[1] मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे, पण त्याच्या जिव्हेचे उत्तर देणे परमेश्वराकडचे आहे.
[2] मनुष्याच्या दृष्टीने त्याचे सर्व मार्ग शुद्ध असतात, पण परमेश्वर आत्मे तोलून पाहतो.
[3] आपली कामे परमेश्वराच्या स्वाधीन करा, आणि म्हणजे तुमच्या योजना यशस्वी होतील.
[4] परमेश्वराने सर्वकाही त्याच्या उद्देशासाठी बनवलेले आहे, दुर्जनदेखील अरिष्टाच्या दिवसासाठी केलेला आहे.
[5] प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वरास वीट आहे, जरी ते हातात हात घालून उभे राहिले, तरी त्यांना शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही.
[6] कराराचा प्रामाणिकपणा व विश्वसनीयता ह्यांच्या योगाने पापांचे प्रायश्चित होते, आणि परमेश्वराचे भय धरल्याने, लोक वाईटापासून वळून दूर राहतील.
[7] मनुष्याचे मार्ग परमेश्वरास आवडले म्हणजे, त्या मनुष्याच्या शत्रूलाही त्याच्याशी समेट करण्यास भाग पाडतो.
[8] अन्यायाने मिळवलेल्या मोठ्या मिळकतीपेक्षा, न्यायाने कमावलेले थोडेसे चांगले आहे.
[9] मनुष्याचे मन त्याच्या मार्गाची योजना करते, पण परमेश्वर त्याच्या पावलांना वाट दाखवतो.
[10] दैवी निर्णय राजाच्या ओठात असतात, न्याय करताना त्याच्या मुखाने कपटाने बोलू नये.
[11] परमेश्वराकडून प्रामाणिक मोजमाप येते; पिशवीतील सर्व वजने त्याचे कार्य आहे.
[12] जेव्हा राजा वाईट गोष्टी करतो, त्या गोष्टी त्यास तिरस्कारणीय आहेत, कारण राजासन नीतिमत्तेनेच स्थापित होते.
[13] नीतिमत्तेने बोलणाऱ्या ओठाने राजाला आनंद होतो, आणि जे कोणी सरळ बोलतात ते त्यास प्रिय आहेत.
[14] राजाचा क्रोध मृत्यू दूतांसारखा आहे. पण सुज्ञ मनुष्य त्याचा राग शांत करण्याचा प्रयत्न करतो.
[15] राजाच्या मुखतेजात जीवन आहे, आणि त्याचा अनुग्रह शेवटल्या पावसाच्या मेघासारखा आहे.
[16] सोन्यापेक्षा ज्ञान प्राप्त करून घेणे किती तरी उत्तम आहे. रुप्यापेक्षा समजुतदारपणा निवडून घ्यावा.
[17] दुष्कर्मापासून वळणे हा सरळांचा राजमार्ग आहे, जो आपल्या मार्गाकडे लक्ष ठेवतो तो आपला जीव राखतो.
[18] नाशापूर्वी गर्व येतो, आणि मनाचा ताठा अधःपाताचे मूळ आहे.
[19] गर्विष्ठांबरोबर राहून लूट वाटून घेण्यापेक्षा दीनांबरोबर विनम्र असणे चांगले.
[20] जो कोणी जे काही चांगले आहे ते शोधतो, त्यास शिकवीले त्याचे निरीक्षण करतो, आणि जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो आनंदीत होतो.
[21] जो मनाचा सुज्ञ त्यास समंजस म्हणतात, आणि मधुर वाणीने शिकवण्यची क्षमता वाढते.
[22] ज्यांच्याकडे सुज्ञान आहे त्यास ती जीवनाचा झरा आहे, पण मूर्खाचे मूर्खपण त्याची शिक्षा आहे.
[23] सुज्ञ मनुष्याच्या हृदयापासून त्याच्या मुखास शिक्षण मिळते; आणि त्याच्या वाणीत विद्येची भर घालते.
[24] आनंदी शब्द मधाचे पोळ अशी आहेत, ती जिवाला गोड व हाडांस आरोग्य आहेत.
[25] मनुष्यास एक मार्ग सरळ दिसतो, पण त्याचा शेवट मृत्यूमार्गाकडे आहे.
[26] कामगाराची भूक त्याच्यासाठी काम करते; त्याची भूक त्यास ते करायला लावते.
[27] नालायक मनुष्य खोड्या उकरून काढतो, आणि त्याची वाणी होरपळणाऱ्या अग्नीसारखी आहे.
[28] कुटिल मनुष्य संघर्ष निर्माण करतो, आणि निंदा करणाऱ्या जवळच्या मित्रांना वेगळे करतो.
[29] जुलमी मनुष्य आपल्या शेजाऱ्याशी लबाड बोलतो, आणि जो मार्ग चांगला नाही अशात त्यास नेतो.
[30] जो कोणी मनुष्य कुटिल गोष्टीच्या योजणेला डोळे मिचकावतो; जो आपले ओठ आवळून धरतो तो दुष्कर्म घडून आणतो.
[31] पिकलेले केस वैभवाचा मुकुट आहे; नीतिमत्तेच्या मार्गाने चालण्याने तो प्राप्त होतो.
[32] ज्याला लवकर राग येत नाही तो योद्धापेक्षा, आणि जो आत्म्यावर अधिकार चालवतो तो नगर जिंकऱ्यापेक्षा उत्तम आहे.
[33] पदरात चिठ्ठ्या टाकतात, पण त्यांचा निर्णय सर्वस्वी परमेश्वराकडून आहे.