[1] देवाने ही सर्व वचने सांगितली,
[2] मी परमेश्वर तुझा देव आहे. ज्याने तुला मिसर देशातून, गुलामगिरीतून सोडवून आणले.
[3] माझ्यासमोर तुला इतर कोणतेही दुसरे देव नसावेत.
[4] तू आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नकोस; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नकोस;
[5] त्यांची सेवा करू नको; किंवा त्यांच्या पाया पडू नकोस; कारण मी परमेश्वर तुझा देव ईर्ष्यावान देव आहे. जे माझा विरोध करतात, त्यांच्या मुलांना तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अपराधाबद्दल शिक्षा करतो;
[6] परंतु जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो.
[7] तुझा देव परमेश्वर याचे नाव तू व्यर्थ घेऊ नकोस; कारण जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही.
[8] शब्बाथ दिवस हा पवित्र दिवस म्हणून पाळण्याची आठवण ठेव;
[9] सहा दिवस श्रम करून तू तुझे कामकाज करावेस;
[10] परंतु सातवा दिवस तुझा देव परमेश्वर याचा शब्बाथ आहे, म्हणून त्या दिवशी तू, तुझा पुत्र, तुझी कन्या, तुझे दास व दासी यांनी तसेच तुझे पशू, किंवा तुझ्या वेशीत राहणाऱ्या परकीयांनीही कोणतेही कामकाज करु नये;
[11] कारण परमेश्वराने सहा दिवस काम करून आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्वकाही उत्पन्न केले आणि त्यानंतर सातव्या दिवशी विसावा घेतला; या प्रमाणे परमेश्वराने शब्बाथ दिवस हा आशीर्वाद देऊन तो पवित्र केला आहे.
[12] आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख म्हणजे त्यामुळे परमेश्वर तुझा देव जो देश तुला देत आहे त्या देशात तू चिरकाळ राहशील.
[13] खून करू नकोस.
[14] व्यभिचार करू नकोस.
[15] चोरी करू नकोस.
[16] आपल्या शेजाऱ्याविरूद्ध खोटी साक्ष देऊ नकोस.
[17] “तू आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नकोस; आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीचा लोभ धरू नकोस; आपल्या शेजाऱ्याचा दासदासी, बैल, गाढव, किंवा त्याच्या कोणत्याही वस्तूचा लोभ धरु नकोस.”
[18] लोकांनी पर्वतावरील ढगांचा गडगडाट ऐकला, विजांचा चकचकाट पाहिला, शिंगाचा नाद होत आहे व पर्वतातून धूर वर चढताना पाहून भीतीने त्यांचा थरकाप झाला. ते दूर उभे राहिले.
[19] ते मोशेला म्हणू लागले आमच्याशी तूच बोल, आम्ही ऐकू; देव आमच्याशी न बोलो, तो बोलेल तर आम्ही मरून जाऊ.
[20] मग मोशे लोकांस म्हणाला, “भिऊ नका, कारण तुमची परीक्षा करावी आणि त्याचे भय तुमच्या डोळ्यांपुढे राहून तुम्ही पाप करू नये यासाठी देव आला आहे.”
[21] मोशे, ढगांच्या दाट अंधारात, जेथे देव होता तेथे गेला, तोपर्यंत लोक पर्वतापासून लांब उभे राहिले.
[22] मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांस असे सांग, मी तुमच्याशी आकाशातून बोललो हे तुम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे.
[23] माझ्या बरोबरीला दुसरे देव करू नका आपल्यासाठी सोन्यारुप्याचे देव करू नका.”
[24] माझ्यासाठी मातीची वेदी बांधा आणि तिजवर तुझी मेंढरे व तुझे बैल यांची होमार्पणे व शांत्यर्पणे वाहा; जेथे जेथे मी माझ्या नावाची आठवण व्हावी म्हणून मी सांगतो तेथे तेथे मी येऊन तुम्हास आशीर्वाद देईन.
[25] तुम्ही जर दगडाची वेदी बांधणार असाल तर ती घडलेल्या चिऱ्याची नसावी; कारण तुम्ही आपले हत्यार दगडाला लावल्यास तो भ्रष्ट होईल.
[26] तुझ्या शरीराची नग्नता माझ्या वेदीवर दिसून येऊ नये म्हणून तू पायऱ्यांनी चढता कामा नये.