Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 3:06

[1] मग अलीफज तेमानीने उत्तर दिले व तो म्हणाला,

[2] “देवासाठी मनुष्य उपयुक्त होऊ शकेल काय? ज्ञानी मनुष्य देवाला उपयोगी होऊ शकतो काय?

[3] तुमच्या धार्मिक जगण्याने सर्वसमर्थाला काही आनंद होतो काय? तू चांगला राहीलास तर त्यास काही लाभ होईल काय?

[4] तो तुझा भक्तीभाव पाहून तुझा निषेध करतो आणि तुला न्यायाकडे नेतो का?

[5] तुझे पाप मोठे नाही काय? तुझ्या दुष्टाईला अंत नाही ना?

[6] तू विनाकारण आपल्या भावाचे गहाण अडकवून ठेवले, उघड्यांची वस्त्रे तू हिरावून घेतली.

[7] तू थकलेल्यास पाणी दिले नाही आणि भुकेल्या लोकांस अन्न दिले नाही.

[8] जरी तू, शक्तीमान मनुष्य असशील, सर्व भूमी तुझी असेल, जरी तू एक सन्मानीत मनुष्य असशील.

[9] तू विधवांना काहीही न देता घालवून दिले असशील, पोरक्याचे बाहू मोडले असशील.

[10] म्हणूनच तुझ्या भोवती सापळे आहेत आणि अचानक आलेल्या संकटानी तू घाबरुन जात आहेस.

[11] म्हणूनच सर्वत्र इतका अंधार आहे की तुला काही दिसत नाही आणि तू पुराच्या पाण्याने चोहोबाजूंनी वेढला आहेस.

[12] देव उंच स्वर्गात नाही काय? तारे किती उंचावर आहेत ते बघ, ते कीती उंच आहेत.

[13] आणि तू म्हणतो देवाला काय माहीती आहे? दाट अंधाराच्या आडून तो कसा न्याय करतो.

[14] दाट ढग त्यास झाकत आहेत, म्हणजे त्याने आपल्याला बघू नये.

[15] तू जूनाच मार्ग धरणार आहेस काय, ज्यावर दुष्टजण चालले.

[16] त्यांची वेळ येण्यापूर्वीच त्यांचा नाश करण्यात आला, त्यांचा पाया नदीसारखा वाहून गेला.

[17] जे देवाला म्हटले, ‘आमच्या पासून निघून जा तो सर्वशक्तिमान देव आम्हास काय करु शकतो?’

[18] आणि त्यानेच त्यांची घरे चांगल्या वस्तूंनी भरली होती. परंतू दुष्टाची योजना माझ्यापासुन दूर आहे.

[19] धार्मिक त्यांचा नाश पाहून संतोष पावतील. निर्दोष त्यांचा उपहास करतात.

[20] आणि म्हणतात खरोखरच आमच्या विरूद्ध जे उठले त्यांचा नाश झाला आहे. त्यांची संपत्ती आगीत नष्ट होत आहे.

[21] तू आता देवाला शरण जा. त्याच्याशी सलोखा कर. तू हे केलेस तर तुला खूप चांगल्या गोष्टी मिळतील.

[22] मी तुला विनंती करतो त्याच्या तोंडच्या सूचनांचा स्विकार कर. त्याचे शब्द आपल्या हृदयात ठेव.

[23] तू सर्वशक्तिमान देवाकडे परत येशील, तर तुझी बांधणी होईल. जर तू अधार्मीकता आपल्या तंबूपासून दूर ठेवशील.

[24] तुझ्याजवळ असलेल्या संपत्तीला मातीमोल मानशील, तू तुझ्या सर्वात चांगल्या ओफीरच्या सोन्याला दरीतल्या दगडाएवढी किंमत देशील.

[25] म्हणजे सर्वशक्तिमान देवच तुझे धन असा होईल आणि तो तुला मोलवान रूपे असा होईल.

[26] तेव्हा तू सर्वशक्तिमानच्या ठायी आनंद पावशील, तू तुझे मुख देवाकडे वर करशील.

[27] तू त्याची प्रार्थना करशील आणि तो तुझे ऐकेल आणि तू आपले नवस फेडशील.

[28] जी गोष्ट तू मनात आणशील तेव्हा ती सिध्दीस जाईल. प्रकाश तुझ्या मार्गात चमकेल.

[29] देव गर्वीष्ठांना नम्र करील, आणि तो नम्र लोंकाची सुटका करील.

[30] जो निर्दोष नाही त्यालाही तो वाचवतो, तुझ्या हाताच्या निर्मळतेमुळे ते बचावले जातील.”

ईयोब — Chapters