[1] ज्ञानाने आपले स्वतःचे घर बांधले; त्यामध्ये तिने खडकाचे सात खांब कोरून तयार केले.
[2] तिने रात्रीच्या भोजनासाठी आपले पशू तयार केले आहेत; तिने आपला द्राक्षरस मिसळला आहे; आणि तिने मेजही वाढून तयार केले आहे, तिने अन्न तिच्या मेजावर ठेवले आहे.
[3] तिने आपल्या दासीकरवी आमंत्रण पाठवले आहे आणि ते नगराच्या उंचस्थानांच्या टोकापासून हाक मारून म्हणतेः
[4] “जो अज्ञानी आहे तो इकडे येवो!” ती जे बुद्धिहीन आहेत त्यांना म्हणते.
[5] “या, माझे अन्न खा. आणि मी मिसळलेला द्राक्षरस प्या.
[6] तुमचे अज्ञानाचे मार्ग मागे सोडा आणि जिवंत रहा; सुज्ञानाच्या मार्गाने चला.”
[7] जो निंदकाला सुबोध करतो तो अप्रतिष्ठेला आंमत्रण करतो, आणि जो दुर्जन मनुष्यास बोल लावतो तो आपले नुकसान करून घेतो.
[8] निंदकाला बोल लावू नको नाहीतर तो तुझा द्वेष करेल; ज्ञान्यास बोल लाव आणि तो तुझ्यावर प्रेम करील.
[9] ज्ञानी मनुष्यास शिक्षण दिले तर तो ज्ञानात अधिक वाढत जाईल; नितीमान मनुष्यास शिक्षण दिले तर तो शिक्षणात अधिक वाढेल.
[10] परमेश्वराचे भय ज्ञानाचा उगम आहे, आणि परमपवित्र देवाला ओळखणे हीच सुज्ञता आहे.
[11] कारण माझ्यामुळे तुझ्या आयुष्याचे दिवस बहुगुणित होतील, आणि तुमच्या आयुष्याची वर्षे वाढतील.
[12] जर तुम्ही ज्ञानी असलास, तर तू आपणासाठी ज्ञानी असशील, पण जर तू निंदा केली तर तूच मात्र तिचे फळ भोगशील.
[13] मूर्ख स्त्री गोंगाट करणाऱ्यासारखी आहे, ती अज्ञानी आहे आणि तिला काही कळत नाही.
[14] ती तिच्या घराच्या दाराजवळ बसते, ती नगरातल्या उंचस्थानी आसनावर बसते.
[15] जे लोक आपल्या वाटेने सरळ चालतात, जवळून जाणाऱ्यांना ती हाक मारून म्हणते,
[16] “जो कोणी अज्ञानी आहे तो इकडे येवो!” जो कोणी बुद्धिहीन आहे त्यास ती म्हणते.
[17] “चोरलेले पाणी गोड लागते, आणि गुप्तपणे खाल्लेली भाकर चांगली लागते.”
[18] पण तेथे मरण पावलेले आहेत हे त्यांना समजत नाही, तिचे पाहुणे मृतलोकाच्या खोल स्थानात आहेत हे त्यास माहित नाही.