[1] या गोष्टी घडल्यानंतर अब्रामाला दृष्टांतात परमेश्वराचे वचन आले. तो म्हणाला, “अब्रामा, भिऊ नको. मी तुझे संरक्षण करीन आणि तुला फार मोठे प्रतिफळ देईन.”
[2] अब्राम म्हणाला, “हे प्रभू परमेश्वरा, मी अजून निपुत्रिक आहे, आणि माझ्या घराचा वारस दिमिष्क शहरातील अलिएजर हाच होईल, तेव्हा तू मला काय देणार?”
[3] अब्राम म्हणाला, “तू मला संतान दिले नाहीस म्हणून माझ्या घराचा कारभारीच माझा वारस आहे.”
[4] नंतर, पाहा, परमेश्वराचे वचन अब्रामाकडे आले. तो म्हणाला, “हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटी येईल तोच तुझा वारस होईल.”
[5] मग त्याने त्यास बाहेर आणले, आणि म्हटले, “या आकाशाकडे पाहा, तुला तारे मोजता येतील तर मोज.” तो त्यास म्हणाला, “असे तुझे संतान होईल.”
[6] त्याने परमेश्वरावर विश्वास ठेवला. आणि तो विश्वास त्याचा प्रामाणिकपणा असा मोजण्यात आला.
[7] परमेश्वर त्यास म्हणाला, “हा देश तुला वतन करून देण्याकरता खास्द्यांच्या ऊर देशातून तुला आणणारा मीच परमेश्वर आहे.”
[8] तो त्यास म्हणाला, “हे प्रभू परमेश्वरा मला हे वतन मिळेल हे मी कशावरून समजू?”
[9] तो त्यास म्हणाला, “माझ्यासाठी तीन वर्षांची एक कालवड, तीन वर्षांची एक शेळी, तीन वर्षांचा एक एडका तसेच एक होला व एक पारव्याचे पिल्लू आण.”
[10] त्याने ते सर्व त्याच्याकडे आणले आणि त्यांना चिरून त्या प्रत्येकाचे दोन दोन तुकडे केले व प्रत्येक अर्धा भाग दुसऱ्या अर्ध्या भागासमोर ठेवला. पण पक्षी त्याने चिरले नाहीत;
[11] कापलेल्या प्राण्यांचे मांस खाण्याकरिता पक्ष्यांनी त्यावर झडप घातली, परंतु अब्रामाने त्यांना हाकलून लावले.
[12] नंतर जेव्हा सूर्य मावळू लागला, तेव्हा अब्रामाला गाढ झोप लागली आणि पाहा निबिड आणि घाबरून सोडणाऱ्या काळोखाने त्यास झाकले.
[13] मग परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तुला या गोष्टी समजल्या पाहिजेत; तुझे वंशज जो देश त्यांचा नाही त्या अनोळखी देशात राहतील आणि ते तेथे गुलाम होतील आणि चारशे वर्षे त्यांचा छळ होईल.
[14] परंतु ज्याने त्यांना गुलाम बनवले त्या राष्ट्राचा मी न्याय करीन, आणि मग आपल्या बरोबर पुष्कळ धन घेऊन ते त्या देशातून निघतील.
[15] तू स्वतः फार म्हातारा होऊन शांतीने आपल्या पूर्वजांकडे जाशील आणि चांगला म्हातारा झाल्यावर तुला पुरतील.
[16] मग चार पिढ्यानंतर तुझे लोक या देशात माघारे येतील. कारण अमोरी लोकांचा अन्याय अद्याप त्याच्या मर्यादेपर्यंत पोहोचलेला नाही.”
[17] सूर्य मावळल्यानंतर गडद अंधार पडला; मारलेल्या जनावरांच्या तेथेच पडलेल्या त्या तुकड्यांमधून धुराची अग्नीज्वाला आणि अग्नीची ज्योती गेली.
[18] त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार केला. तो म्हणाला, “मिसर देशाच्या नदीपासून फरात महानदीपर्यंतचा
[19] केनी, कनिज्जी, कदमोनी,
[20] हित्ती, परिज्जी, रेफाईम,
[21] अमोरी, कनानी, गिर्गाशी व यबूसी यांचा देश मी तुझ्या संतानाला देतो.”