Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 9:10

[1] मग इस्राएली लोकांची मंडळी प्रवास करीत एलीम या ठिकाणाहून निघाली व मिसरमधून निघाल्यानंतर दुसऱ्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी एलीम व सीनाय यांच्या दरम्यान असलेल्या सीन रानात येऊन पोहचले.

[2] त्या रानात इस्राएल लोकांच्या मंडळीने मोशे व अहरोन यांच्यासंबंधी कुरकुर केली;

[3] इस्राएल लोक त्यांना म्हणू लागले की, “परमेश्वराच्या हातून आम्हांला मिसर देशामध्येच मरण आले असते तर बरे झाले असते, कारण तेथे आम्हांला खावयास लागणारे सर्व प्रकारचे अन्न भरपूर होते; परंतु तुम्ही आम्हांला येथे रानात उपासाने मारावे म्हणून आणले आहे.”

[4] मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुम्हास खाण्याकरता मी आकाशातून अन्नवृष्टी करीन; प्रत्येक दिवशी या लोकांनी आपल्याला त्या दिवसास पुरेल एवढे अन्न बाहेर जाऊन गोळा करावे. यावरुन ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात की नाही हे पाहण्यासाठी मी त्यांची परीक्षा पाहीन.

[5] सहाव्या दिवशी मात्र ते इतर दिवशी गोळा करतात त्याच्या दुप्पट असावे. ते जे गोळा करतील ते ते शिजवतील.”

[6] म्हणून मोशे व अहरोन सर्व इस्राएल लोकांस म्हणाले, “आज संध्याकाळी तुम्ही परमेश्वराचे सामर्थ्य पाहाल; तेव्हा मिसरमधून तुम्हास वाचविणारा परमेश्वर हाच आहे हे तुम्हास कळेल.

[7] उद्या सकाळी तुम्ही परमेश्वराचे तेज पाहाल; तुम्ही परमेश्वराविरुध्द कुरकुर केली त्याने ती ऐकली आहे. आम्ही कोण की तुम्ही आम्हाविरुध्द कुरकुर करावी?”

[8] आणि मोशे म्हणाला, “परमेश्वर तुम्हास संध्याकाळी मांस खावयास देईल; आणि सकाळी पोटभर भाकरी देईल; कारण तुम्ही परमेश्वराविरूद्ध कुरकुर करीत आहा ती त्याने ऐकली आहे. आम्ही कोण आहो? तुमचे कुरकुरणे आमच्याविरुध्द नाही तर परमेश्वराविरुध्द आहे.”

[9] मग मोशे अहरोनाला म्हणाला, “तू इस्राएल लोकांच्या मंडळीला सांग की, तुम्ही परमेश्वराकडे एकत्र या; कारण त्याने तुमच्या तक्रारी ऐकल्या आहेत.”

[10] मग अहरोन सर्व इस्राएल मंडळीशी बोलत असताना सर्व लोकांनी वळून रानाकडे पाहिले; आणि त्यांना मेघात परमेश्वराचे तेज दिसले.

[11] परमेश्वर मोशेला म्हणाला,

[12] “मी इस्राएल लोकांच्या तक्रारी ऐकल्या आहेत तेव्हा त्यांना सांग, रात्री तुम्ही मांस खाल आणि दररोज सकाळी तुम्हास पाहिजे तितक्या भाकरी खाल; मग परमेश्वर मी तुमचा देव आहे हे तुम्हास समजेल.”

[13] त्या संध्याकाळच्या वेळी, तेथे लावे पक्षी येऊन छावणीभर पसरले आणि सकाळी छावणीच्या सभोवती जमिनीवर दव पडले.

[14] सूर्य उगवल्यावर दव विरून गेले, परंतु त्यानंतर जमिनीवर खवल्यासारखे हिमकणाएवढे सूक्ष्म कण पसरलेले दिसले.

[15] ते पाहून इस्राएल लोकांनी एकमेकांना विचारले, “हे काय आहे?” कारण ते काय आहे हे त्यांना माहीत नव्हते. तेव्हा मोशेने त्यांना सांगितले, “परमेश्वर हे अन्न तुम्हास खाण्याकरता देत आहे.

[16] परमेश्वराने आज्ञा केली आहे ती ही आहे की, प्रत्येकाने आपल्याला जेवढ्या अन्नाची गरज आहे तेवढेच गोळा करावे; ज्याच्या तंबूत जेवढी माणसे असतील तेवढ्यासाठी त्याच्या आहाराप्रमाणे प्रत्येकी एकएक ओमर गोळा करावे.”

[17] इस्राएल लोकांनी तसे केले, कोणी कमी, कोणी जास्त गोळा केले.

[18] त्यांनी ओमरच्या मापाने ते मापून पाहिले; तेव्हा ज्याने अधिक गोळा केले होते त्याचे अधिक भरले नाही. तसेच ज्याने थोडे गोळा केले होते त्याचे काही कमी भरले नाही. प्रत्येकाने आपआपल्या आहाराच्या मानाने ते गोळा केले.

[19] मोशेने लोकांस सांगितले, “कोणीही यापैकी काहीएक सकाळपर्यंत ठेवू नये.”

[20] परंतु लोकांनी मोशेचे ऐकले नाही, काही लोकांनी त्या अन्नातून सकाळपर्यंत ठेवले त्यामध्ये किडे पडले व त्याची घाण येऊ लागली. त्यावरून मोशे त्यांच्यावर फार रागावला.

[21] प्रत्येक दिवशी ते लोक आपल्याला पुरेसे अन्न गोळा करीत, ऊन फार वाढल्यावर ते वितळून जाई.

[22] सहाव्या दिवशी त्यांनी दुप्पट म्हणजे प्रत्येक माणशी दोन ओमर गोळा केले. तेव्हा मंडळीचे सर्व पुढारी लोक मोशेकडे आले व त्यांनी हे त्यास कळवले.

[23] तो त्यांना म्हणाला, “परमेश्वराचे सांगणे असे आहे की, उद्या विश्रामवार, परमेश्वराचा पवित्र शब्बाथ आहे. तुम्हास भाजावयाचे ते भाजा आणि शिजवायचे ते शिजवा आणि जे काही उरेल ते आपल्यासाठी सकाळपर्यंत ठेवावे.”

[24] मोशेने सांगितल्याप्रमाणे त्यांनी ते सकाळपर्यंत ठेवले. पण त्याची घाण सुटली नाही किंवा त्यामध्ये कोठेही किडे पडले नाहीत.

[25] मग मोशे म्हणाला, “ते आज खा, कारण आज परमेश्वराचा शब्बाथ आहे, आज रानात ते तुम्हास मिळावयाचे नाही.

[26] तुम्ही सहा दिवस ते गोळा करावे, परंतु आठवड्याचा सातवा दिवस हा शब्बाथ आहे. त्या दिवशी काही मिळणार नाही.”

[27] तरी काही लोक सातव्या दिवशी ते गोळा करावयास बाहेर गेले, परंतु त्यांना काहीच मिळाले नाही.

[28] नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “माझ्या आज्ञा व माझे नियम पाळावयास तुम्ही कोठवर नाकारणार?

[29] पाहा परमेश्वराने तुम्हास शब्बाथ दिला आहे; म्हणून सहाव्या दिवशी तो तुम्हास तो दोन दिवस पुरेल एवढे अन्न देतो, तेव्हा सातव्या दिवशी आपआपल्या ठिकाणी स्वस्थ असावे, आपले स्थान सोडून कोणीही बाहेर जाऊ नये.”

[30] याप्रमाणे लोकांनी सातव्या दिवशी विसावा घेतला.

[31] इस्राएल लोकांनी त्या अन्नाचे नाव मान्ना ठेवले; ते धण्यासारखे पांढरे असून त्याची चव मध घालून केलेल्या पोळीसारखी होती.

[32] मोशे म्हणाला, “परमेश्वराने अशी आज्ञा दिली आहे की ह्यातले एक ओमर पुढील पिढ्यांच्या लोकांसाठी राखून ठेवा. मी तुम्हास मिसर देशातून काढून नेल्यावर रानात कसे अन्न दिले हे त्यांना समजेल.”

[33] तेव्हा मोशेने अहरोनाला सांगितले, “एक भांडे घे आणि त्यामध्ये एक ओमर मान्ना घाल. तो परमेश्वरापुढे सादर करण्यासाठी आपल्या पुढील पिढ्यांसाठी राखून ठेव.”

[34] मग परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे अहरोनाने परमेश्वराच्या आज्ञापटापुढे ते भांडे ठेवले.

[35] इस्राएल लोक तो मान्ना चाळीस वर्षे, कनान देशाच्या सरहद्दीपर्यंत जाऊन पोहोचेपर्यंत खात होते.

[36] एक ओमर मान्ना म्हणजे “एक एफाचा दहावा भाग” आहे.

निर्गम — Chapters