Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 2:44

[1] माझ्या मुला, माझे शब्द जपून ठेव, आणि माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेव.

[2] माझ्या आज्ञा पाळ आणि जिवंत रहा, आणि माझे शिक्षण डोळ्यातील बाहुलीप्रमाणे जप.

[3] ती आपल्या बोटांस बांध; ती आपल्या हृदयाच्या पाटीवर लिहून ठेव.

[4] “तू माझी बहीण आहेस” असे ज्ञानाला म्हण, आणि सुज्ञतेला आपले नातेवाईक म्हण,

[5] अशासाठी की, भुरळ घालणाऱ्या स्त्रीपासून, ते तुला व्यभिचारी स्त्रीच्या गोड शब्दांपासून वाचवतील.

[6] माझ्या घराच्या खिडकीजवळील जाळ्यातून मी बाहेर पाहिले;

[7] आणि मी पुष्कळ भोळे तरुण पाहिले. मला तरुणांमध्ये एक तरुण दिसला, जो बुद्धिहीन मनुष्य होता.

[8] तो तरुण मनुष्य तिच्या कोपऱ्याजवळून जाणाऱ्या वाटेने जात होता, आणि तो तिच्या घराकडे,

[9] त्या दिवशी संध्याकाळी संधीप्रकाशात, रात्रीच्यावेळी आणि अंधकारात गेला.

[10] आणि तेथे ती स्त्री त्यास भेटली, वेश्येसारखा पोशाख केलेली आणि ती तेथे कशासाठी आहे हे तिला माहित होते.

[11] ती वाचाळ व स्वच्छंदी असून, तिचे पाय घरी राहत नाही;

[12] कधी रस्त्यात, कधी बाजारात, प्रत्येक नाक्याजवळ ती थांबून राहते.

[13] मग तिने त्यास धरले आणि त्याची चुंबने घेतली; निर्लज्जपणे ती त्यास म्हणाली,

[14] “आज मी माझी शांत्यर्पणे केली; मी आपले नवस फेडले,

[15] ह्यासाठी मी तुला भेटायला, तुझे मुख पाहायला उत्सुकतेने बाहेर आले आणि तू मला सापडला आहेस.

[16] मी आपल्या अंथरुणावर, मिसरातली रंगीत सुती चादर पसरली आहे.

[17] मी आपले अंथरुण बोळ, अगरू, दालचिनी यांनी सुवासिक केली आहे.

[18] ये, आपण सकाळपर्यंत प्रीतीने भरून तृप्त होऊ; आपण वेगवेगळ्या कृतींनी प्रेम करून महान आनंद घेऊ.

[19] माझा पती घरी नाही; तो लांबच्या प्रवासास गेला आहे.

[20] त्याने प्रवासासाठी पैश्याची पिशवीबरोबर घेतली आहे; तो पौर्णिमेच्या दिवशी परत घरी येईल.”

[21] तिने आपल्या मोहक बोलण्याने त्याचे मन वळवले; आणि आपल्या गोड बोलण्याने तिने त्यास सक्ती केली.

[22] तो तिच्यामागे चालला, जसा बैल कापला जाण्यास जातो, किंवा जसा हरीण सापळ्यात पकडला जातो,

[23] जसा पक्षी, पाशाकडे धाव घेतो, तसा हे आपल्या जीवाची किंमत घेण्यासाठी आहे हे तो जाणत नाही, किंवा तिर त्याचे काळीज भेदून जाईपर्यंत तसा तो तिच्यामागे जातो.

[24] आणि आता, माझ्या मुलांनो, माझे ऐका; मी काय सांगतो त्याकडे लक्ष द्या.

[25] तुझ्या मनाला तिच्या मार्गाकडे वळू देऊ नकोस; तिच्या वाटांनी जाऊन बहकू नकोस.

[26] कारण तिने पुष्कळांना घायाळ करून पाडले आहे, त्यांची संख्या मोजू शकत नाही.

[27] तिचे घर म्हणजे अधोलोकाकडचा मार्ग आहे; तो मृत्यूच्या खोल्यांकडे खाली उतरून जातो.

नीतिसूत्रे — Chapters