Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 3:56

[1] पाहा, प्रभू, सेनाधीश परमेश्वर, यरूशलेम व यहूदा यांच्यापासून आधार व टेका काढून घेत आहे, म्हणजे भाकरीचा संपूर्ण साठा आणि संपूर्ण पाणी पुरवठा काढून घेत आहे;

[2] शक्तीमान पुरुष, योद्धा, न्यायधीश, संदेष्टा, ज्योतिषी, वडील,

[3] पन्नासांचा कप्तान, प्रतिष्ठित नागरिक, मंत्री, कूशल कारागीर व निपुण जादूगार.

[4] “मी फक्त युवकास त्यांचे अधिकारी म्हणून नेमीन, आणि युवक त्यांच्यावर राज्य करतील.

[5] सर्व लोक दडपशाहीमुळे धास्तावतील; प्रत्येकजण दुसऱ्यामुळे, प्रत्येक व्यक्ती त्याच्या शेजाऱ्यामुळे; लेकरे उद्दामपणे वयोवृद्धांचा विरोध करतील, अधोगती झालेले प्रतिष्ठीतांना आव्हान करतील.

[6] आपल्या वडिलाच्याच घरात कोणी आपल्या भावाला जबरदस्तीने म्हणेल, आणि तुझ्याजवळ झगा आहे; तू आमचा शासक हो व तुझ्या हाताखाली हे नाश होऊ दे.

[7] त्या दिवशी तो ओरडून म्हणेल, ‘मी बरे करणारा होणार नाही, माझ्याजवळ भाकरी व वस्त्रही नाहीत, तुम्ही मला लोकांचा शासक करू नका.’”

[8] कारण यरूशलेमेचा नाश झाला आहे, व यहूदा पतन पावला आहे, कारण त्यांचे बोलणे व कृती परमेश्वराच्या विरोधात आहे, त्याच्या उच्च अधिकाराचा अपमान करत आहे.

[9] त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव त्यांच्याच विरूद्ध साक्ष देतात; आणि सदोमाप्रमाणे ते त्यांच्या पापाविषयीच्या गोष्टी सांगतात; ते त्या लपवीत नाहीत. त्यांचा नाश होवो! कारण त्यांनी स्वतःवर आपत्ती आणली आहे.

[10] नीतिमानास सांगा कि त्यांचे भले होईल; कारण ते आपल्या कृतींचे फळ खातील.

[11] पाप्याचा नाश होवो! त्याचे वाईट होईल, कारण त्याने आपल्या हाताने जे केले, ते त्यास मिळेल.

[12] माझ्या लोकांनो; लेकरे तुम्हावर जुलूम करतात व स्त्रिया त्यांच्यावर राज्य करतात. माझ्या लोकांनो, तुमचे पुढारी तुम्हास योग्य मार्गापासून दूर नेतात, व तुमच्या मार्गाविषयी तुम्हास गोंधळात टाकतात.

[13] परमेश्वर न्याय करण्याकरिता न्यायसभेत उभा राहिला आहे, त्याच्या लोकांचा न्याय करण्याकरिता तो उभा राहिला आहे.

[14] परमेश्वर वडील जन व त्याच्या लोकांचे अधिकारी यांच्यावर न्याय प्रकट करील. तुम्ही द्राक्षीचा मळा खाऊन टाकला आहे; गरिबांची लुटलेली मालमत्ता तुमच्या घरांमध्ये आहे.

[15] तुम्ही माझ्या लोकांचा संपूर्ण नाश का करीता व गरिबांना अतिशय यातना का देता? असे प्रभू, सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

[16] परमेश्वर म्हणतो सियोनेच्या कन्या अहंकारी आहेत, आणि त्या ताठ मानेने आपले डोके उंचावून चालतात व आपल्या डोळ्यांनी प्रणयचेष्टा करतात, जातांना त्या चोखंदळपणा करतात व आपल्या पायांनी पैंजणाचा रुणझुण आवाज करतात.

[17] म्हणून सियोनेच्या कन्यांच्या डोक्यात प्रभू देव रोगग्रस्त खरूज उत्पन्न करील, आणि परमेश्वर त्यांचे टक्कल करील.

[18] त्या दिवशी प्रभू त्यांचे सुंदर असे पायातील दागिने, डोक्याचे बंध, गळयातील चंद्रकोरी हार,

[19] कर्णफुले, कंकणे, आणि घुंगट;

[20] शिरभूषणे, पैंजणे, कमरपट्टे, सुगंधी द्रव्यांचा डब्ब्या, आणि भाग्यवान आकर्षणे काढून टाकील.

[21] तो अंगठ्या, नथी दागिने;

[22] सणाचे वस्त्रे, आवरणे, ओढण्या, हातातील बटवे;

[23] हातातले आरसे, तलम सणाचे वस्त्र, डोक्यावरील वस्त्रे, आणि ओढण्या काढून टाकील.

[24] तेथे गोड सुगंधा ऐवजी दुर्गंध; कमरपट्ट्या ऐवजी रस्सी, आकर्षक केशरचने ऐवजी टक्कल, झग्याऐवजी तरटाचे वस्त्र, आणि सौंदर्याच्या जागी डाग राहतील.

[25] तुझे पुरुष तलवारीने पडतील व वीर पुरुष युद्धात पाडले जातील.

[26] यरूशलेमेच्या वेशी शोक व विलाप करतील; आणि ती एकटी असेल व जमिनीवर बसून राहील.

यशया — Chapters