Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 2:36

[1] बंधूंनो, त्यांचे तारण व्हावे, ही माझ्या मनाची कळकळीची इच्छा व माझी त्यांच्याकरिता देवाजवळ विनंती आहे.

[2] कारण त्यांच्याविषयी मी साक्ष देतो की, त्यांना देवाविषयी ईर्ष्या आहे, पण ती ज्ञानामुळे नाही.

[3] कारण ते देवाच्या नीतिमत्त्वाविषयी अज्ञानी असता आणि स्वतःचे नीतिमत्त्व प्रस्थापित करू पाहत असता ते देवाच्या नीतिमत्त्वाला वश झाले नाहीत.

[4] कारण ख्रिस्त हा विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकाला नीतिमत्त्वासाठी नियमशास्त्राचा शेवट आहे.

[5] कारण नियमशास्त्राने प्राप्त होणार्‍या नीतिमत्त्वाविषयी मोशे लिहितो की, ‘जो मनुष्य ते आचरतो तो त्याद्वारे जगेल.’

[6] पण विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्त्व असे म्हणते की, तू आपल्या मनात म्हणू नकोस की, स्वर्गात कोण चढेल? (म्हणजे ख्रिस्ताला खाली आणण्यास)

[7] किंवा मृतलोकात कोण उतरेल? (म्हणजे ख्रिस्ताला मरण पावलेल्यांमधून वर आणण्यास)

[8] पण ते काय म्हणते? ते वचन तुझ्याजवळ, ते तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे. म्हणजे आम्ही ज्याची घोषणा करतो ते विश्वासाचे वचन हे आहे.

[9] कारण येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्यास मरण पावलेल्यांमधून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल.

[10] कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते.

[11] म्हणून शास्त्रलेख म्हणतो की, ‘जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.’

[12] यहूदी व हेल्लेणी ह्यांच्यात फरक नाही, कारण तोच प्रभू सर्वांवर असून जे त्याचा धावा करतात त्या सर्वांसाठी तो संपन्न आहे,

[13] ‘कारण जो कोणी प्रभूच्या नावाचा धावा करील त्याचे तारण होईल.’

[14] मग ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा ते कसा धावा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते कसा विश्वास ठेवतील? आणि घोषणा करणार्‍याशिवाय ते कसे ऐकतील?

[15] आणि त्यांना पाठविल्याशिवाय ते कशी घोषणा करतील? कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘जे चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगतात त्यांचे पाय किती सुंदर आहेत!’

[16] पण सर्वांनीच सुवार्तेचे आज्ञापालन केले नाही, कारण यशया म्हणतो की, ‘प्रभू, आमच्याकडून ऐकले त्यावर कोणी विश्वास ठेवला आहे?’

[17] तर मग ऐकण्यामुळे विश्वास होतो आणि ख्रिस्ताच्या वचनामुळे ऐकणे होते.

[18] पण मी म्हणतो की त्यांनी ऐकले नव्हते काय? हो, खचित ऐकले; ‘सर्व पृथ्वीवर त्यांचा आवाज आणि जगाच्या टोकापर्यंत त्यांचे शब्द पोहोचले आहेत.’

[19] पण मी म्हणतो की, इस्राएलाला कळले नव्हते काय? प्रथम मोशे म्हणतो, ‘जे राष्ट्र नाहीत त्यांच्याकडून. मी तुम्हास ईर्ष्येस चढवीन, एका निर्बुद्ध राष्ट्राकडून मी तुम्हास चेतवीन.’

[20] पण यशया फार धीट होऊन म्हणतो की, ‘ज्यांनी माझा शोध केला नाही त्यांना मी सापडलो आहे, ज्यांनी माझ्याविषयी विचारले नाही त्यांना प्राप्त झालो आहे.’

[21] पण इस्राएलाविषयी तो म्हणतो, ‘मी एका, अवमान करणार्‍या आणि उलटून बोलणार्‍या प्रजेपुढे दिवसभर माझे हात पसरले.’

रोमकरांस पत्र — Chapters