.

[65] मग प्रभू झोपेतून जागा झालेल्या मनुष्यासारखा उठला, द्राक्षरसामुळे आरोळी मारणाऱ्या सैनिकासारखा तो उठला.

[66] त्याने आपल्या शत्रूंना मारून मागे हाकलले; त्याने त्यांची कायमची नामुष्की केली.

[67] त्याने योसेफाचा तंबू नाकारला, आणि त्याने एफ्राईमाच्या वंशाचा स्वीकार केला नाही.

[68] त्याने यहूदाच्या वंशाला निवडले, आणि आपला आवडता सियोन पर्वत निवडला.

[69] उंच आकाशासारखे व आपण सर्वकाळ स्थापिलेल्या पृथ्वीसारखे त्याने आपले पवित्रस्थान बांधले.

[70] त्याने आपला सेवक दावीदाला निवडले, आणि त्यास त्याने मेंढरांच्या कोंडवाड्यांतून घेतले.

[71] आपले लोक याकोब व आपले वतन इस्राएल यांचे पालन करण्यास त्याने त्यास दुभत्या मेंढ्याच्या मागून काढून आणले.

[72] दावीदाने आपल्या मनाच्या सरळतेने त्याचे पालन केले, आणि आपल्या हातच्या कौशल्याने त्यास मार्ग दाखविला.

स्तोत्रसंहिता — Chapters