Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 3:48

[1] इस्राएलाचा राजा, दावीदाचा पुत्र शलमोन, याची ही नितीसूत्रे.

[2] ज्ञान व शिक्षण शिकावे, बुद्धीच्या वचनाचे ज्ञान मिळवावे,

[3] सुज्ञतेचे शिक्षण घेऊन जे योग्य, न्यायी, आणि चांगले ते करण्यास शिकावे,

[4] भोळ्यांना शहाणपण आणि तरुणांना ज्ञान व दूरदर्शीपणा द्यावे,

[5] ज्ञानी व्यक्तीने ऐकावे आणि त्याने ज्ञानात वाढावे, बुद्धीमान व्यक्तीला मार्गदर्शन मिळावे,

[6] ज्ञानी लोकांची वचने आणि त्याची गूढरहस्ये समजावी, म्हणून म्हणी व सुवचने ह्यासाठी ही आहेत.

[7] परमेश्वराचे भय ज्ञानाची सुरुवात आहे, मूर्ख ज्ञान आणि शिक्षण तुच्छ मानतात.

[8] माझ्या मुला, तू तुझ्या वडिलांची शिकवण ऐक, आणि तू तुझ्या आईचा नियम बाजूला टाकू नकोस;

[9] ते तुझ्या शिराला सुशोभित वेष्टन आणि तुझ्या गळ्यात लटकते पदक आहे.

[10] माझ्या मुला, जर पापी तुला फूस लावून त्यांच्या पापात पाडण्याचा प्रयत्न करतो, तर त्याच्यामागे जाण्यास नकार दे;

[11] जर ते म्हणतील “आमच्याबरोबर ये. आपण वध करण्यास वाट बघू; आपण लपू व निष्कारण निष्पाप व्यक्तीवर हल्ला करू.

[12] जसे अधोलोक निरोग्यांना गिळून गर्तेत पडणाऱ्यांसारखे करतो तसे आपण त्यांना जिवंतपणीच गिळून टाकू.

[13] आपणांस सर्व प्रकारच्या मौलवान वस्तू मिळतील; आपण इतरांकडून जे चोरून त्याने आपण आपली घरे भरू.

[14] तू आपला वाटा आम्हाबरोबर टाक, आपण सर्व मिळून एकच पिशवी घेऊ.”

[15] माझ्या मुला, त्यांच्याबरोबर त्या मार्गाने खाली जाऊ नकोस; ते जेथून चालतात त्याचा स्पर्शही तुझ्या पावलांना होऊ देऊ नकोस;

[16] त्यांचे पाय दुष्कृत्ये करायला धावतात, आणि ते रक्त पाडायला घाई करतात.

[17] एखादा पक्षी पाहत असतांना, त्यास फसवण्यासाठी जाळे पसरणे व्यर्थ आहे.

[18] ही माणसे तर आपल्या स्वतःचा घात करण्यासाठी टपतात. ते आपल्या स्वतःसाठी सापळा रचतात.

[19] जो अन्यायाने संपत्ती मिळवतो त्या प्रत्येकाचे मार्ग असेच आहेत; अन्यायी धन ज्यांनी धरून ठेवले आहे ते त्यांचाही जीव घेते.

[20] ज्ञान रस्त्यावर पुकारा करते, ते उघड्या जागेवर आपली वाणी उच्चारते;

[21] ती गजबजलेल्या रस्त्याच्या नाक्यावरून घोषणा करते, शहराच्या प्रवेशद्वारापाशी घोषणा करते,

[22] “अहो भोळ्यांनो, जे काही तुम्हास समजत नाही त्याची किती वेळ आवड धरणार? तुम्ही चेष्टा करणारे, किती वेळ चेष्टा करण्यात आनंद पावणार, आणि मूर्ख किती वेळ ज्ञानाचा तिरस्कार करणार?

[23] तुम्ही माझ्या निषेधाकडे लक्ष द्या; मी आपले विचार तुम्हावर ओतीन; मी आपली वचने तुम्हास कळवीन.

[24] मी बोलावले पण तुम्ही ऐकायला नकार दिला; मी आपला हात पुढे केला, पण कोणीही लक्ष दिले नाही.

[25] परंतु तुम्ही माझ्या सर्व शिक्षणाचा अव्हेर केला आणि माझ्या दोषारोपाकडे दुर्लक्ष केले.

[26] म्हणून मीही तुमच्या संकटाना हसेन, तुमच्यावर संकटे आलेली पाहून मी थट्टा करीन.

[27] जेव्हा वादळांप्रमाणे तुमच्यावर भितीदायक दहशत येईल, आणि तुफानाप्रमाणे तुमच्यावर समस्या आघात करतील; जेव्हा संकटे आणि दु:ख तुम्हावर येतील.

[28] ते मला हाका मारतील आणि मी त्यांना उत्तर देणार नाही; ते माझा झटून शोध करतील, पण मी त्यांना सापडणार नाही.

[29] कारण त्यांनी ज्ञानाचा द्वेष केला; आणि परमेश्वराचे भय निवडून घेतले नाही,

[30] त्यांनी माझ्या शिक्षणास नकार दिला, आणि त्यांनी माझी तोंडची शिक्षा अवमानली.

[31] म्हणून ते आपल्या वर्तणुकीचे फळ खातील आणि आपल्याच योजनांच्या फळाने भरले जातील.

[32] कारण जो कोणी भोळा जेव्हा दूर निघून जाईल त्याचा नाश होईल; आणि मूर्खाचे स्वस्थपण त्याचा नाश करील.

[33] परंतु जो कोणी माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो. आणि अरिष्टाची भिती नसल्यामुळे स्वस्थ राहतो.”

नीतिसूत्रे — Chapters