Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 6:59

[1] परमेश्वर, मोशे व अहरोन यांच्याशी पुन्हा बोलला, तो म्हणाला,

[2] इस्राएलाच्या प्रत्येक वंशजाने आपल्या सैन्याच्या निशाणाजवळ जो त्याच्या सैन्याच्या दलाचा आहे आणि लहान झेंडा तो त्याच्या वंशाला दर्शवितो त्यापाशी तळ द्यावा. त्याच्या तळाचे तोंड दर्शनमंडपाच्या समोर असावे.

[3] यहूदावंशाच्या छावणीचे निशाण उगवत्या सूर्याच्या दिशेला म्हणजे पूर्व दिशेला असावे. यहूदावंशातील सर्व लोकांनी आपली छावणी त्या निशाणाजवळ ठोकावी. अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन हा यहूदावंशाचा प्रमुख सरदार असावा.

[4] त्याच्या दलात चौऱ्याहत्तर हजार सहाशे लोक होते.

[5] इस्साखार वंशाच्या लोकांनी यहूदावंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी ठोकावी. सुवाराचा मुलगा नथनेल हा इस्साखारवंशाचा प्रमुख सरदार असावा.

[6] त्याच्या दलात चौपन्न हजार चारशे लोक होते.

[7] जबुलून वंशाच्या लोकांनीही यहूदावंशाच्या छावणीनंतर जवळच आपली छावणी उभारावी. हेलोनाचा मुलगा अलीयाब हा जबुलून वंशाचा प्रमुख सरदार असावा.

[8] त्याच्या दलात सत्तावन्न हजार चारशे लोक होते.

[9] यहूदावंशाच्या छावणीत एकूण एक लाख शहाऐंशी हजार चारशे लोक होते. ते त्यांच्या कुळाप्रमाणे विभागलेले होते. इस्राएल लोकांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे प्रवास करिताना यहूदावंशाच्या दलाने सर्वात पुढे चालावे.

[10] पवित्र निवासमंडपाच्या दक्षिण बाजूस रऊबेन वंशाच्या छावणीचे निशाण असावे. प्रत्येक गटाने आपापल्या निशाणाजवळ आपली छावणी उभारावी. शदेउराचा मुलगा अलीसूर हा रऊबेन वंशाचा प्रमुख सरदार असावा.

[11] त्याच्या दलात शेहेचाळीस हजार पाचशे लोक होते.

[12] शिमोन वंशातल्या कुळांनी रऊबेन वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी उभारावी. सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीयेल हा शिमोन वंशाचा प्रमुख सरदार असावा.

[13] त्याच्या दलात एकोणसाठ हजार तीनशे लोक होते.

[14] गादवंशाच्या कुळांनीही रऊबेन वंशाच्या छावणीजवळ आपली छावणी उभारावी. रगुवेलाचा मुलगा एल्यासाप हा गाद वंशाचा प्रमुख सरदार असावा.

[15] त्याच्या दलात पंचेचाळीस हजार सहाशे पन्नास लोक होते.

[16] रऊबेनच्या छावणीत कुळांप्रमाणे एकंदर एक लाख एकावन्न हजार चारशे पन्नास लोक होते. इस्राएल लोकांचा मुक्काम हलविताना रऊबेनच्या दलातील लोकांनी दुसऱ्या क्रमांकावर चालावे.

[17] त्यानंतर सर्व छावण्यांच्या मध्यभागी लेव्यांच्या छावणीसह दर्शनमंडप पुढे न्यावा. प्रवास करताना छावण्या ज्या क्रमाने निघतात त्याच क्रमाने मुक्काम करताना त्यांनी आपापल्या छावण्या द्याव्यात. प्रत्येक मनुष्याने आपल्या कुळाच्या निशाणाजवळ रहावे.

[18] एफ्राइम वंशाच्या छावणीचे निशाण पश्चिम बाजूस असावे व त्याच्या कुळातल्या लोकांनी आपली छावणी तेथे उभारावी. अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा एफ्राइम वंशाचा प्रमुख सरदार असावा.

[19] त्याच्या दलात चाळीस हजार पाचशे लोक होते.

[20] मनश्शे वंशाच्या दलाने एफ्राइम वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी ठोकावी. पदासुराचा मुलगा गमलीयेल हा मनश्शे वंशाचा प्रमुख सरदार असावा.

[21] त्याच्या दलात बत्तीस हजार दोनशे लोक होते.

[22] बन्यामीन वंशाच्या दलानेही एफ्राइमाच्या दलाशेजारी आपली छावणी ठोकावी. बन्यामीन वंशाचा प्रमुख सरदार गिदोनीचा मुलगा अबीदान हा असावा.

[23] त्याच्या दलात पस्तीस हजार चारशे लोक होते.

[24] एफ्राइम वंशाच्या छावणीत एकूण एक लाख आठ हजार शंभर लोक होते. इस्राएल लोकांचा मुक्काम हलविताना एफ्राइम वंशाचा तिसरा क्रमांक असावा.

[25] दान वंशाच्या छावणीचे निशाण उत्तरेकडील बाजूस असावे. त्यांच्या कुळातल्या लोकांनी आपल्या दलाची छावणी तेथे उभारावी. अम्मीशाद्दैचा मुलगा अहीएजर हा दानवंशाचा सरदार असावा.

[26] त्याच्या दलात बासष्ट हजार सातशे लोक होते.

[27] आशेर वंशाच्या दलाने दान वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी उभारावी. आक्रानाचा मुलगा पगीयेल हा आशेर वंशाचा सरदार असावा.

[28] त्याच्या दलात एकेचाळीस हजार पाचशे लोक होते.

[29] नफताली वंशाचे लोक. एनानाचा मुलगा अहीरा हा नफताली वंशाचा पुढारी असावा.

[30] त्याच्या दलात त्रेपन्न हजार चारशे लोक होते.

[31] दान वंशाच्या छावणीत एक लाख सत्तावन्न हजार सहाशे लोक होते. इस्राएल लोकांचा तळ ठिकठिकाणाहून हलविताना दानवंशाच्या कुळांनी सर्वात शेवटी चालावे.

[32] अशी इस्राएल लोकांची मंडळी होती. त्यांच्या वंशात त्यांच्या कुळाप्रमाणे व त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे त्यांची गणती केली तेव्हा त्यांची एकूण संख्या सहा लाख तीन हजार पाचशे पन्नास होती.

[33] मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांबरोबर लेवी लोकांची गणती केली नाही.

[34] तेव्हा परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञाप्रमाणे सर्वकाही इस्राएल लोकांनी केले. प्रत्येक कुळाने आपआपल्या निशाणापाशी तळ दिला. प्रत्येकजण आपापल्या कुळात व आपापल्या वाडवडिलांच्या घराण्यांच्या छावणीत राहिला.

गणना — Chapters