[1] परमेश्वर मोशेला म्हणाला,
[2] “इस्राएल लोकांस आज्ञा कर की, दीप सतत तेवत राहून प्रकाश मिळावा म्हणून जैतूनाचे हातकुटीचे शुद्ध तेल त्यांनी तुझ्याकडे घेऊन यावे.
[3] अहरोनाने दर्शनमंडपामध्ये साक्षपटासमोरील अंतरपटाबाहेर परमेश्वरासमोर संध्याकाळपासून सकाळपर्यंत दीप सतत तेवत ठेवावा; हा तुमचा पिढ्यानपिढ्या कायमचा नियम होय.
[4] त्याने परमेश्वरासमोर शुद्ध सोन्याच्या दीपवृक्षावरील दिवे सतत तेवत ठेवावे.
[5] तू मैदा घेऊन त्याच्या बारा पोळ्या भाज; एक पोळी दोन दशमांश एफाभर सपिठाची करावी.
[6] त्यांच्या दोन रांगा करून एका रांगेत सहा सहा पोव्व्या शुद्ध सोन्याच्या मेजावर परमेश्वरासमोर ठेवाव्यात.
[7] प्रत्येक रांगेवर धूप ठेव ह्यामुळे परमेश्वरास अग्नींतून केलेल्या अर्पणाचे ते प्रतीक असेल.
[8] प्रत्येक शब्बाथ दिवशी अहरोनाने त्या, परमेश्वरासमोर मांडाव्या; इस्राएल लोकांच्या वतीने हा सर्वकाळचा करार होय.
[9] ती भाकर अहरोन व त्याचे पुत्र ह्यांचा कायमचा वाटा होय; त्यांनी ती पवित्र ठिकाणी खावी; कारण कायमच्या नियमाप्रमाणे परमेश्वरास अर्पिलेल्या अर्पणांपैकी ती त्यास परमपवित्र होय.”
[10] त्याकाळी कोणा एका इस्राएली स्त्रीला मिसरी पुरुषापासून झालेला एक मुलगा होता; तो इस्राएली होता व इस्राएल लोकांप्रमाणे वागत होता. तो छावणीत एका इस्राएल मनुष्याशी भांडू लागला.
[11] तो इस्राएली स्त्रीचा मुलगा परमेश्वराच्या नांवाची निंदा करून शिव्याशाप देऊ लागला म्हणून लोकांनी त्यास मोशेकडे आणले. त्याच्या आईचे नाव शलोमीथ होते; ती दान वंशातील दिब्री ह्याची मुलगी होती;
[12] त्याच्या संबंधी परमेश्वराची आज्ञा स्पष्टपणे कळावी म्हणून त्यांनी त्यास अटकेत ठेवले.
[13] मग परमेश्वर देव मोशेला म्हणाला,
[14] “तुम्ही त्या शिव्याशाप देणाऱ्या मनुष्यास छावणीबाहेर न्या; मग जितक्यांनी ती निंदा ऐकली तितक्यांना एकत्र बोलावा; त्यांनी आपले हात त्या मनुष्याच्या डोक्यावर ठेवावे; आणि मग सर्व लोकांनी त्यास दगडमार करून मारुन टाकावे.
[15] तू इस्राएल लोकांस अवश्य सांग की, जो कोणी आपल्या देवाला शिव्याशाप देईल त्याने आपल्या पापाची शिक्षा भोगावी.
[16] जो कोणी परमेश्वराच्या नावाची निंदा करील त्यास अवश्य जिवे मारावे; सर्व मंडळीने त्यास दगडमार करावी; तो परदेशीय असो किंवा स्वदेशीय असो, त्याने परमेश्वराच्या नावाची निंदा केली तर त्यास अवश्य जिवे मारावे.
[17] जर एखादा मनुष्य दुसऱ्या मनुष्यास ठार मारील तर त्यास अवश्य जिवे मारावे.
[18] जर कोणी दुसऱ्याच्या पशूस ठार मारील तर त्याने त्याच्या बदली दुसरा पशू देऊन भरपाई करावी.
[19] जो कोणी एखाद्याला दुखापत करील त्यास उलट त्याच प्रकारची दुखापत करावी.
[20] हाड मोडल्याबद्दल हाड मोडणे, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात; ह्याप्रमाणे एखाद्याने कोणा मनुष्यास जी इजा केली असेल त्याच प्रकारची इजा त्यास केली जावी.
[21] पशूला ठार मारणाऱ्याने त्याची भरपाई करावी, पण मनुष्य हत्या करणाऱ्याला अवश्य जिवे मारावे.
[22] परदेशीयांना व स्वदेशीयांना एकच नियम लागू असावा; कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे!”
[23] मोशेने इस्राएल लोकांस ह्याप्रमाणे सांगितल्यावर त्यांनी त्या शिव्याशाप देणाऱ्या मनुष्यास छावणीबाहेर नेऊन दगडमार केला; अशाप्रकारे परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले.