[1] माझे हृदय चांगल्या विचारांनी भरून वाहते, राजासाठी बनवलेली काव्ये मी मोठ्याने वाचेन, लेखकाच्या लेखणीतून शब्द यावेत त्याप्रमाणे माझ्या जीभेतून शब्द येतात.
[2] तू मनुष्याच्या संतानापेक्षा सुंदर आहेस. तुझ्या ओठात कृपा ओतलेली आहे, यास्तव देवाने तुला सर्वकाळ आशीर्वाद दिला आहे.
[3] हे बलवाना, तू आपली तलवार मांडीला बांध, आपले वैभव आणि आपला प्रताप धारण कर.
[4] तू आपल्या सत्याने, नम्रतेने, न्यायीपणामध्ये विजयाने स्वारी कर, तुझा उजवा हात तुला भयानक गोष्टी शिकवेल.
[5] तुझे बाण तीक्ष्ण आहेत. लोक तुझ्या पायाखाली पडतील. तुझे बाण राजाच्या शत्रूंच्या हृदयात आहेत.
[6] देवा तुझे सिंहासन सर्वकाळासाठी आहे. तुझा न्यायाचा राजदंड हा तुझ्या राज्याचा राजदंड आहे.
[7] तू न्यायीपणावर प्रीती केली आणि दुष्टाईचा हेवा केला. यास्तव देवाने, तुझ्या देवाने, हर्षाच्या तेलाने तुला तुझ्या सोबत्यांपेक्षा अधीक अभिषेक केल आहे.
[8] तुझ्या वस्त्रांना बोळ, अगरू, ऊद आणि दालचिनी यांचा सुगंध येतो. हस्तिदंताच्या महालातून तंतुवाद्यांनी तुला आनंदीत केले आहे.
[9] राजांच्या मुली तुझ्या सन्मान्य स्रीयांच्यामध्ये आहेत. राणी ओफिराच्या सोन्याने शृंगारलेली तुझ्या उजव्या बाजूस उभी आहे.
[10] मुली, लक्षपूर्वक ऐक, विचार कर, आपला कान लाव. तुझी माणसे आणि तुझ्या वडीलांच्या घराला विसरून जा.
[11] अशाने राजा तुझ्या सौंदर्याची आवड धरणार, तो तुझा स्वामी आहे, तू त्याचा आदर कर.
[12] सोराची कन्या तुझ्यासाठी भेट आणील. श्रीमंतातील लोक तुला भेटायची इच्छा धरतील.
[13] राजकन्या राजमहालात तेजस्वी आहे, तिचे वस्र सोन्याच्या कारागिरीचे आहेत.
[14] तिला कशिदाकाम केलेल्या वस्त्रांमध्ये राजाकडे नेले जाईल. तिच्या मागे चालणाऱ्या तिच्या सोबतिणी कुमारी तुझ्याजवळ आणल्या जातील.
[15] ते आनंदात व हर्षात नेल्या जातील. ते राजाच्या महालात प्रवेश करतील.
[16] तुझ्या वडिलांच्या ठिकाणी तुझी मुले राज्य करतील. ज्यांना तू सर्व पृथ्वीत अधिपती करशील.
[17] तुझे नाव सर्व पिढ्या आठवतील असे मी करीन. म्हणून लोक सदासर्वकाळ तुझी स्तुती करतील.