[1] हे परमेश्वरा, तू आपल्या देशावर अनुग्रह दाखवला आहेस; तू याकोबाला बंदिवासातून परत आणले आहेस.
[2] तू आपल्या लोकांच्या पापांची क्षमा केली आहेस. तू त्यांची सर्व पापे झाकून टाकली आहेत.
[3] तू आपला सर्व क्रोध काढून घेतला आहे; आणि आमच्यावरील भयंकर क्रोधापासून मागे फिरला आहेस.
[4] हे आमच्या तारणाऱ्या देवा, आम्हास परत आण, आणि आमच्यावरचा तुझा असंतोष दूर कर.
[5] सर्वकाळपर्यंत तू आमच्यावर रागावलेला राहशील का? पिढ्यानपिढ्या तू रागावलेला राहशील काय?
[6] तुझ्या लोकांनी तुझ्याठायी आनंद करावा, म्हणून तू आम्हास परत जिवंत करणार नाहीस का?
[7] हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा अनुभव आम्हास येऊ दे; तू कबूल केलेले तारण आम्हास दे.
[8] परमेश्वर देव काय म्हणेल ते मी ऐकून घेईन. कारण तो आपल्या लोकांशी व विश्वासू अनुयायींशी शांती करेल, तरी मात्र त्यांनी मूर्खाच्या मार्गाकडे पुन्हा वळू नये.
[9] खचित जे त्यास भितात त्यांच्याजवळ त्याचे तारण आहे; यासाठी आमच्या देशात वैभव रहावे.
[10] दया व सत्य एकत्र मिळाली आहेत; निती आणि शांती यांनी एकमेकांचे चुंबन घेतले आहे.
[11] पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे, आणि स्वर्गातून नितिमत्व खाली पाहत आहे.
[12] जे उत्तम ते परमेश्वर देईल, आणि आमची भूमी आपले पिक देईल.
[13] त्याच्यासमोर नितीमत्व चालेल, आणि त्याच्या पावलांसाठी मार्ग तयार करील.