[1] परमेश्वर मोशेला म्हणाला,
[2] “इस्राएल लोकांस माझ्यासाठी अर्पणे आणायला सांग. ज्या कोणाची माझ्यासाठी मनापासून अर्पण करण्याची इच्छा असेल त्या प्रत्येकापासून ही अर्पणे तू माझ्यासाठी स्वीकारावी.
[3] त्यांच्याकडून तू माझ्याकरिता घ्यावयाच्या वस्तूंच्या अर्पणाची यादी अशी: सोने, चांदी, पितळ;
[4] निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत आणि तलम सणाचे कापड; बकऱ्याचे केस;
[5] लाल रंगवलेली मेंढ्यांची कातडी; तहशाची कातडी, बाभळीचे लाकूड;
[6] दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धुपासाठी मसाले;
[7] एफोद व ऊरपट ह्यात खोचण्यासाठी गोमेदमणी व इतर रत्ने.”
[8] मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्रस्थान तयार करावे.
[9] निवासमंडप कसा असावा त्याचा नमुना व त्यातील वस्तू कशा असाव्यात त्यांचा नमुना मी तुला दाखवीन. त्या सगळ्याप्रमाणे तुम्ही तो तयार करावा.
[10] “बाभळीच्या लाकडाची एक पेटी तयार करावी; त्याची लांबी अडीच हात, रुंदी दीड हात व उंची दीड हात असावी.
[11] तो आतून बाहेरून शुध्द सोन्याने मढवावा आणि त्याच्यावर सभोवती शुद्ध सोन्याचा काठ करावा.
[12] त्याच्या चारही पायांना लावण्यासाठी सोन्याच्या चार गोल कड्या ओतून एकाबाजूला दोन व दुसऱ्या बाजूला दोन अशा लावाव्या.
[13] बाभळीच्या लाकडाचे दांडे करावेत व तेही सोन्याने मढवावेत
[14] कोशाच्या कोपऱ्यांवरील गोल कड्यांमध्ये दांडे घालून मग तो वाहून न्यावा.
[15] हे दांडे कोशाच्या कड्यातच कायम तसेच राहू द्यावेत, ते काढून घेऊ नयेत.”
[16] देव म्हणाला, मी तुला साक्षपट देईन तोही त्या कोशात ठेवावा.
[17] मग शुद्ध सोन्याचे एक दयासन बनवावे; त्याची लांबी अडीच हात, रूंदी दीड हात असावी;
[18] मग सोन्याचे घडीव काम करून दोन करुब करून ते दयासनाच्या दोन्ही टोकांना ठेवावेत.
[19] एक करुब एका बाजूला व दुसरा करुब दुसऱ्या बाजूला असे दयासनाशी एकत्र जोडून अखंड सोन्याचे घडवावेत.
[20] त्या करुबांचे पंख आकाशाकडे वर पसरलेले असावेत व त्यांच्या पंखांनी दयासन झाकलेले असावे; त्याची तोंडे समोरासमोर असावीत व त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली असावी.
[21] दयासन कोशावर ठेवावे. मी तुला जो साक्षपट देईन तो तू त्या कोशात ठेवावा;
[22] तेथे मी तुला भेटत जाईन. दयासनावरून त्या साक्षपटाच्या कोशावरील ठेवलेल्या दोन्ही करुबामधून मी तुझ्याशी बोलेन आणि तेथूनच मी इस्राएल लोकांसाठी माझ्या सर्व आज्ञा देईन.
[23] बाभळीच्या लाकडाचे एक मेज बनवावे; त्याची लांबी दोन हात, रूंदी एक हात व उंची दीड हात असावी.
[24] ते शुद्ध सोन्याने मढवावे, व त्याच्या भोवती सोन्याचा काठ करावा.
[25] मग चार बोटे रुंदीची एक चौकट बनवावी व सोन्याचा काठ तिच्यावर ठेवावा.
[26] मग सोन्याच्या चार गोल कड्या बनवून त्या मेजाच्या चार पायांच्या कोपऱ्यांना लावाव्यात.
[27] या कड्या मेजाच्या वरच्या भागा भोवती चौकटीच्या जवळ ठेवाव्यात. मेज वाहून नेण्यासाठी या कड्यांमध्ये दांडे घालावे.
[28] मेज वाहून नेण्यासाठी बाभळीच्या लाकडाचे दांडे बनवावेत व ते सोन्याने मढवावेत.
[29] मेजावरची तबके, धूपपात्रे, सुरया व पेयार्पणे ओतण्याकरता वाट्या बनव. ही शुद्ध सोन्याची असावीत.
[30] माझ्यापुढे मेजावर समक्षतेची भाकर नेहमी ठेवावी.
[31] शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष तयार कर, हा दीपवृक्ष घडीव कामाचा असावा. त्याची बैठक व त्याचा दांडा, त्याच्या वाट्या, त्याच्या कळ्या व त्याची फुले ही सर्व एकाच अखंड तुकड्याची असावी.
[32] त्या दीपवृक्षाला एका बाजूला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा असाव्यात.
[33] प्रत्येक शाखेला बदामाच्या फुलांसारख्या तीन तीन वाट्या या कळ्याफुलांसह असाव्यात.
[34] या दीपवृक्षाच्या दांड्याला बदामाच्या फुलांसारख्या कळ्या पाकळ्यासहीत असलेल्या फुलाप्रमाणे असाव्यात.
[35] या दीपवृक्षावर निघणाऱ्या सहा शाखांपैकी दोन दोन शाखा, त्याच्याखाली असलेले एकएक बोंड ही एकाच अखंड तुकड्याची असावी.
[36] त्याची बोंडे व त्याच्या शाखा ही सर्व एकाच अखंड तुकड्याची असावी. तो सबंध दीपवृक्ष शुद्ध सोन्याचा एकच घडीव तुकडा असावा.
[37] मग या दीपवृक्षावर सात दिवे बसवावेत म्हणजे त्या दिव्यातून दीपवृक्षाच्या समोरील भागावर प्रकाश पडेल.
[38] दिवे मालवण्याचे चिमटे व त्यांच्या ताटल्या ही सर्व शुद्ध सोन्याची असावीत.
[39] हा दीपवृक्ष त्याच्या सर्व उपकरणासहीत एक किक्कार शुद्ध सोन्याचा करावा;
[40] आणि मी तुला पर्वतावर दाखवलेल्या नमुन्याप्रमाणेच या सर्व वस्तू बनविण्याकडे तू लक्ष दे.