Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 5:01

[1] त्या वेळी हेरोदाने येशूविषयी बातमी ऐकली.

[2] तेव्हा त्याने आपल्या सेवकांना म्हटले. “येशू हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे. तो मेलेल्यातून उठला आहे. त्यामुळेच तो हे चमत्कार करीत आहे.”

[3] हेरोदाने आपला भाऊ फिलिप्प याची पत्नी हेरोदिया हिच्यामुळे योहानला अटक करून तुरूंगात टाकले होते.

[4] कारण योहान त्याला सांगत होता, “तू होरोदियाला ठेवणे योग्य नाही.”

[5] हेरोद त्याला मारावयास पाहत होता, पण तो लोकांना भीत होता कारण लोकांचा असा विश्वास होता की, योहान संदेष्टा आहे.

[6] हेरोदाच्या वाढदिवशी हेरोदियाच्या मुलीने दरबारीत नाच करून हेरोदाला संतुष्ट केले.

[7] त्यामुळे त्याने शपथ वाहून ती जे काही मागेल ते देण्याचे अभिवचन तिला दिले.

[8] तिच्या आईच्या सांगण्यावरून ती म्हणाली, “मला तेथे तबकात बाप्तिस्मा करणारा योहान याचे शीर द्या.”

[9] हेरोद राजाला फार वाईट वाटले. तरी त्याने आपल्या शपथपूर्वक दिलेल्या वचनामुळे व आमंत्रित लोकांमुळे ते द्यावे अशी आज्ञा केली.

[10] आणि त्याने तुरुंगात माणसे पाठवून योहानाचे शीर तोडले.

[11] मग त्यांनी त्याचे शीर तबकात घालून त्या मुलाला आणून दिले. तिने ते आपल्या आईकडे आणले.

[12] मग त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचे प्रेत उचलून नेले व त्याला पुरले, आणि त्यांनी जाऊन जे घडले ते येशूला सांगितले.

[13] मग ते ऐकून येशू तेथून नावेत बसून निघून गेला व नंतर नावेतून उतरून माळरानावर एका निवांत व एकाकी जागी गेला. लोकांनी हे ऐकले तेव्हा ते पायी त्याच्याकडे गेले.

[14] मग तो किनाऱ्यावर आला, जेव्हा त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला. तेव्हा त्याला त्यांच्याबद्दल कळवळा वाटला. म्हणून जे आजारी होते त्यांना त्याने बरे केले.

[15] मग संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “ही माळरानावरची उजाड जागा आहे आणि भोजन वेळ होऊन गेली आहे. लोकांनी गावामध्ये जाऊन स्वतःकरिता अन्न विकत घ्यावे म्हणून त्यांना पाठवून द्या.”

[16] परंतु येशू त्यांना म्हणाला, “त्यांना जाण्याची गरज नाही. तुम्हीच त्यांना खायला द्या.”

[17] तेव्हा ते त्याला म्हणाले, “पाच भाकरी व दोन मासे याशिवाय येथे आमच्याजवळ काहीच नाही.”

[18] तो म्हणाला, “त्या इकडे आणा.”

[19] मग लोकांना गवतावर बसण्याची आज्ञा केत्यावर त्याने त्या पाच भाकरी व दोन मासे घेऊन वर आकाशकडे पाहून त्यावर आशीर्वाद मागितला. नंतर त्याने भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकास दिल्या.

[20] ते सर्व जेवून तृप्त झाले. मग त्या उरलेल्या तुकड्यांच्या त्यांनी बारा टोपल्या भरुन घेतल्या.

[21] स्त्रिया व मुले मोजली नाहीत, पुरूष मात्र पाच हजार होते.

[22] स्वतः लोकसमुदायास निरोप देईपर्यंत त्याने शिष्यांना नावेत बसून लगेच आपल्यापुढे पलीकडे जाण्यास सांगितले.

[23] लोकांना पाठवून दिल्यावर तो प्रार्थना करण्यास एकांत ठिकाणी डोगरावर गेला, रात्र झाली तेव्हा तो तेथे एकटाच होता.

[24] पण त्यावेळी नाव किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर होती व ती लाटांनी हेलकावत होती, कारण वारा समोरून वाहत होता.

[25] मग पहाटेच्या वेळी तो पाण्यावरून चालत शिष्यांकडे आला.

[26] शिष्य त्याला पाण्यावरून चालताना पाहून घाबरून गेले, त्यांना वाटले, भूतबीत आहे की काय म्हणून ते भूत, भूत असे ओरडू लागले.

[27] पण येशू लगेच त्यांना म्हणाला, काळजी करू नका. मी आहे, भीऊ नका.

[28] पेत्र म्हणाला, प्रभु जर तो तूच आहेस तर मला पाण्यावरून तुझ्याकडे यायला सांग.

[29] येशू म्हणाला, “ये.” मग पेत्र नावेतून पाण्यात उतरला व पाण्यावरून चालत येशूकडे जाऊ लागला.

[30] पण तो पाण्यावरून चालत असतानाच वारा व लाटा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला. बुडताना ओरडला, “प्रभु, मला वाचवा.”

[31] आणि लगेंच येशूने आपला हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, “अरे अल्पविश्वासू माणसा, तू संशय का धरलास?”

[32] मग ते नावेत बसल्यावर वारा थांबला.

[33] तेव्हा जे नावेत होते ते त्याला नमन करून म्हणाले, “तुम्ही खरोखर देवाचे पुत्र आहात.”

[34] नंतर ते पलीकडे गनेसरेत येथे पोहोचले.

[35] तेथील लोकांनी येशूला पाहिले व सभोवतालच्या सर्व प्रदेशात निरोप पाठविला व त्यांनी सर्व प्रकारच्या आजाऱ्यांस त्याच्याकडे आणले.

[36] आणि आम्हांला आपल्या वस्त्राच्या काठाला स्पर्श करू द्यावा, अशी विनंती केली, तेव्हा जितक्यांनी स्पर्श केला तितके बरे झाले.

मत्तय — Chapters