[1] बसालेलाने बाभळीच्या लाकडाची एक चौरस होमवेदी बनवली; ती पाच हात लांब व पाच हात रुंद व तीन हात उंच अशी केली.
[2] त्याने तिच्या चाऱ्ही कोपऱ्यास चार शिंगे बनवली, ती अंगचीच होती, त्याने ती पितळेने मढविली.
[3] त्याने वेदीची सर्व उपकरणे म्हणजे हंड्या, फावडी, कटोरे, काटे व अग्निपात्रे ही सर्व पितळेची बनवली.
[4] त्याने वेदीला सभोवती कंगोऱ्याच्या खाली पितळेची जाळी बनवली, ती खालपासून वेदीच्या तळाच्या अर्ध्या अंतरापर्यंत वर आली.
[5] त्याने पितळेच्या जाळीच्या चारही कोपऱ्यांना दांडे घालण्यासाठी चार कड्या ओतून तयार केल्या;
[6] त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते पितळेने मढवले.
[7] वेदी उचलून नेण्याकरता तिच्या बाजूच्या कड्यांत त्याने दांडे घातले; वेदीच्या चारही बाजूंना फळ्या लावून ती मध्यभागी पोकळ ठेवली.
[8] दर्शनमंडपाच्या दारापाशी सेवा करण्याऱ्या स्रियांनी अर्पण म्हणून आणलेल्या पितळी आरशांचे पितळ घेऊन त्याने गंगाळ व त्याची बैठक बनवली.
[9] त्याने अंगण तयार केले; त्याच्या दक्षिण बाजूला कातलेल्या तलम सणाच्या कापडाच्या पडद्यांची लांबी शंभर हात होती.
[10] तिला वीस खांब असून त्या खांबासाठी पितळेच्या वीस उथळ्या होत्या; खांबांच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या.
[11] अंगणाच्या उत्तर बाजूलाही शंभर हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात होती व तिच्यासाठीही वीस पितळी उथळ्या असलेल्या वीस खांबावर ती आधारलेली होती; खांबांच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या.
[12] अंगणाच्या पश्चिम बाजूला पडद्यांची पन्नास हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात होती; तिच्यासाठी दहा खांब व दहा उथळ्याही होत्या; या खांबांच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या;
[13] पूर्वेकडील बाजू पन्नास हात लांब होती;
[14] अंगणाच्या फाटकाच्या एका बाजूला पंधरा हात लांबीचे पडदे जोडून केलेली कनात होती; तिच्यासाठी तीन खांब व तीन उथळ्या होत्या;
[15] आणि अंगणाच्या फाटकाची दुसरी बाजूही अगदी तशीच होती. अंगणाच्या फाटकाच्या या बाजूला व त्या बाजूला पंधरा पंधरा हात पडदे जोडून केलेल्या कनाती होत्या, त्यांना तीन तीन खांब व त्यांच्या उथळ्याही तीन तीन होत्या.
[16] अंगणाच्या सभोवतालचे सर्व पडदे कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे होते.
[17] खांबांच्या उथळ्या पितळेच्या आणि आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या होत्या; खांबांची वरची टोके चांदीने मढवली होती; अंगणाचे सर्व खांब चांदीच्या बांधपट्ट्यांनी जोडले होते.
[18] अंगणाच्या फाटकाचा पडदा निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा होता; त्यावर वेलबुट्टीदार विणकाम केलेले होते; तो वीस हात लांब व पाच हात उंच होता; ही उंची अंगणाच्या पडद्या इतकी पाच हात असावी.
[19] तो पडदा पितळेच्या चार उथळ्या आणि चार खांबावर आधारलेला होता; खांबांवरील आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या बनवलेल्या होत्या; खांबांची वरची टोके चांदीने मढवली होती.
[20] निवासमंडपाच्या आणि अंगणाच्या सभोवती असलेल्या सर्व मेखा पितळेच्या होत्या.
[21] निवासमंडपाचे म्हणजे साक्षपटाच्या निवासमंडपाच्या ज्या वस्तू लेव्यांच्या सेवेकरीता केले त्याची यादी मोशेच्या सांगण्यावरून अहरोन याजकाचा पुत्र इथामार ह्याने केली ती ही;
[22] ज्या ज्या वस्तू करण्याविषयी परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती त्या सर्व वस्तू यहूदा वंशातील हुराचा नातू म्हणजे ऊरीचा पुत्र बसालेल याने बनवल्या;
[23] तसेच त्यास मदतनीस म्हणून दान वंशातील अहिसामाखाचा पुत्र अहलियाब हा होता; तो सर्व प्रकारचे कोरीव काम करणारा कुशल कारागीर होता; तो विणकाम व निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या तलम कापडावर कशिदा काढणारा होता.
[24] पवित्रस्थानाच्या सर्व कामाकरता अर्पण केलेले सोने सुमारे एकोणतीस किक्कार होते आणि पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे सातशे तीस शेकेल होते.
[25] मंडळीपैकी ज्यांची नोंद करण्यात आली त्या एकूण लोकांनी अर्पण केलेली चांदी शंभर किक्कार भरली आणि पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे सतराशे पंचाहत्तर शेकेल भरली.
[26] वीस वर्षे व त्याहून अधिक वयाच्या पुरुषांची गणती केली तेव्हा ते सहा लाख, तीन हजार, पाचशे पन्नास भरले आणि पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे प्रत्येका मनुष्यामागे एक बेका चांदी म्हणजे अर्धा शेकेल मिळाला.
[27] त्यांनी ती शंभर किक्कार चांदी पवित्रस्थानातील उथळ्या व अंतरपटाच्या उथळ्या करण्यासाठी वापरली; त्यांनी प्रत्येक उथळीसाठी प्रत्येकी एक किक्कार अशा शंभर किक्काराच्या शंभर उथळ्या बनविल्या.
[28] बाकीची सतराशे पंचाहत्तर शेकेल चांदी आकड्या, बांधपट्ट्या आणि खांबांना मढविण्यासाठी लागली.
[29] सत्तर किक्कार व दोन हजार चारशे शेकेल अधिक पितळ अर्पण करण्यात आले होते.
[30] त्या पितळेच्या दर्शनमंडपाच्या प्रवेश दाराजवळील उथळ्या, वेदीची उपकरणे व तिची जाळी ह्यांकरता;
[31] त्याचप्रमाणे अंगणाच्या कनातीच्या खांबांच्या उथळ्या, प्रवेशद्वारावरील पडद्यांच्या खांबांच्या उथळ्या, तसेच पवित्र निवासमंडप अंगणाच्या चारही बाजूस लागणाऱ्या मेखा बनविण्यासाठी उपयोग झाला.