Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 2:49

[1] नंतर ईयोबाने उत्तर दिले आणि म्हणाला,

[2] “या सर्व गोष्टी मी पूर्वी ऐकल्या आहेत, तुम्ही सर्व वायफळ सांत्वनकर्ते आहात.

[3] तुमची वायफळ शब्द कधीही संपत नाहीत. तुम्हास काय झाले आहे कि, तुम्ही याप्रमाणे उत्तर देता?

[4] जर तुमच्यासारखे मलाही बोलता आले असते, तर जे आता तुम्ही म्हणत आहात तेच मीही म्हणू शकलो असतो. मी तुमच्याविरुध्द शहाणपणाच्या गोष्टी सांगू शकलो असतो आणि माझे डोके तुमच्यासमोर हलवू शकलो असतो.

[5] अहो मी तुम्हास माझ्या मुखाने मी धीर दिला असता. आणि माझ्या ओठाने तुमचे सांत्वन केले असते.

[6] परंतु मी काहीही बोललो तरी माझ्या यातना कमी होत नाहीत. पण मी बोललो नाहीतर माझ्या यातना कमी कशा होणार?

[7] खरोखरच तू माझी शक्ती हिरावून घेतली आहेस. तू माझ्या सर्व कुटुंबाचा नाश केला आहेस.

[8] तू मला खूप बारीक व अशक्त केले आहे म्हणून मी अपराधी आहे असे लोकांस वाटते.

[9] देव माझ्यावर हल्ला करतो. तो माझ्यावर रागावला आहे आणि तो माझे शरीर छिन्न विछिन्न करतो. तो माझ्याविरुध्द दात खातो, माझ्या शत्रूचे डोळे माझ्याकडे तिरस्काराने बघतात.

[10] लोक माझ्या भोवती जमले आहेत. ते माझी थट्टा करतात व तोंडावर मारतात.

[11] देवाने मला दुष्ट लोकांच्या स्वाधीन केले आहे. त्याने क्रूर मनुष्यांना मला त्रास द्यायची परवानगी दिली आहे.

[12] मी अगदी मजेत होतो, पण देवाने मला चिरडून टाकले. हो त्याने माझी मान पकडली आणि माझे तुकडे तुकडे केले त्याने माझा निशाण्यासारखा उपयोग केला.

[13] त्याचे धनुर्धारी मला घेरतात. तो माझ्या कंबरेत बाण सोडतो तो दया दाखवीत नाही. तो माझे पित्ताशय धरतीवर रिकामे करतो.

[14] देव माझ्यावर पुन्हा पुन्हा हल्ला करतो. सैनिकाप्रमाणे तो माझ्यावर चाल करून येतो.

[15] मी फार दु:खी आहे म्हणून मी दु:खाचे कपडे घालतो. मी इथे धुळीत आणि राखेत बसतो आणि मला पराभूत झाल्यासारखे वाटते.

[16] रडल्यामुळे माझा चेहरा लाल झाला आहे. माझ्या पापण्यांवर मरणाची छाया आहे.

[17] तरीही माझ्या हातून कोणात्याही प्रकारची हिंसा झाली नाही, आणि माझ्या प्रार्थना शुध्द आहेत. तरी असे झाले.

[18] हे धरती, माझे रक्त लपवू नकोस. माझ्या रडण्याला विश्रांतीस्थान देऊ नकोस.

[19] स्वर्गात कदाचित् माझ्या बाजूचा कुणीतरी असेल. जो माझी त्या सर्वसमर्थासमोर हमी घेईल.

[20] माझे मित्र माझा उपहास करतात, पण माझे डोळे देवासमोर अश्रू ढाळतात.

[21] जशी एखादी व्यक्ती आपल्या मित्रासाठी वादविवाद करते तसा तो माझ्याविषयी देवाबरोबर बोलतो.

[22] जेव्हा काही वर्ष जातील, तेव्हा मी पुन्हा कधीही परतून न येणाऱ्या जागी जाणार आहे.”

ईयोब — Chapters