[1] द्राक्षरस चेष्टा करणारा आहे आणि मादक पेय भांडखोर आहे; पिण्याने झिंगणारा शहाणा नाही.
[2] राजाचा राग सिंहगर्जनेसारखा असतो; जो त्यास राग आणतो तो आपल्याच जीवाविरूद्ध पाप करतो.
[3] जो कोणी भांडण टाळतो त्यास आदर आहे, पण प्रत्येक मूर्ख वादविवादात उडी मारतो.
[4] आळशी मनुष्य हिवाळा लागल्यामुळे नांगरीत नाही, तो हंगामाच्या वेळी पिक शोधेल पण त्यास काहीही मिळणार नाही.
[5] मनुष्याच्या मनातील योजना खोल पाण्यासारख्या असतात; पण समजदार मनुष्य त्या बाहेर काढतो.
[6] बरेच व्यक्ती विश्वासू असल्याची घोषणा करतात, पण जो कोणी विश्वासू आहे त्या व्यक्तीस कोण शोधून काढेल? पण खरोखरच असा व्यक्ती सापडणे कठीण असते.
[7] जो कोणी मनुष्य चांगले करतो त्याच्या प्रामाणिकतेने चालतो, आणि त्याच्या मागे त्याची मुले त्यास अनुसरतात आणि ते सुखी होतात.
[8] जेव्हा राजा राजासनावर बसून न्यायनिवाड्याचे कार्य करतो, तो आपल्या डोळ्यांनी सर्व वाईट गोष्टी उडवून टाकतो.
[9] मी आपले हृदय शुद्ध केले आहे, मी आपल्या पापापासून मोकळा झालो आहे असे कोण म्हणू शकेल?
[10] भिन्नभिन्न अशी खोटी वजने आणि असमान मापे, या दोन्हींचा परमेश्वरास तिरस्कार आहे.
[11] तरुणसुध्दा आपल्या कृतीने आपली वर्तणूक शुद्ध आणि सरळ आहे की नाही ते दाखवतो.
[12] ऐकणारे कान आणि बघणारे डोळे, हे दोन्ही परमेश्वरानेच केले आहेत.
[13] झोपेची आवड धरू नकोस, धरशील तर दरिद्री होशील; आपले डोळे उघड आणि तुला भरपूर खायला मिळेल.
[14] विकत घेणारा म्हणतो, वाईट! वाईट! परंतु जेव्हा तो तेथून निघून जातो तो फुशारकी मारतो.
[15] तेथे सोने आहे आणि विपुल किंमती खडे आहेत, पण ज्ञानमय वाणी मोलवान रत्न आहेत.
[16] जो अनोळख्याला जामीन राहतो त्याचे वस्त्र ठेवून घे, जेव्हा तो परक्यास जामीन झाला आहे म्हणून त्यास तारणादाखल ठेव.
[17] कपटाची भाकर गोड लागते, पण त्यानंतर त्याचे तोंड सर्व वाळूंनी भरेल.
[18] सल्ल्याद्वारे योजना प्रस्थापित होतात, म्हणून केवळ ज्ञानाच्या मार्गदर्शनाने लढाई चालू कर.
[19] लावालावी करणारा गुप्त गोष्टी प्रगट करतो, म्हणून बडबड करणाऱ्यांची संगत धरू नकोस.
[20] जर एखादा मनुष्य आपल्या आईला किंवा वडिलांना शाप देईल, तर त्याचा दीप अंधारात विझून जाईल.
[21] सुरवातीला उतावळीने मिळवलेल्या संपत्तीचा शेवट आशीर्वादित होणार नाही.
[22] मी चुकीच्या बदल्यात परतफेड करीन असे म्हणू नकोस, परमेश्वराची वाट पाहा आणि तो तुझे रक्षण करील.
[23] असमान वजनाचा परमेश्वरास तिरस्कार आहे आणि अप्रामाणिक तराजू चांगले नाही.
[24] मनुष्याच्या पावलास परमेश्वर वाट दाखवतो. तर कोणत्या मार्गाने जावे हे त्यास कसे कळेल?
[25] हे पवित्र आहे असे उतावळीने म्हणणे व असला नवस केल्यावर मग विचार करीत बसणे हे मनुष्याने पाशात पडणे होय.
[26] सुज्ञ राजा दुष्टांना पाखडून टाकतो, आणि मळणी करण्याचे चक्र त्यांच्यावर फिरवतो.
[27] मनुष्याचा आत्मा परमेश्वराचा दीप होय, तो त्याच्या अंतर्यामाच्या सर्व भागांचा शोध घेतो.
[28] कराराचा प्रामाणिपणा आणि विश्वसनियता राजाचे रक्षण करतात, तो प्रेमाने राजासन बळकट करतो.
[29] तरुण मनुष्याचे वैभव त्याचे बळ आहे. आणि पिकलेले केस वृद्धाचे सौंदर्य आहे.
[30] जखम करणारे घाय आणि वर्मी लागणारे फटके दुष्टतेचे क्षालन करतात.