Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 3:49

[1] माझ्या देवा, माझ्या देवा तू मला का सोडून गेलास? मला तारायला आणि माझ्या वेदनांचा शब्द ऐकायला तू दूर का आहेस?

[2] माझ्या देवा, मी तुला दिवसा हाक मारली परंतु तू उत्तर दिले नाहीस, आणि मी रात्रीही गप्प बसलो नाही.

[3] तरी तू पवित्र आहेस, जो इस्राएलाच्या स्तवनामध्ये वसतोस.

[4] आमच्या पूर्वजांनी तुझ्यावर विश्वास ठेवला. होय देवा, त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू त्यांना वाचवलेस.

[5] देवा आमच्या पूर्वजांनी तुला मदतीसाठी आरोळी केली आणि त्यांना तू सोडवले, त्यांनी तुझ्यावर विश्वास टाकला आणि त्यांची निराशा झाली नाही.

[6] परंतू मी किटक आहे, मी मनुष्य नाही, जो मनुष्यांनी निंदिलेला आणि लोकांनी तिरस्कार केलेला आहे.

[7] सर्व माझ्याकडे बघणारे माझा उपहास करतात; ते माझा अपमान करतात, ते त्यांचे डोके हलवतात.

[8] ते म्हणतात “तो परमेश्वरावर विश्वास ठेवतो, तर परमेश्वर त्यास सोडवो. त्याने त्यास वाचवावे, कारण तो त्याच्याठायी हर्ष पावतो.”

[9] परंतु मला उदरांतून बाहेर काढणारा तुच आहेस, मी माझ्या आईच्या स्तनांवर असता, तू मला तुझ्यावर विश्वास ठेवायला शिकवले.

[10] मी गर्भातूनच तुझ्यावर सोपवून दिलेला होतो. माझ्या आईच्या उदरात असतानाच तू माझा देव आहेस.

[11] माझ्यापासून दूर नको राहू, कारण संकट जवळच आहे. आणि मला मदत करायला कोणीही नाही.

[12] खुप बैलांनी मला वेढले आहे, बाशानाच्या बळकट बैलांनी मला वेढले आहे.

[13] जसा सिंह आपले तोंड त्याच्या भक्ष्यास फाडण्यास उघडतो, तसे त्यांनी आपले तोंड माझ्या विरूद्ध उघडले आहे.

[14] मी पाण्यासारखा ओतला जात आहे, आणि माझी सर्व हाडे निखळली आहेत. माझे हृदय मेणासारखे झाले आहे. जे माझ्या आतल्या आत विरघळले आहे.

[15] फुटलेल्या खापराप्रमाणे माझी शक्ती सुकून गेली आहे. माझी जीभ टाळूला चिकटली आहे. तू मला “मृत्यूच्या धुळीत” ठेवले आहे.

[16] “कुत्री” मला वेढून आहेत, मला दुष्टांच्या घोळक्यांनी घेरले आहे. त्यांनी माझ्या हातापायाला छेदले आहे.

[17] मी माझी सर्व हाडे मोजू शकतो. ते माझ्याकडे टक लावून बघतात.

[18] त्यांनी माझे कपडे त्यांच्यात वाटून घेतली आहेत, आणि माझ्या कपड्यांसाठी ते चिठ्‌या टाकतात.

[19] परमेश्वरा, मला सोडून जाऊ नकोस तुच माझी शक्ती हो, लवकर ये आणि मला मदत कर.

[20] परमेश्वरा माझे आयुष्य तलवारीपासून वाचव, माझे मौल्यवान आयुष्य त्या कुत्र्यांच्या पंज्यापासून वाचव.

[21] सिंहाच्या जबड्यापासून माझे रक्षण कर. जंगली बैलाच्या शिंगापासून माझे रक्षण कर.

[22] परमेश्वरा, मी माझ्या भावांना तुझे नाव सांगेन. सभेत मी तुझे गुणगान गाईन.

[23] जे लोक परमेश्वराचे भय धरतात, ते तुम्ही त्याची स्तुती करा! याकोबाच्या सर्व वंशजांनो, त्यास मान द्या! इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराची भीती बाळगा आणि त्याचा आदर करा.

[24] कारण परमेश्वराने संकटात सापडलेल्यांच्या दु:खाला तुच्छ मानले नाही आणि किळस केला नाही. आणि त्यांनी आपले मुख त्यांच्यापासून लपवले नाही. जेव्हा पिडीतांनी त्यास आरोळी केली, त्याने ऐकले.

[25] परमेश्वरा, मोठ्या सभेत मी तुझी स्तुती करीन. तुझे भय धरणाऱ्यांपुढे मी आपले नवस फेडीन.

[26] गरीब लोक खातील आणि समाधानी राहतील. जे लोक परमेश्वरास शोधत आहेत, ते त्याची स्तुती करतील. तुझे हृदय सर्वकाळ जिवंत राहो.

[27] सर्व पृथ्वीवरील लोक त्याची आठवण करतील आणि परमेश्वराकडे परत येतील. सर्व राष्ट्रातील कुटूंब तुला नमन करतील.

[28] कारण राज्य परमेश्वरचे आहे, तो जगावर अधिकार करणारा आहे.

[29] पृथ्वीवरील सर्व समृद्ध लोक भोजन आणि स्तुती करतील. जे आपला जीव वाचवू शकत नाही, जे सर्व धुळीस लागले आहेत, ते त्यास नमन करतील.

[30] येणारी पिढी त्याची सेवा करणार. ते त्यांच्या पुढच्या पिढीला प्रभूबद्दल सांगतील.

[31] ते येतील आणि जे जन्मतील त्यांना ते त्याचे न्यायीपण प्रगट करतील, ते म्हणतील त्यानेच हे केले आहे.

स्तोत्रसंहिता — Chapters