[1] “तुमचा न्याय करण्यात येऊ नये म्हणून तुम्ही इतरांचा न्याय करु नका.
[2] कारण ज्या न्यायाने तुम्ही इतरांचा न्याय करता त्याच न्यायाने तुमचा न्याय केला जाईल, आणि ज्या मापाने तुम्ही माप घालता त्याच मापाने तुम्हांला परत माप घालतील.
[3] “तू आपल्या डोळ्यातील मुसळ लक्षात न घेता आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस?
[4] किंवा ‘तुझ्या डोळ्यातील कुसळ मला काढू दे’ असे तुझ्या भावाला कसे म्हणू शकतोस? कारण पाहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे.
[5] अरे ढोंग्या, पहिल्यांदा तू आपल्या डोळ्यातील मुसळ काढ म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातील कुसळ काढायला तुला स्पष्ट दिसेल.
[6] “जे पवित्र ते कुत्र्यांना टाकू नका, ती उलटून तुम्हांला फाडतील आणि आपले मोती डुकरांपुढे टाकू नका; टाकाल तर ती त्यांना पायदळी तुडवतील.
[7] “मागा म्हणजे तुम्हांला ते देण्यात येईल. शोधा आणि तुम्हांला ते सापडेल, ठोका आणि तुमच्यासाठी दार उघडले जाईल,
[8] कारण प्रत्येकजण जो मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते, आणि जो ठोकावतो, त्याच्यासाठी दार उघडले जाते.
[9] “तुमच्यापैकी असा कोण मनुष्य आहे की, जो आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला दगड देईल?
[10] किंवा मासा मागितला, तर त्याला साप देईल?
[11] वाईट असूनही जर तुम्हांला आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी देण्याचे कळते तर तुमच्या स्वर्गातील पित्याकडे जे मागतात, त्यांच्या गरजा तो किती चांगल्या प्रकारे भागवील?
[12] “यासाठी ज्या गोष्टी लोकांनी तुमच्यासाठी कराव्या असे तुम्हांला वाटते त्या सर्व गोष्टी तुम्हीही त्यांच्यासाठी करा. कारण नियमशास्त्राच्या व संदेष्टेयांच्या शिकवणीचे सार हेच आहे.
[13] “अरूंद दरवाजाने आत जा. कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रूंद आहे, व मार्ग पसरट आहे. आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत.
[14] पण जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरूंद व मार्ग अडचणीचा आहे, आणि फारच थोडयांना तो सापडतो.
[15] “खोट्या संदेष्ट्याविषयी सावध असा. ते गरीब मेंढराचे रूप घेऊन तुमच्याकडे येतात. पण प्रत्यक्षात ते क्रूर लांडग्यांसारखे आहेत.
[16] त्यांच्या करणीवरून तुम्ही त्यांस ओळखाल. ज्याप्रमाणे काटेरी झाडाला द्राक्षे लागत नाहीत, किंवा रिंगणीच्या झाडाला अंजिरे येत नाहीत, त्याचप्रमाणे वाइटाला चांगले फळ येत नाही.
[17] प्रत्येक चांगले झाड चांगली फळे देते, पण वाईट झाड वाईट फळे देते.
[18] चांगल्या झाडाला वाईट फळे येणार नाहीत, आणि वाईट झाडाला चांगली फळे येणार नाहीत.
[19] जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडण्यात येते व अग्नीत टाकले जाते.
[20] म्हणून अशा धोकेबाज लोकांना तुम्ही त्यांच्या फळांवरून ओळखाल.
[21] “जो कोणी मला वरवर प्रभु, प्रभु म्हणतो, तो प्रत्येक जण स्वर्गाच्या राज्यात जाईलच असे नाही तर माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वागेल तोच स्वर्गाच्या राज्यात जाईल.
[22] त्या दिवशी मला अनेक जण म्हणतील, ‘हे प्रभु, आम्ही तुझ्या नावाने भूते काढली व तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केले.’
[23] तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, मी तुम्हांला ओळखत नाही. अहो दुराचार करणाऱ्यांनो, माझ्यापासून चालते व्हा.
[24] “जो कोणी माझ्या सांगण्याप्रमाणे आचारण करतो तो शहाण्या माणसासारखा आहे, अशा सुज्ञ माणसाने आपले घर खडकावर बांधले.
[25] मग जोराचा पाऊस झाला आणि पूर आला. जोराचा वारा आला. वादळात घर सापडले, पण ते पडले नाही. कारण त्याचा पाया खडकावर बांधला होता.
[26] “जो कोणी माझे हे शब्द ऐकून त्याप्रमाणे आचरण करीत नाही तो कोणा एका मूर्ख माणासासारखा आहे, त्याने आपले घर वाळूवर बांधले.
[27] मग जोराचा पाऊस आला आणि पूर आला. जोराचा वारा सुटला. वादळवाऱ्यात ते घर सापडले आणि कोसळून पडले.”
[28] जेव्हा ह्या बोधकथा सांगण्याचे येशूने संपविले तेव्हा लोकांचा समुदाय त्याच्या शिकवण्याने थक्क झाला.
[29] कारण येशू त्यांना त्यांच्या धर्मशिक्षकांप्रमाणे नव्हे, तर अधिकारवाणीने शिकवीत होता.