Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 2:53

[1] जो विश्वासात दुर्बळ आहे त्याचा स्वीकार करा, पण त्याच्या मतभेदाविषयी वाद करण्यास नाही.

[2] कोणी असा विश्वास ठेवतो की, आपण सर्वकाही खावे, दुसरा कोणी जो दुर्बळ आहे तो भाजीपाला खातो.

[3] जो खातो त्याने न खाणार्‍यास तुच्छ लेखू नये; आणि जो खात नाही त्याने खाणार्‍यास दोष लावू नये; कारण देवाने त्याचा स्वीकार केला आहे.

[4] दुसर्‍याच्या नोकराला दोष लावणारा तू कोण आहेस? तो आपल्या धन्यापुढे उभा राहील किंवा पडेल. हो, तो स्थिर केला जाईल; कारण धनी त्यास स्थिर करण्यास समर्थ आहे.

[5] आणि कोणी एखादा दिवस दुसर्‍या दिवसाहून अधिक मानतो; दुसरा कोणी सगळे दिवस सारखे मानतो. प्रत्येक मनुष्याने स्वतःच्या मनात पूर्ण खातरी होऊ द्यावी.

[6] जो दिवस मानतो त्याने प्रभूसाठी मानावे आणि जो खातो तोसुध्दा प्रभूसाठी खातो, कारण तो देवाचे उपकार मानतो; त्याचप्रमाणे जो खात नाही तो प्रभूसाठी खात नाही आणि देवाचे उपकार मानतो.

[7] कारण आपल्यातला कोणीही स्वतःकरता जगत नाही व कोणीही स्वतःकरता मरत नाही.

[8] कारण आपण जगलो तरी प्रभूकरता जगतो आणि आपण मरण पावलो तरी प्रभूकरता मरतो म्हणून आपण जगलो किंवा मरण पावलो तरी प्रभूचे आहोत.

[9] कारण ख्रिस्त मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला तो ह्यासाठी की, त्याने मृतांचा व जिवंतांचाही प्रभू असावे.

[10] मग तू आपल्या बंधूला दोष का लावतोस? किंवा तू आपल्या बंधूला तुच्छ का लेखतोस? कारण, आपण सगळे जण देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत.

[11] कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘प्रभू म्हणतो, मी जिवंत आहे म्हणून, प्रत्येक गुडघा मला नमन करील, आणि प्रत्येक जीभ देवाचे स्तवन करील.’

[12] तर मग आपल्यातला प्रत्येकजण देवाला आपआपला हिशोब देईल.

[13] तर आपण ह्यापुढे एकमेकांना दोष लावू नये. पण असे ठरवू की, कोणीही आपल्या बंधूच्या मार्गात अडखळण किंवा पडण्यास कारण होईल असे काही ठेवू नये.

[14] मी जाणतो व प्रभू येशूमुळे मी मानतो की, कोणतीही गोष्ट मूळची अशुद्ध नाही, पण जो कोणी कोणतीही गोष्ट अशुद्ध मानतो त्यास ती अशुद्ध आहे.

[15] पण जर तुझा बंधू तुझ्या अन्नामुळे दुःखी होतो तर तू आता प्रीतीस अनुसरून चालत नाहीस असे झाले. ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला त्याचा तुझ्या अन्नामुळे तू नाश करू नकोस.

[16] म्हणून तुम्ही जे चांगले स्वीकारले आहे त्याची निंदा होऊ देऊ नका.

[17] कारण खाणे किंवा पिणे ह्यात देवाचे राज्य नाही; पण नीतिमत्त्व, शांती व पवित्र आत्म्यातील आनंद ह्यात आहे.

[18] कारण जो ह्याप्रमाणे ख्रिस्ताची सेवा करतो तो देवाला स्वीकार्य व मनुष्यांनी स्वीकृत केलेला होतो.

[19] तर आपण ज्या गोष्टी शांतीसाठी व एकमेकांच्या उभारणीसाठी उपयोगी आहेत त्यांच्यामागे लागू या.

[20] अन्नाकरता देवाचे काम तू नष्ट करू नकोस; सर्व गोष्टी खरोखर खाण्यायोग्य आहेत; पण जो मनुष्य दुसर्‍याला अडखळण करून खातो त्यास ते वाईट आहे.

[21] मांस न खाणे किंवा द्राक्षरस न पिणे किंवा तुझ्या बंधूला ज्यामुळे अडखळण होते असे काहीही न करणे चांगले आहे.

[22] तुझ्यात विश्वास आहे, तो तू देवासमोर आपल्याजवळ बाळग. जो स्वतः पसंत केलेल्या गोष्टींत स्वतःला दोषी ठरवीत नाही तो धन्य होय.

[23] पण जो मनुष्य संशय धरतो त्याने खाल्ले तर तो दोषी ठरतो; कारण ते विश्वासाने खाल्लेले नाही कारण जे विश्वासाने केलेले नाही ते पाप आहे.

रोमकरांस पत्र — Chapters