[1] जो कोणी आपणास वेगळा करतो तो स्वतःची इच्छा पूर्ण करायला पाहतो; आणि तो सर्व स्वस्थ सुज्ञतेविरूद्ध लढतो.
[2] मूर्खाला समंजसपणात आनंद मिळत नाही, पण केवळ आपल्या मनात काय आहे हे प्रगट करण्यात त्यास आनंद आहे.
[3] जेव्हा वाईट मनुष्य येतो, त्याच्याबरोबर तिरस्कार येतो, निर्भत्सना आणि लाज त्यासह येतात.
[4] मनुष्याच्या मुखाचे शब्द खोल पाण्यासारखे आहेत; ज्ञानाचा झरा वाहणाऱ्या प्रवाहासारखे आहेत.
[5] जे कोणी चांगले करतात त्यांचा न्याय विपरित करण्यासाठी, दुष्टाचा पक्ष धरणे चांगले नाही.
[6] मूर्खाचे ओठ त्यास भांडणात पाडतात, आणि त्याचे मुख मारास आमंत्रण देते.
[7] मूर्खाचा नाश त्याच्या तोंडामुळे होतो, आणि त्याचे ओठ त्यास स्वतःला पाश होतात.
[8] गप्पागोष्टी करणाऱ्याचे शब्द स्वादिष्ट पक्वान्नासारखे आहेत, आणि ते अगदी खोल पोटात शिरतात.
[9] जो कोणी आपल्या कामात निष्काळजी आहे तो नाश करणाऱ्याचा भाऊ आहे.
[10] परमेश्वराचे नाव बळकट बुरुजाप्रमाणे आहे; नीतिमान त्यामध्ये धावत जातो आणि सुरक्षित राहतो.
[11] श्रीमंताची संपत्ती त्याचे बळकट नगर आहे; आणि त्याच्या कल्पनेने तो उंच भींतीसारखा आहे.
[12] मनुष्याच्या नाशापूर्वी त्याचे अंतःकरण गर्विष्ठ असते, पण गौरवापूर्वी विनम्रता येते.
[13] जो कोणी ऐकण्यापूर्वी उत्तर देतो, त्याचे ते करणे मूर्खपणाचे आणि लज्जास्पद असते.
[14] आजारपणात मनुष्याचा आत्मा जिवंत राहतो, पण तुटलेला आत्मा कोणाच्याने सोसवेल?
[15] सुज्ञाचे मन ज्ञान प्राप्त करून घेते, आणि शहाणा ऐकून ते शोधून काढतो.
[16] मनुष्याचे दान त्याच्यासाठी मार्ग उघडते, आणि महत्वाच्या मनुष्यांसमोर त्यास आणते.
[17] जो सुरुवातीला आपली बाजू मांडतो तो बरोबर आहे असे वाटते, पण त्याचा प्रतिस्पर्धी येऊन त्यास प्रश्र विचारतो.
[18] चिठ्ठ्या टाकल्याने भांडणे मिटतात, आणि बलवान प्रतिस्पर्धी वेगळे होतात.
[19] दुखवलेल्या भावाची समजूत घालणे हे बळकट तटबंदी असलेले शहर जिंकण्यापेक्षा कठीण आहे. आणि भांडणे राजवाड्याच्या अडसरासारखे आहेत.
[20] मनुष्याचे पोट त्याच्या मुखाच्या फळाने भरेल, तो आपल्या ओठांच्या पीकाने तृप्त होईल.
[21] जीवन किंवा मरण ही जीभेच्या अधिकारात आहेत; आणि ज्या कोणाला ती प्रिय आहे तो तिचे फळ खातो.
[22] ज्या कोणाला पत्नी मिळते त्यास चांगली वस्तू मिळते, आणि त्यास परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो.
[23] गरीब मनुष्य दयेची विनवणी करतो, पण श्रीमंत मनुष्य कठोरपणाने उत्तर देतो.
[24] जो कोणी पुष्कळ मित्र करतो तो आपल्याच नाशासाठी ते करतो, परंतु एखादा असा मित्र असतो की तो आपल्या भावापेक्षाही आपणांस धरून राहतो.