[1] तू मात्र नेहमी सत्य किंवा निकोप शिक्षणाला शोभणाऱ्या अशा गोष्टी बोल.
[2] वडील माणसांनी आत्मसंयमित, आदरणीय व शहाणे असावे आणि विश्वासात, प्रीतीत व सहनशीलतेत बळकट असावे.
[3] त्याचप्रमाणे वृद्ध स्त्रिना आपल्या वागण्यात आदरणीय असण्याबाबत शिकीव. त्यां चहाडखोर नसाव्यात, तसेच त्यांना मद्यपानाची सवय नसावी व त्यांना जे चांगले तेच शिकवावे.
[4] यासाठी की, त्यांनी तरुण स्त्रियांना, त्यांच्या पतींवर प्रेम करण्यास, त्यांच्या मुलांवर प्रेम करण्यास शिकवावे.
[5] त्यांनी शहाणे व शुद्ध असण्यास, त्यांच्या घराची काळजी घेण्यास व दयाळू असण्यास, आपल्या पतींच्या अधीन असण्यास शिकवावे. यासाठी की देवाच्या संदेशाची कोणालाही निंदा करता येऊ नये.
[6] त्याचप्रमाणे, तरुण मनुष्यांनी शहाणे व्हावे यासाठी त्यांना उत्तेजन देत राहा.
[7] प्रत्येक गोष्टीत स्वतःला तू चांगल्या कामाचा कित्ता असे दाखवून दे. तुझ्या शिक्षणात शुद्धता व गंभीरता असावी.
[8] ज्यावर कोणी टीका करू शकत नाही असा चांगल्या बोलण्याचा उपयोग कर. यासाठी की, जे तुला विरोध करतात त्यांनी लज्जित व्हावे.
[9] गुलामांना, सर्व बाबतीत त्यांच्या मालकांच्या अधीन राहण्यासाठी व त्यांना संतोष देण्याविषयी व हुज्जत न घालण्याविषयी शिकीव.
[10] तसेच चोरी करु नये तर पूर्णपणे विश्वासूपणा दाखविण्यास सांग. यासाठी की, त्यांनी आपला तारणारा देव याच्या शिकवणुकीला सर्व बाबतीत सन्मान मिळवून द्यावा.
[11] कारण सर्व माणसांना देवाची तारक कृपा प्रगट झाली आहे.
[12] ती आम्हाला शिकविते की, आपण अभक्ति व ऐहिक गोष्टींची हाव यांचा नकार करावा आणि या सध्याच्या जगात आपण सुज्ञपणाने व नीतीने वागावे, व देवाप्रती आपली भक्ती प्रकट करावी.
[13] आणि आपली धन्य आशा म्हणजे आपला महान देव व आपला तारणारा येशू ख्रिस्त याच्या गौरवी प्रकट होण्याच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहावी.
[14] त्याने स्वतःला आमच्यासाठी दिले यासाठी की सर्व दुष्टतेपासून त्याने खंडणी भरून आम्हांस सोडवावे व चांगली कृत्ये करण्यासाठी आवेशी असलेले असे जे केवळ आपले लोक त्यांना स्वतःसाठी शुद्ध करावे.
[15] या गोष्टीविषयी बोध करीत राहा आणि कडक शब्दात कानउघाडणी करीत राहा आणि हे पूर्ण अधिकाराने कर. कोणीही तुला तुच्छ मानू नये.