[1] मग ईयोब उत्तर देऊन म्हणाला,
[2] “तू जे काही म्हणत आहेस ते खरे असल्याची जाणीव मला आहे, परंतु देवापुढे मनुष्य कसा बरोबर ठरेल?
[3] मनुष्य देवाशी वाद घालू शकत नाही. देव हजार प्रश्न विचारु शकतो आणि मनुष्यास त्याच्या एकाही प्रश्नाचे उत्तर देता येत नाही.
[4] देव खूप विद्वान आहे आणि त्याची शक्ती अमर्याद आहे. देवाचे मन कठीण करून कोण निभावेल?
[5] तो क्रोधित झाला की पर्वत हलवतो आणि लोकांस ते कळत देखील नाही.
[6] तो पृथ्वीचा थरकाप करण्यासाठी भूकंप पाठवतो. आणि पृथ्वीचा पायाच हलवून टाकतो.
[7] तोच तो देव आहे, जो सूर्याला उगवू नये म्हणून सांगतो आणि तो उगवत नाही, आणि ताऱ्यांनी चमकू नये म्हणून तो लपवून ठेवतो.
[8] त्याने एकट्याने आकाश निर्माण केले. तो सागराच्या लाटांवर चालतो.
[9] देवाने सप्तर्षि, मृगश्रीष व कृत्तिका यांना निर्माण केले. दक्षिणेकडचे आकाश ओलांडणारे ग्रहही त्यानेच निर्माण केले.
[10] तोच देव आहे ज्याने आश्यर्यकारक अनाकलनीय गोष्टीही निर्मिल्या. खरोखरच देवाच्या अद्भुत कृत्यांची सीमा नाही.
[11] पाहा, देव जेव्हा माझ्या जवळून जातो तेव्हा मी त्यास बघू शकत नाही. तो जातो तरी त्याची महानता मला समजत नाही.
[12] देवाने जरी काही घेतले तरी त्यास कोणीही अडवू शकत नाही. तू काय करीत आहेस? असे त्यास कोणी विचारु शकत नाही.
[13] देव त्याचा क्रोध काबूत ठेवणार नाही. राहाबाचे मदतनीससुध्दा त्यास घाबरतात.
[14] म्हणून मी देवाशी वाद घालू शकत नाही. त्याच्याशी काय बोलावे ते मला सुचणार नाही.
[15] मी निष्पाप आहे, पण मी त्यास उत्तर देऊ शकणार नाही. मी केवळ माझ्या देवाची कृपादृष्टी मिळावी म्हणून याचना करु शकतो.
[16] मी हाक मारल्यानंतर त्याने उत्तर दिले असते. तरी त्याने माझे ऐकलेच अशी माझी खात्री झाली नसती.
[17] तो मला चिरडण्यासाठी वादळे पाठवील. आणि काहीही कारण नसता तो मला जखमा देईल.
[18] तो मला माझा श्वास परत घेऊ देणार नाही. म्हणून तो मला अधिक कष्ट देईल.
[19] कोण शक्तीमान आहे जर आपण बोलतो तर देव सर्वशक्तिमान आहे, आणि जर आपण न्याया विषयी बोलतो, तर त्यास न्यायालयात कोणी आणू शकेल काय?
[20] मी धर्मी जरी असलो, माझेच मुख मला अपराधी बनवते. मी परिपूर्ण जरी असलो, तरी पण माझे बोलणेच माझी अपूर्णता प्रमाणीत करते.
[21] मी निष्पाप आहे, पण काय विचार करावा ते मला कळत नाही. मी माझ्याच आयुष्याचा धिक्कार करतो.
[22] मी स्वत:शीच म्हणतो: सगळ्याच्याच बाबतीत हे घडते. पापी लोकांसारखेच निष्पाप लोकही मरतात. देवच सगळ्यांचे जीवन संपवतो.
[23] काहीतरी भयानक घडते आणि निष्पाप मनुष्य मरतो तेव्हा देव त्यास फक्त हसतो का?
[24] जेव्हा एखादा वाईट मनुष्य सत्ता बळकावतो तेव्हा जे घडते आहे ते बघण्यापासून देव पुढाऱ्यांना दूर ठेवतो जर नाही, तर तो कोण आहे जो असे करतो?
[25] माझे दिवस एखाद्या धावपटू पेक्षाही वेगाने धावतात. माझे दिवस उडून जातात, त्यामध्ये कुठेही सुख दिसत नाही.
[26] लव्हाळाची बनवलेली बोट जशी वेगात जाते तसे माझे दिवस वेगात सरतात. गरुडाने आपल्या भक्ष्यावर झडप घालावी त्याप्रमाणे माझे दिवस अतिशय वेगात जातात.
[27] मी जरी म्हणालो, की माझे दु:ख विसरेन, मी चेहऱ्यावर हास्य आणेन, मी तक्रार करणार नाही. आणि आनंदी होईल.
[28] मला माझा दु:खाचे भय वाटायला हवे. कारण मला माहित आहे, निर्दोष गनणार नाहीस.
[29] मी आधीच अपराधी ठरवला गेलो आहे. मग प्रयत्न तरी कशाला करायचे?
[30] मी माझे अंग बर्फाने धुतले आणि हात साबणाने स्वच्छ केले.
[31] तरीही देव मला घाणीच्या खड्ड्यात ढकलेल. नंतर माझे स्वत:चे कपडे देखील माझा तिरस्कार करतील.
[32] देव माझ्यासारखा मनुष्य नाही. म्हणूनच मी त्यास उत्तर देऊ शकत नाही. आम्ही न्यायालयात एकमेकांना भेटू शकणार नाही.
[33] आमच्यात कोणी असा न्यायाधीश नाही. जो आम्हा दोघांना सारख्याच न्यायाने तोलेल.
[34] देवाच्या शिक्षेची छडी माझ्यापासून दूर करणारा कोणी न्यायाधीश नाही त्याच्या धाकामुळे मला भयभीत होण्यापासून वाचवणारा कोणी नाही.
[35] असे जर झाले तर देवाला न घाबरता मला जे काही म्हणायचे आहे ते मी म्हणू शकेन. परंतु आता मात्र मी तसे करु शकत नाही.”