Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 6:12

[1] मग अहरोनाचे, पुत्र नादाब, व अबीहू ह्यानी आपआपली धुपाटणी घेतली व त्यामध्ये अग्नी पेटवला व त्यामध्ये धुप घालून तो अशास्त्र अग्नी परमेश्वरासमोर नेला, असा अग्नी परमेश्वरासमोर नेण्याची आज्ञा नव्हती;

[2] म्हणून परमेश्वरासमोरुन अग्नी निघाला व त्याने त्यांना भस्म केले; ते परमेश्वरासमोर मरण पावले.

[3] मग मोशे अहरोनाला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ‘जे याजक माझ्याजवळ येतील. त्यांनी माझा मान राखलाच पाहिजे, मी पवित्र आहे हे त्यांना व सर्व लोकांस समजलेच पाहिजे. तेव्हा अहरोन, नादाब व अबीहू ह्यांच्या विषयी काहीही न बोलता गप्प राहिला.’”

[4] अहरोनाचा चुलता उज्जियेल ह्याला मिशाएल व एलसाफान असे दोन पुत्र होते. मोशे त्या मुलांना म्हणाला, “या पवित्रस्थानाच्या भागाकडे जा व तुमच्या बांधवांची प्रेते पवित्र स्थानासमोरून उचलून छावणीबाहेर घेऊन जा.”

[5] तेव्हा मोशेने सांगितल्याप्रमाणे मिशाएल व एलसाफान यांनी त्यांना उचलून छावणीबाहेर नेले; त्यावेळी परमेश्वराची सेवा करताना घालावयाचे विणलेले विशेष अंगरखे नादाब व अबीहू ह्यांच्या अंगात अद्याप तसेच होते.

[6] मोशेने अहरोन व त्याचे पुत्र एलाजार व इथामार यांना सांगितले, “तुम्ही तुमचे केस मोकळे सोडू नका तर ते विंचरा, आणि तुमची वस्त्रे फाडू नका! तुमचे दु:ख दाखवू नका! म्हणजे मग तुम्ही मारले जाणार नाही आणि परमेश्वराचा राग सर्व मंडळीवर भडकणार नाही; सर्व इस्राएल घराणे तुमचे बांधव आहेत; नादाब व अबीहू ह्याना परमेश्वराने अग्नीने भस्म केल्याबद्दल त्यांनी शोक करावा;

[7] पण तुम्ही दर्शनमंडपाच्या बाहेर जाऊ नये; जर बाहेर जाल तर मराल! कारण परमेश्वराच्या अभिषेकाच्या तेलाने तुमचा अभिषेक झाला आहे.” तेव्हा अहरोन, एलाजार व इथामार ह्यांनी मोशेची आज्ञा मानली.

[8] मग परमेश्वर अहरोनाला म्हणाला,

[9] “जेव्हा तू व तुझे पुत्र तुम्ही दर्शनमंडपामध्ये जाल तेव्हा तुमच्यापैकी कोणीही द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नये; प्याल तर मराल! हा तुमच्यासाठी पिढ्यानपिढया कायमचा विधि आहे.

[10] तुम्ही परमेश्वराच्या दृष्टीने पवित्र व सामान्य तसेच शुद्ध व अशुद्ध ह्यामधील भेद जाणावा;

[11] याप्रकारे परमेश्वराने मोशेद्वारे नेमून दिलेले सर्व विधीनियम अहरोनाने सर्व इस्राएल लोकांस शिकवावे.”

[12] मग मोशे अहरोनाला आणि एलाजार व इथामार या हयात असलेल्या त्याच्या मुलांना म्हणाला, परमेश्वराच्या अर्पणापैकी उरलेले अन्नार्पण घ्या व ते वेदीपाशी खमीराशिवाय खा, कारण ते परमपवित्र आहे;

[13] परमेश्वरासाठी अर्पिलेल्या अर्पणाचा तो भाग आहे आणि मी दिलेल्या विधीनियमांच्या शिकवणुकीप्रमाणे तो भाग तुझा व तुझ्या मुलांच्या हक्काचा आहे; परंतु तो तुम्ही पवित्र जागी खावा.

[14] “त्याप्रमाणे तू, तुझी मुले व तुझ्या मुली ह्यांनी, ओवाळलेला ऊर व मागचा पाय स्वच्छ ठिकाणी खावा; कारण इस्राएल लोकांनी केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञापैकी तुला तो हक्क म्हणून दिला आहे.

[15] ओवाळणीचा ऊर व समर्पणाची मांडी ही चरबीच्या हव्याबरोबर ओवाळणीचे अर्पण म्हणून लोकांनी परमेश्वरासमोर ओवाळण्यासाठी आणावी; ओवाळून झाल्यावर परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे हा भाग तुझा व तुझ्या मुलाबाळांचा कायमच्या हक्काचा आहे.”

[16] मोशेने पापार्पणाच्या बकऱ्याची बारकाईने विचारपूस केली असता तो जाळून टाकल्याचे त्यास कळाले; तेव्हा अहरोनाचे पुत्र एलाजार व इथामार ह्यांच्यावर मोशे भयंकर रागावला; तो म्हणाला,

[17] “तुम्ही पापार्पणाच्या बलीचे मांस पवित्रस्थानी खावयास पाहिजे होते; कारण ते परमपवित्र आहे! तुम्ही ते परमेश्वरासमोर का खाल्ले नाही? मंडळीचा अन्याय वाहून त्यांच्यासाठी परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे म्हणून परमेश्वराने ते तुम्हास दिले होते;

[18] त्याचे रक्त पवित्रस्थानात आणण्यात आले नव्हते; माझ्या आज्ञेप्रमाणे तुम्ही त्याचे मांस पवित्र जागी बसून अवश्य खावयाचे होते.”

[19] परंतु अहरोन मोशेला म्हणाला, “पाहा, आज त्यांनी आपले पापार्पण व होमार्पण परमेश्वरासमोर अर्पण केले, आणि तरी आज माझ्यावर कशी संकटे आली आहेत हे तू जाणतोस; तेव्हा आज मी पापबली खाल्ला असता तर परमेश्वरास ते आवडले असते, असे तुला वाटते काय? नाही ना!”

[20] मोशेने हे ऐकले, तेव्हा त्याचे समाधान झाले.

लेवीय — Chapters