Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 6:12

[1] परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेकडे लक्ष दिले, आणि परमेश्वराने सारेला वचन दिल्याप्रमाणे केले.

[2] अब्राहामाच्या म्हातारपणी सारा गरोदर राहिली, त्यास जी नेमलेली वेळी देवाने सांगितली होती त्या वेळी त्याच्यापासून सारेला मुलगा झाला.

[3] अब्राहामाला जो मुलगा सारेपासून झाला त्याचे नाव त्याने इसहाक ठेवले.

[4] देवाने आज्ञा केल्याप्रमाणे अब्राहामाने त्याचा मुलगा इसहाक आठ दिवसाचा झाल्यावर त्याची सुंता केली.

[5] इसहाकाचा जन्म झाला तेव्हा अब्राहाम शंभर वर्षांचा होता.

[6] सारा म्हणाली, “देवाने मला हसवले आहे; जो कोणी हे ऐकेल तो प्रत्येकजण माझ्याबरोबर हसेल.”

[7] आणखी ती असेही म्हणाली, “सारा या मुलाला स्तनपान देईल असे अब्राहामाला कोण म्हणाला असता? आणि तरीसुद्धा त्याच्या म्हातारपणात मला त्याच्यापासून मुलगा झाला आहे!”

[8] मग बालक वाढत गेला आणि त्याचे स्तनपान तोडले, आणि इसहाकाच्या स्तनपान तोडण्याच्या दिवशी अब्राहामाने मोठी मेजवानी दिली.

[9] मग साराची मिसरी दासी हागार हिचा मुलगा इश्माएल जो तिला अब्राहामापासून झाला होता, तो चेष्टा करीत आहे असे सारेने पाहिले.

[10] म्हणून सारा अब्राहामाला म्हणाली, “या दासीला व तिच्या मुलाला येथून बाहेर घालवून द्या. या दासीचा मुलगा, माझा मुलगा इसहाक याच्याबरोबर वारस होणार नाही.”

[11] त्याच्या मुलामुळे या गोष्टीचे अब्राहामाला फार दुःख झाले.

[12] परंतु देव अब्राहामाला म्हणाला, “मुलाकरता व तुझ्या दासी करता दुःखी होऊ नकोस. तुला ती या बाबतीत जे काही सांगते, ते तिचे सर्व म्हणणे ऐक. कारण इसहाकाद्वारेच तुझ्या वंशाला नाव देण्यात येईल.

[13] मी त्या दासीच्या मुलाचेही राष्ट्र करीन, कारण तो तुझा वंशज आहे.”

[14] अब्राहाम सकाळीच लवकर उठला, भाकरी व पाण्याची कातडी पिशवी घेतली आणि हागारेला देऊन तिच्या खांद्यावर ठेवली. त्याने तिचा मुलगा तिला दिला आणि तिला पाठवून दिले. ती गेली आणि बैर-शेबाच्या रानामध्ये भटकत राहिली.

[15] कातडी पिशवीतील पाणी संपले, तेव्हा हागारेने आपल्या मुलाला एका झुडपाखाली टाकले.

[16] नंतर ती बरीच दूर म्हणजे बाणाच्या टप्प्याइतकी दूर जाऊन बसली, कारण तिने म्हटले “मला माझ्या मुलाचे मरण पाहायला नको.” ती त्याच्या समोर बसून मोठमोठ्याने हंबरडा फोडून रडू लागली.

[17] देवाने मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि देवाचा दूत स्वर्गातून हागारेला हाक मारून म्हणाला, “हागारे, तुला काय झाले? भिऊ नकोस, तुझा मुलगा जेथे आहे तेथून त्याचा आवाज देवाने ऐकला आहे

[18] ऊठ, मुलाला उचलून घे. आणि त्यास धैर्य दे, मी त्याच्यापासून एक मोठे राष्ट्र करीन.”

[19] मग देवाने हागारेचे डोळे उघडले आणि तिने पाण्याची विहीर पाहिली. ती गेली आणि पाण्याची कातडी पिशवी भरून घेतली आणि मुलाला पाणी प्यायला दिले.

[20] देव त्या मुलाबरोबर होता आणि तो वाढला. तो रानात राहिला आणि तिरंदाज बनला.

[21] तो पारानाच्या रानात राहिला आणि त्याच्या आईने त्यास मिसर देशातील मुलगी पत्नी करून दिली.

[22] त्यानंतर अबीमलेख व त्याचा सेनापती पिकोल यांनी अब्राहामाशी बोलणी केली, ते म्हणाले, “तू जे काही करतोस त्यामध्ये देव तुझ्याबरोबर आहे;

[23] म्हणून आता येथे देवाची शपथ वाहा की, तू माझ्याशी व माझ्यामागे माझ्या मुलांशी किंवा माझ्या वंशजाशी खोटेपणाने वागणार नाहीस. जसा मी तुझ्याशी करार करून विश्वासूपणाने राहिलो, तसाच तू माझ्याशी व ज्या या माझ्या देशात तू राहिलास त्याच्याशी राहशील.”

[24] आणि अब्राहाम म्हणाला, “मी शपथ वाहतो.”

[25] मग अबीमलेखाच्या सेवकांनी पाण्याची विहीर बळकावली म्हणून अब्राहामाने अबीमलेखाकडे तक्रार केली.

[26] अबीमलेख म्हणाला, “असे कोणी केले आहे ते मला माहीत नाही. ह्यापूर्वी तू हे मला कधीही सांगितले नाहीस. आजपर्यंत मी हे ऐकले नव्हते.”

[27] म्हणून अब्राहामाने मेंढरे व बैल घेतले आणि अबीमलेखास दिले आणि त्या दोन मनुष्यांनी करार केला.

[28] अब्राहामाने अबीमलेखाला कळपातील सात कोकरे वेगळी करून त्यांच्यापुढे ठेवली.

[29] अबीमलेख अब्राहामाला म्हणाला, “ही सात कोकरे तू वेगळी करून ठेवली याचा अर्थ काय आहे?”

[30] त्याने उत्तर दिले, “तू ही कोकरे माझ्याकडून स्विकारशील तेव्हा ही विहीर मी खणली आहे असा तो पुरावा होईल.”

[31] तेव्हा त्याने त्या जागेला बैर-शेबा असे नाव दिले, कारण त्या ठिकाणी त्या दोघांनी शपथ वाहून वचन दिले.

[32] त्यांनी बैर-शेबा येथे करार केल्यानंतर अबीमलेख व त्याचा सेनापती पिकोल हे पलिष्ट्यांच्या देशात परत गेले.

[33] अब्राहामाने बैर-शेबा येथे एक एशेल झाड लावले. तेथे सनातन देव परमेश्वर याचे नाव घेऊन त्याने प्रार्थना केली.

[34] अब्राहाम पलिष्ट्यांच्या देशात पुष्कळ दिवस परदेशी म्हणून राहिला.

उत्पत्ति — Chapters