[1] अहो अधिकाऱ्यांनो, तुम्ही खरोखर योग्य न्याय करता का? अहो मनुष्याच्या मुलांनो, तुम्ही सरळपणे न्याय करता का?
[2] नाही, तुम्ही हृदयात दुष्टपणाचे काम करता; तुम्ही पृथ्वीवर आपल्या हाताने हिंसा तोलून देता.
[3] दुष्ट उदरापासूनच दुरावतात; ते जन्मल्यापासूनच खोटे बोलून बहकून जातात.
[4] त्यांचे विष सापाच्या विषासारखे आहे, जो बहिरा असल्यासारखा साप आपले कान झाकतो त्याच्यासारखे आहेत;
[5] गारुडी कितीही कुशलतेने मंत्र घालू लागला तरी त्याच्या वाणीकडे तो लक्ष देत नाही, त्यासारखे ते आहेत.
[6] हे देवा, त्यांचे दात त्यांच्या मुखात पाड; हे परमेश्वरा तरुण सिंहाच्या दाढा पाडून टाक;
[7] जसे जोरात वाहणारे पाणी नाहीसे होते तसे ते नाहीसे होवोत; जेव्हा ते आपले तीर मारतील तेव्हा त्यांना टोक नसल्यासारखे ते होवोत.
[8] गोगलगायीप्रमाणे ते होवोत जशी ती विरघळते आणि नाहीशी होते, जर अवेळी जन्मलेल्या स्रीचा गर्भ त्यास कधी सूर्य प्रकाश दिसत नाही त्याप्रमाणे ते होवोत.
[9] तुमच्या भांड्यास काटेऱ्या जळणाची आंच लागण्यापूर्वीच, ते हिरवे असो वा सुकलेले, दुष्ट नाहीसे होतील.
[10] नीतिमान जेव्हा देवाने घेतलेला सूड पाहील तेव्हा तो आनंदित होईल; तो आपले पाय दुष्टांच्या रक्तात धुईल.
[11] म्हणून मनुष्य म्हणेल, “खरोखर नीतिमान मनुष्यांना त्यांचे प्रतिफळ आहे; खरोखर पृथ्वीवर न्याय करणारा देव आहे. खरोखर आहे.”