Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 3:11

[1] ज्याची वाणी कुटिल असून जो मूर्ख आहे त्याच्यापेक्षा जो कोणी गरीब मनुष्य आपल्या सात्विकपणाने चालतो तो उत्तम आहे.

[2] ज्ञानाशिवाय इच्छा असणे सुद्धा चांगले नाही, आणि जो कोणी उतावळ्या पायांचा आहे तो वाट चुकतो.

[3] मनुष्याचा मूर्खपणा त्याच्या आयुष्याचा नाश करतो, आणि त्याचे मन परमेश्वराविरूद्ध संतापते.

[4] संपत्ती खूप मित्रांची भर घालते, पण गरीब मनुष्याचे मित्र त्याच्यापासून वेगळे होतात.

[5] खोटा साक्षीदार शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही, आणि जो कोणी लबाड्या करतो तो सुटणार नाही.

[6] उदार मनुष्यापासून पुष्कळ लोक मदतीसाठी विचारणा करतात; आणि जो कोणी दान देतो त्याचा प्रत्येकजण मित्र आहे.

[7] गरीब मनुष्याचे सर्व बंधू त्याचा द्वेष करतात, तर मग त्याचे मित्र त्याच्यापासून किती तरी दूर जाणार! तो बोलत त्यांच्या पाठोपाठ जातो पण ते निघून जातात.

[8] जो कोणी ज्ञान मिळवतो तो आपल्या जिवावर प्रेम करतो, जो कोणी सुज्ञता सांभाळतो त्यास जे काही चांगले आहे ते मिळेल.

[9] खोटी साक्ष देणाऱ्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही, पण जो कोणी लबाड्या करतो त्याचा नाश होईल.

[10] मूर्खाला आलिशानपणा शोभत नाही, तसे सरदारांवर राज्य करणे गुलामाला कितीतरी कमी शोभते.

[11] बुद्धीने मनुष्य रागास मंद होतो, आणि अपराधाकडे दुर्लक्ष करणे त्याची शोभा आहे.

[12] राजाचा राग सिंहाच्या गर्जनेसारखा आहे, पण त्याचा उपकार गवतावर पडलेल्या दहिवरासारखे आहे.

[13] मूर्ख मुलगा आपल्या वडिलांना अरिष्टासारखा आहे; आणि भांडखोर पत्नी सतत गळणाऱ्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे आहे.

[14] घर व संपत्ती आईवडीलांकडून आलेले वतन आहे, पण समंजस पत्नी परमेश्वरापासून आहे.

[15] आळशीपणा आपणाला गाढ झोपेत टाकतो, पण ज्याला काम करण्याची इच्छा नाही तो उपाशी जातो.

[16] जो कोणी आज्ञा पाळतो तो आपल्या जीवाचे रक्षण करतो, पण जो मनुष्य आपल्या मार्गाविषयी विचार करत नाही तो मरेल.

[17] जो कोणी गरीबावर दया करतो तो परमेश्वरास उसने देतो, आणि तो त्याने जे काही केले त्याची परतफेड करील.

[18] काही आशा असेल तर आपल्या मुलाला शिक्षा कर, आणि त्याच्या मरणाची तुझ्या जिवाला काळजी वाटू देऊ नको.

[19] रागीट मनुष्याला दंड दिला पाहिजे; जर तुम्ही त्यास सोडवले, तर तुम्हास दुसऱ्या वेळेसही सोडवावे लागेल.

[20] सल्ला ऐक आणि शिक्षण स्वीकार, म्हणजे तू आपल्या आयुष्याच्या शेवटी सुज्ञान होशील.

[21] मनुष्याच्या मनात बऱ्याच योजना येतात, पण परमेश्वराचे उद्देश स्थिर राहतील.

[22] प्रामाणिकपणा ही मनुष्याची इच्छा असते; आणि खोटे बोलणाऱ्यापेक्षा गरीब चांगला.

[23] परमेश्वरास आदर द्या तो त्यास पात्र आहे; आणि तो जीवनाकडे नेतो, आणि ज्या कोणाकडे ते आहे तो समाधानी आहे, आणि त्याची संकटांनी हानी होणार नाही.

[24] आळशी आपला हात ताटात घालतो, आणि तो पुन्हा आपल्या तोंडाकडेसुद्धा घेऊन जात नाही.

[25] निंदकाला तडाखा मार म्हणजे भोळा समंजस होईल, बुद्धिमानाला शब्दाचा मारा कर म्हणजे त्यास ज्ञान कळेल.

[26] जो कोणी आपल्या पित्याला लुटतो, व आईला हाकलून लावतो, तो मुलगा लाज आणि दोष आणणारा आहे.

[27] माझ्या मुला, जर तू सूचना ऐकण्याचे थांबवले तर ज्ञानाच्या वचनापासून भटकशील.

[28] भ्रष्ट साक्षीदार न्यायाची थट्टा करतो आणि वाईटाचे मुख अन्याय गिळून टाकते.

[29] निंदकासाठी धिक्कार आणि मूर्खाच्या पाठीसाठी फटके तयार आहेत.

नीतिसूत्रे — Chapters