[1] येशू व त्याचे शिष्य यरुशलेमजवळ आले असता ते जैतूनाचा डोंगर म्हटलेल्या टेकडीवर बेथफगे या जागी थांबले. येशूने त्याच्या दोन शिष्यांना
[2] असे सांगून पाठविले की, “तुमच्या समोर असलेल्या गावात जा. तुम्ही गावात शिराल तेव्हा एक गाढवी बांधून ठेवलेली व तिच्या जवळ एक शिंगरु असलेले तुम्हांला आढळेल. ती दोन्ही गाढवे सोडून माझ्याकडे घेऊन या.
[3] जर कोणी तुम्हांला विचारले की, ही गाढवे कशासाठी नेत आहात तर त्याला सांगा की, ‘येशूला यांची गरज आहे. तो ती लगेच माझ्याकडे पाठवील.’”
[4] हे यासाठी घडले की संदेष्ट्यांपैकी एक जण जे बोलला होता ते पूर्ण व्हावे:
[5] “सोयोनेच्या कन्येला सांग, पाहा, ‘तुझा राजा तुझ्याकडे येत आहे! तो लीन आहे आणि नम्र होऊन गाढवावर बसून येत आहे, होय शिंगरावर, कष्ट करणाऱ्या प्राण्याच्या शिंगरावर.’”
[6] त्याचे शिष्य गेले आणि जसे येशूने सांगितले होते तसे त्यांनी केले.
[7] शिष्यांनी गाढवी व शिंगरू येशूकडे आणले. त्या गाढवावर त्यांनी आपले अंगरखे घातले आणि येशू त्यावर बसला.
[8] पुष्कळ लोकांनी आपले अंगरखे येशूसाठी वाटेवर अंथरले. दुसऱ्या काही लोकांनी झाडांच्या फांद्या तोडल्या आणि त्या रस्त्यावर पसरल्या.
[9] काही लोक येशूच्या पुढे चालू लागले. काही लोक येशूच्या मागून चालू लागले. ते लोक मोठ्याने जयघोष करु लागले, “होसान्ना, दाविदाच्या पुत्राला ‘प्रभुच्या नावाने येणारा धन्यवादित असो.’ स्वर्गीय देवाला होसान्ना!”
[10] जेव्हा येशूने यरूशलेमेमध्ये प्रवेश केला तेव्हा संपूर्ण शहर ढवळून निघाले व लोक विचारत होते, “हा कोण आहे?”
[11] जमाव उत्तर देत होता, “हा येशू संदेष्टा आहे, तो गालील प्रांतातील नासरेथचा आहे.”
[12] मग येशूने मंदिराच्या आवारात प्रवेश केला तेव्हा तेथे जे लोक विक्री करीत होते व खरेदी करीत होते त्यांची मेजे त्याने उलथून टाकली आणि जे लोक कबूतरे विकत होते त्यांची बसण्याची बाके उलथून टाकली.
[13] येशू त्यांना म्हणाला, “पवित्र शास्त्रात असे म्हटले आहे, ‘माझे घर प्रार्थनेचे घर म्हटले जाईल. पण तुम्ही त्याला लुटारुंची गुहा केले आहे.’”
[14] काही आंधळे आणि पांगळे लोक मंदिरात येशूकडे आले. येशूने त्यांना बरे केले.
[15] जेव्हा मुख्य याजक व नियमशास्त्राच्या शिक्षकांनी, येशूने केलेल्या आश्चर्यकारक गोष्टी आणि मंदिराच्या आवारात लहान मुलांना, “दाविदाच्या पुत्राला होसान्ना.” अशी घोषाणा देताना पाहिले, तेव्हा या सर्व गोष्टींमुळे त्यांना राग आला.
[16] त्यांनी त्याला विचारले, “ही मुले काय म्हणत आहे हे तुम्ही ऐकता ना?” येशूने त्यांना उत्तर दिले, “होय, पवित्र शास्त्रात काय लिहिले आहे ते तुम्ही ऐकले नाही का? ‘तू बालके व तान्हुली यांना स्तुती करायला शिकविले आहेस.’
[17] नंतर येशू तेथून निघाला व बेथानीला गेला. तेथे तो रात्रभर राहिला.
[18] दुसऱ्या दिवशी पहाटे तो यरूशलेमकडे पुन्हा येत असत त्याला भूक लागली.
[19] रस्त्याच्या कडेला त्याला अंजिराचे एक झाड दिसले. अंजिर खायला मिळेल या आशेने तो झाडाजळ गेला. पण झाडावर त्याला एकही अंजिर दिसले नाही. त्याला फक्त पाने होती. येशू त्या झाडाला म्हणाला, “यापुढे तुला कधीही फळ न येवो!” आणि ते झाड लगेच वाळून गेले आणि मेले.
[20] शिष्यांनी हे पाहिले, तेव्हा त्यांना फार आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, “हे अंजिराचे झाड इतक्या लवकर वाळून कसे गेले आणि मेले?”
[21] येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, जर तुम्हांला विश्वास असेल, आणि जर तुम्ही संशय धरला नाही तर मी जे अंजिराच्या झाडाबाबतीत केले तेच नव्हे तर या डोंगराला उठून समुद्रात पड असे म्हणालात तरी ते घडेल.
[22] जर तुमचा विश्वास असेल तर जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल ते तुम्हांला मिळेल.”
[23] येशू मंदिरात गेला, येशू तेथे शिक्षण देत असताना मुख्य याजक व वडीलजन येशूकडे आले. ते येशूला म्हणाले, “तुम्ही कोणत्या अधिकाराने या गोष्टी करता? हा अधिकार तुम्हांला कोणी दिला?”
[24] येशू म्हणाला, “मी सुद्धा तुम्हांला एक प्रश्न विचारतो. जर तुम्ही मला उत्तर दिले तर मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मी तुम्हाला सांगेन.
[25] तुम्ही मला सांगा, योहान लोकांना बाप्तिस्मा देत असे. तेव्हा त्याला तो देण्याचा अधिकार कोठून आला- देवाकडून की मनुष्यांकडून?” येशूच्या या प्रश्नावर ते चर्चा करू लागले. ते म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा देवाकडून होता असे म्हणावे तर येशू म्हणले, ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’
[26] पण जर तो मनुष्यांकडून होता असे आपण म्हणालो तर सर्व लोक आपल्यावर रागावतील. आपल्याला लोकांची भीति आहे. कारण योहान हा एक संदेष्टा होता असे ते सर्व जण मानतात.”
[27] म्हणून त्यांनी येशूला उत्तर दिले, “योहानाचा अधिकार कोठून होता हे आम्हांला माहीत नाही.” तेव्हा येशू म्हणाला, “मग मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मीही तुम्हांला सांगणार नाही.
[28] “याविषयी तुम्हांला काय वाटते ते मला सांगा. एका मनुष्याला दोन मुलगे होते. तो मनुष्य आपल्या पहिल्या मुलाकडे गेला आणि म्हणाला, ‘माझ्या मुला, आज तू माझ्या द्राक्षाच्या मळ्यात जा आणि काम कर.’
[29] “मुलाने उत्तर दिले, ‘मी जाणार नाही.’ परंतु नंतर त्या मुलाने जायचे ठरविले व तो गेला.
[30] “नंतर वडील आपल्या दुसऱ्या मुलाकडे गेले आणि म्हणाले, ‘माझ्या मुला, आज तू जाऊन माझ्या द्राक्षाच्या मळ्यात काम कर.’ त्या मुलाने उत्तर दिले, ‘होय बाबा, मी जातो.’ पण तो गेला नाही.
[31] “त्या दोघांपैकी कोणत्या मुलाने वडीलांची आज्ञा पाळली?” ते म्हणाले, “पहिल्या मुलाने.” येशू त्यांना म्हणाला, “मी खरे सांगतो, जकातदार व वेश्या हे वाईट लोक आहेत असे तुम्हांला वाटते, पण ते तुमच्या अगोदर स्वर्गाच्या राज्यात जातील.
[32] जीवनाचा खरा रस्ता कोणता हे तुम्हांला दाखवावे म्हणून योहान आला आणि तुम्ही योहानाला मानले नाही. जकातदार व वेश्या यांनी योहानावर विश्वास ठेवला हे तुम्ही पाहिले पण तरी देखील तुम्ही आपले मन बदलण्यास आणि योहानावर विश्वास ठेवण्यास तयार झाला नाही.
[33] “ही बोधकथा ऐका: एक मनुष्य होता, त्याचे शेत होते. त्याने आपल्या शेतात द्राक्षे लावली. शेताच्या भोवती त्याने एक भिंत बांधली आणि द्राक्षे कुस्करून रस गाळण्याकरिता खड्डा करून एक घाणा तयार केला. आणि टेहळाणी करण्यासाठी एक मनोरा (माळा) बांधला. मग त्याने आपला मळा काही शेतकऱ्यांना करायला खंडाने दिला. मग तो परत गेला.
[34] जेव्हा द्राक्षे तोडणीचा हंगाम जवळ आला, तेव्हा त्या मनुष्याने आपला वाटा आणण्याकरिता काही नोकर खंडकरी शेतकऱ्याकडे पाठविले.
[35] “परंतु शेतकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. एकाला मार दिला तर दुसऱ्या नोकराला जिवे मारले. नंतर तिसऱ्याला दगडमार करून ठार केले.
[36] मग शेतकऱ्यांकडे त्या मनुष्याने आणखी एकदा नोकर पाठविले. पहिल्यापेक्षा त्याने जास्त नोकर पाठविले पण त्या शेतकऱ्यांनी त्यांना तशीच वागणूक दिली.
[37] नंतर, त्याने त्याच्या स्वतःच्या मुलाला त्यांच्याकडे पाठविले, तो म्हणाला, ‘निश्चितच ते माझ्या मुलाचा मान राखतील.’
[38] “पण जेव्हा शेतकऱ्यांनी त्याच्या मुलाला पाहिले तेव्हा ते एकमेकास म्हणू लागले, ‘हा तर मालकाचा मुलगा आहे. तो वारस आहे. चला आपण त्याला ठार करू व त्याचे वतन घेऊ.’
[39] त्यांनी त्याला धरले व मळ्याच्या बाहेर फेकले व त्याला ठार मारले.
[40] “मग द्राक्षमळ्याचा मालक परत येईल तेव्हा या शेतकऱ्यांचे काय करील?”
[41] यहूदी मुख्य याजक आणि पुढारी म्हणाले, “तो त्या लोकांना खात्रीने मरणदंड देईल. कारण ते दुष्ट होते. नंतर तो आपला मळा दुसऱ्यास खंडाने देईल. हंगामाच्या दिवसात जे त्याच्या पिकाची वाटणी देतील, अशांना तो ते देईल.”
[42] येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही पवित्र शास्त्रात वाचले असलेच की. ‘बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे हे प्रभूने केले आणि आमच्यासाठी हे अदभुत आहे.’
[43] “म्हणून मी तुम्हांला सांगतो की, देवाचे राज्य तुमच्याकडून काढून घेण्यात येईल. देवाला आपल्या राज्यात पाहिजेत अशा गोष्टी जे लोक करतील, त्यांना ते देण्यात येईल.
[44] जो कोणी या दगडावर पडेल, त्याचे तुकडे तुकडे होतील आणि जर हा दगड एखाद्या मनुष्यावर पडेल तर त्या मनुष्याचा चक्काचूर होईल.”
[45] येशूने सांगितलेल्या या बोधकथा मुख्य याजकांनी आणि परूश्यांनी ऐकल्या. येशू त्यांच्याविषयी बोलत आहे हे त्यांनी ओळखले.
[46] त्यांना येशूला अटक करायचे होते. पण त्यांना लोकांचे भय वाटत होते, कारण लोक येशूला संदेष्टा मानीत होते.