[1] हे देवा, तू राजाला आपले न्यायाचे निर्णय, राजाच्या मुलाला आपले न्यायीपण दे.
[2] तुझ्या लोकांचा नीतीने न्याय करो, आणि तुझ्या गरीब लोकांचा न्यायनिवाडा न्यायाने करो.
[3] पर्वत लोकांसाठी शांती उत्पन्न करतील; टेकड्या न्यायीपणा उत्पन्न करतील.
[4] तो लोकांतील गरीबांचा न्याय करील; गरजवंताच्या मुलांना तारील, आणि जुलूम करणाऱ्यांचे तुकडे करील.
[5] जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे, तोपर्यंत सर्व पिढ्यानपिढ्या ते तुझा आदर करतील.
[6] जसा कापलेल्या गवतावर पाऊस पडतो, तशी पृथ्वीला भिजवणारी पावसाची सर उतरून येईल.
[7] त्याच्या दिवसात नितिमानाची भरभराट होवो, आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती होईल.
[8] समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि त्या नदीपासून ते पृथ्वीच्या शेवटापर्यंत त्याची सत्ता राहो.
[9] अरण्यात राहणारे त्याच्यासमोर नमन करोत; त्याचे शत्रू धूळ चाटोत.
[10] तार्शीश आणि बेटांचे राजे खंडणी देवोत; शबा आणि सबाच्या राजांना त्याच्यासाठी भेटी आणोत.
[11] खरोखर, सर्व राजे त्याच्यापुढे नमन करोत; सर्व राष्ट्रे त्याची सेवा करोत;
[12] कारण त्याने धावा करणाऱ्या गरजवंताला, आणि गरीबाला दुसरा कोणी मदतनीस नाही त्यास मदत केली आहे.
[13] तो गरीब आणि गरजवंतांवर दया करील, आणि गरजवंताचा जीव तो तारील.
[14] तो त्यांचा जुलूम आणि हिंसाचारापासून त्यांचा जीव खंडून घेईल, आणि त्यांचे रक्त त्याच्या दृष्टीने मौलवान आहे.
[15] राजा जगेल, त्यास शबाचे सोने दिले जावो. लोक त्याच्यासाठी नेहमी प्रार्थना करो; देव त्यास दिवसभर आशीर्वाद देवो.
[16] तेथे पृथ्वीत पर्वत कळसावर विपुल धान्य येवो; तिचे पीक लबानोन झाडासारखे वाऱ्याच्या झुळकेने डुलोत आणि नगरातले लोक पृथ्वीच्या गवतासारखी भरभराटीस येवो.
[17] राजाचे नाव सर्वकाळ टिकून राहो; सूर्य आहे तोपर्यंत त्याचे नाव पुढे चालू राहो; त्याच्यात लोक आशीर्वादित होतील; सर्व राष्ट्रे त्यास धन्य म्हणतील.
[18] परमेश्वर देव, इस्राएलाचा देव, धन्यवादित असो, तोच फक्त आश्चर्यकारक गोष्टी करतो.
[19] त्याचे गौरवशाली नाव सर्वकाळ धन्यवादित असो आणि सर्व पृथ्वी त्याच्या गौरवाने भरली जावो. आमेन आणि आमेन.
[20] इशायाचा मुलगा दावीद याच्या प्रार्थना इथे संपल्या.