Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 3:33

[1] जेव्हा कोणीएक पाठलाग करत नसले तरी दुर्जन दूर पळतात, पण नीतिमान सिंहासारखे निर्भय राहतात.

[2] देशाच्या अपराधांमुळे त्याचे पुष्कळ अधिपती होतात; पण जेव्हा समंजस आणि सुज्ञानी माणसाच्या हातून त्यांची सुस्थिती दीर्घकाळ राहते.

[3] जो राज्य करणारा पुरुष गरिबांना जाचतो, तो काहीहीअन्न न ठेवणाऱ्या पावसासारखा आहे.

[4] जे कोणी नियम मोडणारे ते दुर्जनांची स्तुती करतात, पण जे नियम पाळतात ते त्यांच्याविरुद्ध लढतात.

[5] दुष्ट मनुष्यांना न्याय समजत नाही, पण जे परमेश्वरास शोधतात त्यांना सर्वकाही कळते.

[6] श्रीमंत पुरुष असून त्याचे मार्ग वाकडे असण्यापेक्षा, गरीब पुरुष असून जो त्याच्या प्रामाणिकपणात चालतो तो उत्तम आहे.

[7] जो कोणी मुलगा नियमाचे पालन करतो तो हुशार असतो, पण जो खादाडाचा सोबती आहे तो आपल्या वडिलांना लाज आणतो.

[8] जो कोणी आपले धन खूप जास्त व्याज लावून वाढवतो त्याची संपत्ती जो कोणी गरिबांवर दया करतो त्या दुसऱ्यासाठी साठवतो.

[9] जर एखाद्याने आपला कान नियम ऐकण्यापासून दूर फिरवला, त्याची प्रार्थनासुद्धा वीट आणणारी होईल.

[10] जो कोणी सरळांना बहकावून वाईट मार्गाकडे नेईल, तो आपल्या स्वतःच्या खड्ड्यात पडेल, पण जे निर्दोष आहेत त्यांना चांगले वतन मिळेल.

[11] श्रीमंत मनुष्य आपल्या स्वतःच्या दृष्टीने शहाणा असतो, पण गरीब मनुष्य ज्याला समंजसपणा आहे त्यास शोधून काढतो.

[12] नीतिमानांचा विजय होतो तेव्हा तेथे मोठा नावलौकिक होतो, पण जेव्हा दुर्जन उठला, म्हणजे लोक स्वतः लपून बसतात.

[13] एखाद्याने आपले पाप लपवले तर त्याची उन्नती होत नाही, पण एखाद्याने त्याच्या पापांची कबुली दिली आणि ते सोडून दिले तर त्याच्यावर दया दाखवण्यात येईल.

[14] जर एखादा व्यक्ती वाईट करण्यात नेहमी घाबरतो तो सुखी आहे, पण जो कोणी आपले हृदय कठोर करतो तो संकटात पडतो.

[15] गरीब लोकांवर राज्य करणारा दुष्ट अधिकारी, गर्जणाऱ्या सिंहासारखा किंवा हल्ला करणाऱ्या अस्वलासारखा आहे.

[16] जो कोणी अधिकारी ज्ञानहीन असतो तो क्रूर जुलूम करणारा आहे, पण जो अप्रामाणिकपणाचा द्वेष करतो तो दिर्घायुषी होतो.

[17] जर एखादा मनुष्य रक्तपाताचा अपराधी आहे तर तो शवगर्तेत आश्रय शोधेल, पण त्यास कोणीही परत आणणार नाही. आणि त्यास कोणीही मदत करणार नाही.

[18] जो सरळ मार्गाने चालतो तो सुरक्षित राहतो, पण ज्याचे मार्ग वाकडे आहेत तो अचानक पडतो.

[19] जो कोणी आपली शेती स्वतः करतो त्यास विपुल अन्न मिळते, पण जो कोणी निरर्थक गोष्टींचा पाठलाग करतो त्यास विपुल दारिद्र्य येते.

[20] विश्वासू मनुष्यास महान आशीर्वाद मिळतात, पण जो कोणी झटपट श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतो त्यास शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही.

[21] पक्षपात दाखवणे हे चांगले नाही, तरी भाकरीच्या तुकड्यासाठी मनुष्य चुकीचे करील.

[22] कंजूस मनुष्य श्रीमंत होण्याची घाई करतो, पण आपणावर दारिद्र्य येईल हे त्यास कळत नाही.

[23] जो कोणी आपल्या जिभेने खोटी स्तुती करतो; त्याऐवजी जो कोणी धिक्कारतो त्यालाच नंतर अधिक अनुग्रह मिळेल.

[24] जो कोणी आपल्या आई वडिलांना लुटतो आणि म्हणतो “ह्यात काही पाप नाही,” पण जो कोणी नाश करतो त्याचा तो सोबती आहे.

[25] लोभी मनुष्य संकटे निर्माण करतो, पण जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याची भरभराट होते.

[26] जो कोणी आपल्या हृदयावर भरवसा ठेवतो तो मूर्ख आहे, पण जो कोणी ज्ञानात चालतो तो धोक्यापासून दूर राहतो.

[27] जो कोणी गरीबाला देतो त्यास कशाचीही उणीव पडणार नाही, पण जो कोणी त्यांना पाहूनदेखील न पाहिल्यासारखे करतो त्याच्यावर खूप शाप येतील.

[28] जेव्हा दुष्ट उठतात, माणसे स्वतःला लपवतात, पण जेव्हा दुष्ट नष्ट होतात तेव्हा नीतिमान वाढतात.

नीतिसूत्रे — Chapters