Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 2:12

[1] न्यायी जनहो! परमेश्वरामध्ये आनंद करा, न्यायी लोकांनो त्याची स्तुती करा.

[2] वीणा वाजवून परमेश्वरास धन्यवाद द्या; दहा तारांच्या वाद्यावर त्याचे गुणगान गा.

[3] त्याच्यासाठी नवे गीत गा; मोठा आवाज करून कौशल्याने वाद्ये वाजवा.

[4] कारण परमेश्वरचे वचन सरळ आहे, आणि तो जे करतो ते प्रामाणिकपणाने करतो.

[5] देवाला चांगलुपणा आणि न्यायीपण प्रिय आहे, परमेश्वराच्या प्रेमदयेने पृथ्वी भरलेली आहे.

[6] परमेश्वराच्या शब्दाकडून आकाशे निर्माण झाली आणि त्याच्या मुखातील श्वासाने सर्व तारे निर्माण झाले आहेत.

[7] तो समुद्रातील पाणी ढीगासारखे एकत्र करतो, तो समुद्र कोठारामध्ये ठेवतो.

[8] सर्व पृथ्वी परमेश्वराचे भय बाळगो, जगात राहणारा प्रत्येक त्याच्या भीतीत उभा राहो.

[9] कारण तो बोलला आणि ते झाले, त्याने आज्ञा केली आणि ते आपल्या ठिकाणी स्थिर झाले.

[10] राष्ट्रांचा उपदेश परमेश्वर मोडतो, तो लोकांच्या योजनांवर अधिकार करतो.

[11] परंतु परमेश्वराच्या योजना सर्वकाळ राहतात, त्याच्या हृदयातील योजना पिढ्यानपिढ्या स्थिर राहतात.

[12] परमेश्वर ज्या राष्ट्राचा देव आहे ते राष्ट्र आशीर्वादित आहे. ज्यांना त्याने आपल्या वतनाचे होण्यास निवडले आहे ते सुखी आहेत.

[13] परमेश्वर स्वर्गातून खाली पाहतो, तो सर्व लोकांस पाहातो.

[14] तो आपल्या राहण्याच्या ठिकाणाहून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांकडे पाहतो.

[15] ज्याने सर्वांची हृदये घडवली तो त्या सर्वांची कृत्ये पारखतो, तोच तो आहे.

[16] पुष्कळ सैन्य असल्याने राजा तारला जात नाही. वीर योद्धा त्याच्या सामर्थ्याने वाचतो असे नाही.

[17] घोडा विजयासाठी व्यर्थ आहे. त्याच्या पुष्कळ बळाने तो कोणाला वाचवू शकत नाही.

[18] पाहा! परमेश्वराची दृष्टी त्याचे भय बाळगणाऱ्यांवर आहे. जे त्याच्या प्रेमदयेची आशा धरतात,

[19] त्यांना मरणापासून, आणि दुष्काळापासून वाचवायला त्याची दृष्टी त्यांच्यावर आहे.

[20] आम्ही परमेश्वराची वाट पाहू, तो आमचे साहाय्य आणि आमची ढाल आहे.

[21] त्याच्यामध्ये आमचे हृदय हर्ष पावते, कारण आम्ही त्याच्या पवित्रतेत विश्वास ठेवतो.

[22] परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे त्याप्रमाणे तुझी प्रेमदया आम्हाबरोबर असू दे.

स्तोत्रसंहिता — Chapters