Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 3:09

[1] आता आपण विश्वासाने नीतिमान ठरवले गेलो आहोत म्हणून आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे देवाबरोबर शांती आहे.

[2] आपण उभे आहोत त्या कृपेतही त्याच्याद्वारे विश्वासाने आपल्याला प्रवेश मिळाला आहे व आपण देवाच्या गौरवाच्या आशेत अभिमान मिरवतो.

[3] आणि इतकेच नाही तर आपण संकटांतही अभिमान मिरवतो; कारण आपण जाणतो की संकट धीर उत्पन्न करते,

[4] आणि धीर प्रचीती व प्रचीती आशा उत्पन्न करते.

[5] आणि आशा लज्जित करीत नाही; कारण आपल्या अंतःकरणात आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे देवाची प्रीती ओतली जात आहे.

[6] कारण आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त यथाकाळी अभक्तांसाठी मरण पावला.

[7] कारण एखाद्या नीतिमान मनुष्यासाठी क्वचित कोणी मनुष्य मरेल कारण एखाद्या चांगल्या मनुष्यासाठी कदाचीत कोणी मरण्याचेही धाडस करील,

[8] पण आपण पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, ह्यात देव त्याची आपल्यावरील प्रीती प्रस्थापित करतो.

[9] मग आता आपण त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवले गेलो आहोत, तर त्याहून अधिक हे आहे की त्याच्याद्वारे आपण देवाच्या क्रोधापासून तारले जाऊ.

[10] कारण आपण वैरी होतो, तेव्हा जर आपला देवाबरोबर, त्याच्या पुत्राच्या मरणाने समेट केला गेला, तर त्याहून अधिक हे आहे की, आपला समेट केला गेल्यामुळे त्याच्या जीवनाने आपण निश्चित तारले जाऊ.

[11] इतकेच नाही, पण आता ज्याच्या द्वारे आपण समेट स्वीकारला आहे तो आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपण देवाच्या ठायी अभिमान मिरवतो.

[12] म्हणून एका मनुष्याद्वारे जगात पाप आले व पापाद्वारे मरण आले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व मनुष्यांवर मरण आले.

[13] करण नियमशास्त्रापुर्वी जगात पाप होते, पण नियमशास्त्र नसतेवेळी पाप हिशोबात येत नाही.

[14] तरी मरणाने आदामापासून मोशेपर्यंत राज्य केले; आदामाच्या उल्लंघनाच्या रूपाप्रमाणे ज्यांनी पाप केले नव्हते त्यांच्यावरही राज्य केले आणि तो तर जो पुढे येणार होता त्याचा नमुना होता.

[15] पण अपराधाची गोष्ट आहे तशी कृपादानाची नाही; कारण एकाच्या अपराधामुळे जर पुष्कळ मरण पावले, तर त्याहून अधिक हे आहे की, देवाची कृपा व येशू ख्रिस्त या एका मनुष्याच्या कृपेची देणगी पुष्कळांसाठी विपुल झाली.

[16] आणि पाप करणार्‍या एकामुळे जसा परिणाम झाला, तशी देणगीची गोष्ट नाही; कारण एका अपराधामुळे दंडाज्ञेसाठी न्याय आला, पण अनेक अपराधांमुळे निर्दोषीकरणासाठी कृपादान आले.

[17] कारण मरणाने, एका अपराधामुळे, एकाच्या द्वारे राज्य केले, तर त्याहून अधिक हे आहे की, जे कृपेची व नीतिमत्त्वाच्या देणगीची विपुलता स्वीकारतात, ते त्या एकाच्या, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील.

[18] म्हणून जसे एकाच अपराधामुळे सर्व मनुष्यांना दंडाज्ञा ठरविण्यास कारण झाले, तसे एकाच निर्दोषीकरणामुळे सर्व मनुष्यांना जीवनासाठी नीतिमान ठरविण्यास कारण झाले.

[19] कारण जसे एकाच्या आज्ञाभंगामुळे अनेक जण पापी ठरवले गेले, तसे एकाच्या आज्ञापालनामुळे अनेक जण नीतिमान ठरवले जातील.

[20] शिवाय, अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्र आत आले. पण जेथे पाप वाढले तेथे कृपा अधिक विपुल झाली.

[21] म्हणजे, जसे पापाने मरणाच्या योगे राज्य चालविले तसे कृपेने नीतिमत्त्वाच्या योगे प्राप्त होणार्‍या सार्वकालिक जीवनासाठी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे राज्य चालवावे.

रोमकरांस पत्र — Chapters