Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 3:24

[1] शांतीच्या उत्तराने राग निघून जातो, पण कठोर शब्दामुळे राग उत्तेजित होतो.

[2] सुज्ञाची जिव्हा सुज्ञानाची प्रशंसा करते, पण मूर्खाचे मुख मूर्खपणा ओतून टाकते.

[3] परमेश्वराचे नेत्र सर्वत्र असतात, ते चांगले आणि वाईट पाहत असतात.

[4] आरोग्यदायी जीभ जीवनाचा वृक्ष आहे, परंतु कपटी जीभ आत्म्याला चिरडणारी आहे.

[5] मूर्ख आपल्या वडिलांचे शिक्षण तुच्छ लेखतो, पण जो विवेकी आहे तो चुकीतून सुधारतो.

[6] नीतिमानाच्या घरात मोठे खजिने आहेत, पण दुष्टाची कमाई त्यास त्रास देते.

[7] ज्ञानाचे ओठ विद्येविषयीचा प्रसार करते, पण मूर्खाचे हृदय असे नाही.

[8] दुष्टाच्या अर्पणाचा परमेश्वर द्वेष करतो, पण सरळांची प्रार्थना त्याचा आनंद आहे.

[9] दुष्टांच्या मार्गाचा परमेश्वरास वीट आहे, पण जे नीतीचा पाठलाग करतात त्यांच्यावर तो प्रीती करतो.

[10] जो कोणी मार्ग सोडतो त्याच्यासाठी कठोर शासन तयार आहे, आणि जो कोणी सुधारणेचा तिरस्कार करतो तो मरेल.

[11] अधोलोक आणि विनाशस्थान परमेश्वरापुढे उघडे आहे; तर मग मनुष्यजातीच्या वंशाची अंतःकरणे त्याच्या दृष्टीपुढे किती जास्त असली पाहिजेत?

[12] निंदकाला शिक्षेची चीड येते; तो सुज्ञाकडे जात नाही.

[13] आनंदी हृदय मुख आनंदित करते, पण हृदयाच्या दुःखाने आत्मा चिरडला जातो.

[14] बुद्धिमानाचे हृदय ज्ञान शोधते, पण मूर्खाचे मुख मूर्खताच खाते.

[15] जुलूम करणाऱ्याचे सर्व दिवस दुःखकारक असतात, पण आनंदी हृदयाला अंत नसलेली मेजवाणी आहे.

[16] पुष्कळ धन असून त्याबरोबर गोंधळ असण्यापेक्षा ते थोडके असून परमेश्वराचे भय बाळगणे चांगले आहे.

[17] पोसलेल्या वासराच्या तिरस्कारयुक्त मेजवाणीपेक्षा, जेथे प्रेम आहे तेथे भाजीभाकरी चांगली आहे.

[18] रागीट मनुष्य भांडण उपस्थित करतो, पण जो रागास मंद आहे तो मनुष्य भांडण शांत करतो.

[19] आळशाची वाट काटेरी कुंपणासारखी आहे, पण सरळांची वाट राजमार्ग बनते.

[20] शहाणा मुलगा आपल्या वडिलांना आनंदीत करतो. पण मूर्ख मनुष्य आपल्या आईला तुच्छ मानतो.

[21] बुद्धिहीन मनुष्य मूर्खपणात आनंद मानतो. पण जो समंजस आहे तो सरळ मार्गाने जातो.

[22] जेथे सल्ला नसतो तेथे योजना बिघडतात, पण पुष्कळ सल्ला देणाऱ्यांबरोबर ते यशस्वी होतात.

[23] मनुष्यास आपल्या तोंडच्या समर्पक उत्तराने आनंद होतो; आणि योग्यसमयीचे शब्द किती चांगले आहे!

[24] सुज्ञाने खाली अधोलोकास जाऊ नये म्हणून त्याचा जीवनमार्ग वर जातो.

[25] परमेश्वर गर्विष्ठांची मालमत्ता फाडून काढेल, परंतु तो विधवेच्या मालमत्तेचे रक्षण करतो.

[26] परमेश्वर पाप्यांच्या विचारांचा द्वेष करतो, पण दयेची वचने त्याच्या दुष्टीने शुद्ध आहेत.

[27] चोरी करणारा आपल्या कुटुंबावर संकटे आणतो, पण जो लाचेचा तिटकारा करतो तो जगेल.

[28] नीतिमान उत्तर देण्याआधी विचार करतो, पण दुष्टाचे मुख सर्व वाईट ओतून बाहेर टाकते.

[29] परमेश्वर दुष्टांपासून खूप दूर आहे, पण तो नीतिमानांच्या प्रार्थना नेहमी ऐकतो.

[30] नेत्राचा प्रकाश अंतःकरणाला आनंद देतो, आणि चांगली बातमी शरीराला निरोगी आहे.

[31] जर कोणीतरी तुम्हास जीवन कसे जगावे म्हणून सुधारतो त्याकडे लक्ष द्या, तुम्ही ज्ञानामध्ये रहाल.

[32] जो कोणी शिक्षण नाकारतो तो आपल्या स्वत:लाच तुच्छ लेखतो, परंतु जो कोणी शासन ऐकून घेतो तो ज्ञान मिळवतो.

[33] परमेश्वराचे भय हे सुज्ञतेचे शिक्षण देते, आणि आदरापूर्वी नम्रता येते.

नीतिसूत्रे — Chapters