[1] नंतर ईयोबाने उत्तर दिले आणि म्हणाला,
[2] “बलहिन असलेल्यास तू कसे साहाय्य केले, शक्ती नसलेल्या बाहूंना तू कसे सोडविले.
[3] बुध्दीनसलेल्यास तू कसा सल्ला दिलास, आणि तू त्यास केवढे ज्ञान कळविले.
[4] तू कोणाच्या साह्यायाने हे शब्द बोललास? तुझ्यातुन कोणाचे मन प्रगट झाले.
[5] बिल्ददने उत्तर दिले, मृत झालेल्याची प्रेते जलनिधीच्या खाली निर्जनस्थळी थरथरा कापत आहेत.
[6] देवापुढे अधोलोक नग्न आहे, त्याच्यापुढे विनाशस्थान स्वत:ला झाकून घेवू शकत नाही.
[7] त्याने उत्तरेकडील नभोमंडळ शुन्य आकाशावर पसरवले आहे, आणि त्याने पृथ्वी निराधार टांगली आहे.
[8] तिच्या गडद मेघात तो पाणी बांधून ठेवतो, तरी त्याच्या ओझ्याने मेघ फाटत नाही.
[9] तो चंद्राचा चेहरा झाकतो आणि त्यावर आपले मेघ पसरवितो.
[10] त्याने पाण्याच्या पृष्ठभागावर एक वर्तुळाकार सीमा कोरली आणि प्रकाश व अंधकार यांच्यामध्ये क्षितीजरेखा आखली.
[11] त्याच्या धमकीने आकाशस्तंभ थरथरतात आणि भयचकीत होतात.
[12] तो आपल्या सामर्थ्याने समुद्र स्थिर करतो, तो आपल्या ज्ञानबलाने राहाबाला छिन्नभिन्न करतो.
[13] त्याचा नि:श्वास आकाशातील वादळ स्वच्छ करतो त्याच्या हातांनी पळून जाणाऱ्या सापाला नष्ट केले.
[14] पाहा, या त्याच्या मार्गाचा केवळ कडा आहे, किती हळूवार आम्ही त्याचे ऐकतो! परंतू त्याच्या बलाची गर्जना कोण समजू शकेल?”