[1] “उठ, प्रकाशमान हो, कारण तुझा प्रकाश आला आहे, आणि परमेश्वराचे तेज तुझ्यावर उगवले आहे.”
[2] जरी अंधार पृथ्वीला आणि निबीड काळोख लोकांस झाकेल, तरी परमेश्वर तुझ्यावर उदय पावेल आणि, त्याचे तेज तुझ्यावर येईल.
[3] राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, आणि राजे तुझ्या उगवत्या तेजस्वी प्रकाशाकडे येतील.
[4] तुझ्या सभोवती पाहा! ते सर्व एकत्र जमतात आणि तुझ्याकडे येतात. तुझी मुले दूरुन येतील आणि तुझ्या मुलींना कडेवर बसून आणतील.
[5] तेव्हा तू हे पाहशील आणि आनंदाने उल्हासीत होशील, आणि तुझे हृदय हर्षाने भरून वाहेल. कारण समुद्रातील भरपूर संपत्ती तुझ्यापुढे ओतली जाईल, राष्ट्रांचे सर्व धन तुझ्याकडे येईल.
[6] मिद्यान आणि एफा येथील उंटाचे कळप तुला झाकतील, शेबातले सर्व येतील, ते सोने आणि धूप आणतील आणि परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गातील.
[7] केदारमधील सर्व मेंढ्या गोळा करून तुझ्याकडे एकत्र केल्या जातील. नबायोथचे मेंढे तुझी सेवा करतील. ते माझ्या वेदीवर स्विकार्य असे अर्पण होतील, आणि मी माझ्या तेजस्वी घराला आणखी गौरवीत करीन.
[8] हे कोण आहेत जे मेघाप्रमाणे उडतात, आणि कबुतराप्रमाणे आपल्या आश्रयस्थानाकडे उडत येतात?
[9] द्वीपे माझी वाट पाहतात, आणि परमेश्वर तुझा देव याच्या नावासाठी, आणि इस्राएलाच्या पवित्रासाठी तुझ्या मुलांना आपले सोने व रुपे यांसहीत दुरुन आणावे, म्हणून पहिल्याने तार्शीशाची जहाजे वाट पाहतील, कारण त्याने तुला शोभविले आहे.
[10] विदेश्यांची मुले तुझ्या भींती पुन्हा बांधतील, आणि त्यांचे राजे तुझी सेवा करतील. “जरी रागात मी तुला शिक्षा केली, परंतु आता माझ्या प्रसन्नतेने मी तुझ्यावर दया केली आहे.”
[11] तुझे दरवाजे सदोदित उघडे राहतील, दिवस असो किंवा रात्र ते कधीही बंद होणार नाहीत. ह्यासाठी की राष्ट्रे व त्यांची संपत्ती आणि कैद केलेले राजे तुझ्याकडे आणावे.
[12] खचित, जे राष्ट्र व राज्य तुझी सेवा करतील नाही त्याचा नाश होईल, ती राष्ट्रे पुर्णपणे विनाश पावतील.
[13] माझ्या पवित्र जागेला सुंदर करायला लबानोनाचे वैभव म्हणजे सरू, देवदारू आणि भद्रदारू हे तुझ्याकडे येतील, आणि मी माझे पायाचे स्थान गौरवशाली करील.
[14] ज्यांनी तुला दुखावले, तेच आता तुझ्यापुढे नमतील, ते तुझ्या पायावर झुकतील. ते तुला परमेश्वराचे नगर म्हणतील, इस्राएलाच्या पवित्राचे सियोन म्हणून संबोधतील.
[15] “तू टाकलेली आणि तिरस्कारयुक्त होतीस, तुझ्यातून कोणीही जात नसे, मी तुला चिरकालासाठी गौरवाची एक गोष्ट करीन, एका पिढी पासून दुसऱ्या पिढीपर्यंतचा आनंद असे करीन.”
[16] तू राष्ट्रांचे दुध पिणार आणि राजांचे स्तन चोखणार, मग तुला समजेल की परमेश्वर तुझा देव, तुला सोडवणारा आणि तारणारा, याकोबाचे सामर्थ्य आहे.
[17] “मी पितळेच्या ऐवजी सोने आणि लोखंडाच्या ठिकाणी चांदी आणीन, आणि लाकडाच्या ऐवजी, पितळे व दगडांच्या ऐवजी लोखंड आणील. तुझे अधिकारी शांती व तुझे कर घेणारे न्याय असे मी करीन.”
[18] तुझ्या भूमीत पुन्हा कधीही हिंसेची वार्ता आणि नासधूस किंवा उजाडी ऐकू येणार नाही, परंतु तू तुझ्या वेशीला तारण आणि तुझ्या दरवाजांना स्तुती म्हणशील.
[19] “दिवसा सुर्य तुझा प्रकाश असणार नाही, आणि चंद्राचा उजेडही तुझ्यावर चमकणार नाही. पण परमेश्वर तुझा अक्षय प्रकाश होईल, आणि तुझा देवच तुझे वैभव असणार.”
[20] “तुझा ‘सूर्य’ कधी मावळणार नाही आणि ‘चंद्राचा’ क्षय होणार नाही. कारण परमेश्वर तुझा अक्षय प्रकाश असेल, आणि तुझ्या शोकाचे दिवस संपतील.”
[21] “तुझे सर्व लोक नितीमान असतील, आणि माझा महिमा व्हावा म्हणून मी लावलेले रोप, माझ्या हाताचे कृत्य असे ते सर्वकाळपर्यंत भूमी वतन करून घेतील.”
[22] “जो लहान तो हजार होईल, आणि जो धाकटा तो बलवान राष्ट्र होईल. मी, परमेश्वर, त्या समयी हे लवकर घडवून आणणार.”