[1] सुज्ञ मुलगा आपल्या पित्याचे शिक्षण ऐकतो, परंतु निंदक निषेध ऐकत नाही.
[2] आपल्या तोंडच्या फळांनी मनुष्य चांगल्या गोष्टींचा आनंद घेतो, पण अविश्वासणाऱ्याची भूक जुलूम आहे.
[3] जो आपले तोंड सांभाळतो तो आपल्या जीवाचे रक्षण करतो, परंतु जो आपले तोंड उघडतो तो स्वतःचा नाश करून घेतो.
[4] आळशाची भूक हाव धरते पण त्यास काही मिळत नाही, पण उद्योग्याची भूक पूर्णपणे तृप्त होते.
[5] नीतिमान लबाडीचा तिरस्कार करतो, पण दुर्जन जे लाजिरवाणे आहे ते करतो, आणि स्वतःला किळसवाणे करतो.
[6] नीतिमत्ता सात्विक मार्गाने चालणाऱ्यांचे रक्षण करते, पण पाप्याला त्याचे पाप उलथून टाकते.
[7] जो कोणी आपणाला संपन्न करतो, पण त्यांच्याजवळ मात्र काहीच नसते, आणि जो कोणी सर्वकाही देऊन टाकतो, खरोखर तो अजून श्रीमंत आहे.
[8] श्रीमंत मनुष्यास जिवाची खंडणी त्याची संपत्ती आहे, पण गरीब मनुष्यास अशा प्रकारच्या धमक्या कधीच मिळत नाहीत.
[9] नीतिमानाचा प्रकाश आनंदाने प्रकाशतो, पण दुष्टाचा दीप मालवला जाईल.
[10] गर्वामुळे भांडण मात्र उत्पन्न होतात, पण जो चांगला सल्ला ऐकतो त्याच्याजवळ ज्ञान असते.
[11] वाईट मार्गाने मिळवलेले धन कमी होत जाते, पण जो आपल्या हाताने काम करून पैसा कमावतो, त्याचा पैसा वाढत जातो.
[12] जेव्हा आशा लांबणीवर पडते तेव्हा अंतःकरण तुटते, परंतु इच्छा पूर्ण होते तेव्हा ते जीवनाचे झाड आहे.
[13] जो कोणी शिक्षणाचा तिरस्कार करतो तो स्वतःवर अनर्थ आणतो, पण जो कोणी आज्ञेचा आदर करतो त्यास प्रतिफळ मिळेल.
[14] सुज्ञाची शिकवण जीवनाचा झरा आहे, ते तुम्हास मृत्युपाशापासून दूर वळविल.
[15] सुबोध अनुग्रह मिळवून देतो, पण विश्वासघातक्याचा मार्ग कधी न संपणारा आहे.
[16] शहाणा मनुष्य कृती करण्याआधी विचार करतो. परंतु मूर्ख मनुष्य त्याच्या कृतीने तो मूर्ख आहे हे दर्शवितो.
[17] दुष्ट निरोप्या संकटात पडतो, पण विश्वासू वकील समेट घडवून आणतो.
[18] जर एखाद्याने शिकायला नकार दिला तर त्यास गरीबी आणि लाज प्राप्त होईल, पण जर एखादा त्याच्या शासनातून शिकला तर त्याचा सन्मान होईल.
[19] इच्छातृप्ती जिवाला गोड लागते, पण वाईटापासून दूर होणे याचा मूर्खांना द्वेष वाटतो.
[20] शहाण्या लोकांबरोबर चाला म्हणजे तुम्ही शहाणे व्हाल, पण जर तुम्ही मूर्खांशी संगत केली तर तुम्ही संकटात पडाल.
[21] आपत्ती पाप्याच्या पाठीस लागते, पण जे कोणी चांगले करतो त्यास प्रतिफळ मिळते.
[22] चांगला मनुष्य आपल्या नातवंडांना वतन देऊन ठेवतो, पण पाप्यांची संपत्ती नीतिमानासाठी साठवलेली असते.
[23] गरीबांचे नांगरलेले शेत विपुल अन्न देते, पण अन्यायामुळे अनेकांचा नाश होतो.
[24] जर कोणी आपल्या मुलांना शिक्षा करत नाही तो त्यांचा द्वेष करतो, पण जो कोणी आपल्या मुलांवर प्रेम करतो तो काळजीपूर्वक त्यांना शिस्त लावतो.
[25] जो चांगले करतो तो त्याची भूक तृप्त होईपर्यंत जेवतो, पण दुष्टांचे पोट रिकामेच राहते.