Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 3:31

[1] आमोजाचा पुत्र यशया याने बाबेलाविषयी स्विकारलेली घोषणा.

[2] उघडया डोंगरावर इशारा देणारा ध्वज उभारा, त्यांना मोठयाने हाक मारा, त्यांनी सरदारांच्या द्वारात यावे म्हणून त्यांना हाताने खुणवा.

[3] मी आपल्या पवित्र केलेल्यांस आज्ञा केली आहे, होय, माझ्या क्रोधास्तव मी माझ्या पराक्रमी लोकांस, तसेच गर्वाने उल्लासीत होणाऱ्या माझ्या लोकांस बोलाविले आहे.

[4] अनेक लोकांच्या समुदायाच्या गोंगाटाप्रमाणे, अनेक राष्ट्रांच्या राजाच्या एकत्र जमल्याप्रमाणे डोंगरात गलबला होत आहे. सेनाधीश परमेश्वर लढाईसाठी फौज तयार करत आहे.

[5] ते दूर देशातून, दिगंतापासून येत आहेत. परमेश्वर त्याच्या न्यायाच्या शस्त्रांसहीत संपूर्ण देशाचा नाश करावयास येत आहे.

[6] आक्रोश करा, कारण परमेश्वराचा दिवस समीप आहे; सर्वसमर्थाकडून विनाशासहीत तो येत आहे.

[7] त्यामुळे सर्व हात गळाले आहेत, आणि प्रत्येक हृदय विरघळले आहे;

[8] ते अगदी घाबरतील; प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे वेणा व वेदना यांनी त्यांना घेरले आहे. ते विस्मयाने एकमेकांकडे पाहतील; त्यांची मुखे ज्वालेच्या मुखांसारखी होतील.

[9] पाहा, क्रोध आणि संतापाने भरून वाहणारा रोष, असा परमेश्वराचा दिवस येत आहे अशासाठी की देश उजाड आणि तिच्यातून पाप्यांचा नाश करायला येत आहे.

[10] आकाशाचे तारे आणि नक्षत्रे आपला प्रकाश देणार नाहीत. अरुणोदयापासूनच सूर्य अंधकारमय होईल आणि चंद्र प्रकाशणार नाही.

[11] मी जगाला त्यांच्या वाईटासाठी आणि दुष्टांला त्यांच्या अपराधासाठी शिक्षा करीन. मी गर्विष्ठांचा उद्धटपणा आणि निर्दयांचा गर्व उतरवील.

[12] मी पुरुषांना उत्कृष्ट सोन्यापेक्षा अधिक दुर्मिळ करील आणि मानवजात ओफीरच्या शुध्द सोन्याहून शोधण्यास कठिण करील.

[13] म्हणून मी आकाश हादरून सोडील, व पृथ्वी तिच्या स्थानावरून हालविली जाईल, सेनाधीश परमेश्वराचा संताप आणि त्याच्या तीव्र क्रोधाचा दिवस येईल.

[14] शिकारी झालेल्या हरिणाप्रमाणे किंवा मेंढपाळ नसलेल्या मेंढराप्रमाणे, प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःच्या लोकाकडे वळेल आणि आपल्या देशाकडे पळून जाईल.

[15] जो कोणी सापडेल त्यास मारण्यात येईल आणि जो कोणी पकडला जाईल त्यास तलवारीने मारण्यात येईल.

[16] त्यांच्या डोळ्यादेखत त्यांची बालके आपटून तुकडे तुकडे करण्यात येतील. त्यांची घरे लुटली जातील आणि त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार होतील.

[17] पाहा, मी त्यांच्याविरुद्ध माद्य लोकांस हल्ला करण्यासाठी उठवीन, ते रुप्याबद्दल पर्वा करणार नाहीत किंवा ते सोन्याने आनंदीत होणार नाही.

[18] त्यांचे बाण तरूणांना भेदून जातील. ते बालकांवर दया करणार नाहीत आणि मुलांना सोडणार नाहीत.

[19] आणि राज्याचे अधिक कौतुक, खास्द्यांच्या वैभवाचा अभिमान अशी बाबेल, तिला सदोम आणि गमोराप्रमाणे देवाकडून उलथून टाकण्यात येईल.

[20] ती कधी वसविली जाणार नाही आणि पिढ्यानपिढ्यापासून तिच्यामध्ये कोणी राहणार नाहीत. अरब आपले तंबू तेथे ठोकणार नाहीत किंवा मेंढपाळ आपले कळप तेथे विसाव्यास नेणार नाहीत.

[21] परंतु रानातील जंगली पशू तेथे पडतील. त्यांची घरे घुबडांनी भरतील; आणि शहामृग व रानबोकड तेथे उड्या मारतील.

[22] तरस त्यांच्या किल्ल्यात आणि कोल्हे त्याच्या सुंदर महालात ओरडतील. तिची वेळ जवळ आली आहे आणि तिच्या दिवसास विलंब लागणार नाही.

यशया — Chapters