Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 13:13

[1] पुष्कळ लोकांनी आमच्यामध्ये घडलेल्या ऐतिहासिक घटनांची नोंद करण्याचा प्रयत्न केला.

[2] त्यांनी त्याच गोष्टी लिहिल्या ज्या आम्हांला काही इतर लोकांकडून समजल्या होत्या-या लोकांनी त्या गोष्टी सुरुवातीपासून पाहिल्या होत्या आणि देवाचा संदेश लोकांना सांगून त्याची सेवा केली होती.

[3] थियफिला महाराज, सुरुवातीपासून या सगळ्या गोष्टींचा काळजीपूर्वक अभ्यास मी केला आहे, म्हणून मला असे वाटले की, या सर्व घटनांविषयी आपणांला व्यवस्थित माहिती लिहावी.

[4] हे मी यासाठी लिहित आहे की, जे काही तुम्हांला शिकविण्यात आले ते खरे आहे, हे तुम्हांला समजावे.

[5] यहूदीयाचा राजा हेरोद याच्या दिवसांत, जखऱ्या नावाचा एक याजक होता. तो अबीयाच्या याजककुळातील होता. त्याला एक पत्नी होती, ती अहरोनाच्या वंशातील कन्यांपैकी होती. तिचे नाव अलीशिबा होते.

[6] दोघेही देवाच्या दृष्टीने धार्मिक होते आणि प्रभूच्या आज्ञा व विधी पाळण्यात काटेकोर होते.

[7] परंतु त्यांना मूल नव्हते कारण अलीशिबा वांझ होती. आणि शिवाय दोघेही फार म्हातारे झाले होते.

[8] जेव्हा जखऱ्याच्या गटाची मंदिरात सेवा करण्याची वेळ आली आणि त्यावेळी तो तेथे देवाचा याजक म्हणून सेवा करीत होता,

[9] याजकांच्या प्रथेप्रमाणे मंदिरात देवापुढे धूप जाळण्यासाठी चिठ्ठ्या टाकून त्याची निवड करण्यात आली.

[10] जेव्हा धूप जाळण्याच्या वेळी सर्वजण बाहेर जमून प्रार्थना करीत होते,

[11] तेव्हा देवाच्या दूताने त्याला दर्शन दिले. देवदूत धूप जाळण्याच्या वेदीच्या उजव्या बाजूला उभा होता.

[12] जेव्हा जखऱ्याने त्याला पाहिले तेव्हा तो अस्वस्थ झाला, आणि त्याला भीति वाटली.

[13] देवदूत त्याला म्हणाला, “जखऱ्या, भिऊ नको, कारण तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे, आणि तुझी पत्नी अलीशिबा इजपासून तुला मुलगा होईल. तू त्याचे नाव योहान ठेव.

[14] तो तुला आनंद आणि सुख देईल. त्याचा जन्म होईल तेव्हा पुष्कळ लोक आनंदित होतील.

[15] देवाच्या दृष्टीने तो महान होईल. त्याने कोणतेही कडक पेय किंवा मद्य पिऊ नये. आणि तो आईच्या गर्भात असल्यापासूनच पवित्र आत्म्याने भरलेला असेल.

[16] “आणि तो पुष्कळ इस्राएल लोकांना प्रभु त्यांचा देव याच्याकडे वळविण्यास कारणीभूत ठरेल.

[17] योहान स्वतः देवापुढे चालेल, तो एलीयाप्रमाणे समर्थ होईल. एलीयाला जो आत्मा होता, तोच त्याला असेल. तो वडिलांची अंतःकरणे त्याच्या मुलांकडे वळवील. आज्ञा न मानणाऱ्यांना तो धार्मिकतेकडे नेईल. प्रभुसाठी लोकांना तयार करण्यासाठी तो या गोष्टी करील.”

[18] मग जखऱ्या देवदूताला म्हणाला, “हे खरे आहे हे मला कसे समजेल? कारण मी वृद्ध मनुष्य आहे, आणि माझी पत्नीसुद्धा वृद्ध झाली आहे.”

[19] आणि देवदूताने उत्तर दिले. तो म्हणाला, “मी गब्रीएल आहे. मी देवाच्या समक्षतेमध्ये उभा राहतो. आणि मला तुझ्याशी बोलायला व तुला ही सुवार्ता सांगायला पाठविण्यात आले आहे.

[20] पण हे लक्षात ठेव, तू मुका राहशील. हे घडेपर्यंत तुला बोलता येणार नाही. कारण माझे शब्द जे योग्य वेळी खरे ठरणार आहेत त्या माझ्या शब्दांवर तू विश्वास ठेवला नाहीस.”

[21] लोक जखऱ्याची वाट पाहत होते, आणि तो मंदिरात इतका वेळ का राहिला याचे त्यांना नवल वाटत होते.

[22] जेव्हा तो बाहेर आला तेव्हा त्याला त्यांच्याशी बोलता येईना. मग त्यांना जाणीव झाली की, मंदिरात त्याने दृष्टान्त पाहिला आहे. तो त्यांना खुणा करीत होता परंतु बोलू शकत नव्हता.

[23] मग असे झाले की, त्याच्या सेवेचा कालावधि संपल्यानंतर तो घरी गेला.

[24] काही काळानंतर त्याची पत्नी अलीशिबा गरोदर राहिली. आणि पाच महिने तिने स्वतः एकांतवास पत्करला. ती म्हणाली,

[25] “शेवटी आता प्रभुने मला या मार्गाने मदत केली आहे. लोकांमध्ये माझी लाज राखण्यासाठी त्याने माझी पुष्कळ काळजी घेतली.”

[26] -

[27] अलीशिबाच्या सहाव्या महिन्यात, देवाने गब्रीएल दूताला गालीलातील नासरेथ गावी पाठविले.योसेफ नावाच्या मनुष्याशी ज्या कुमारीची मागणी झाली होती, तिच्याकडे गब्रीएलाला पाठविण्यात आले. योसेफ हा दाविदाच्या घराण्यातील होता. तिचे नाव मरीया होते.

[28] गब्रीएल तिच्याकडे आला आणि म्हणाला, “अभिवादन! तुझ्यावर कृपा झालेली आहे. प्रभु तुझ्याबरोबर आहे.”

[29] परंतु या शब्दांनी ती अस्वस्थ झाली, आणि या अभिवादनाचा अर्थ काय असावा याचे ती नवल करु लागली.

[30] देवदूत तिला म्हणाला, “मरीये, भिऊ नकोस, देवाने तुझ्यावर कृपा केली आहे.

[31] ऐक! तू गरोदर राहशील, आणि तुला मुलगा होईल, त्याचे नाव तू येशू ठेव.

[32] तो महान होईल व त्याला सर्वोच्य देवाचा पुत्र म्हणतील. आणि प्रभु देव त्याला त्याचा पिता दावीद याचे सिंहासन देईल.

[33] याकोबाच्या घराण्यावर सर्वकाळासाठी तो सत्ता चालवील त्याच्या राज्याचा कधीही अंत होणार नाही.”

[34] तेव्हा मरीया दूताला म्हणाली, “मी कुमारी असल्याने हे असे कसे घडेल?”

[35] देवदूत तिला म्हणाला, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, आणि सर्वोच्च देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करील. आणि म्हणून जे पवित्र बाळ जन्मास येईल, त्याला देवाचा पुत्र म्हणतील.

[36] आणि याकडे लक्ष दे: तुझी नातेवाईक अलीशिबा जरी वांझ असली तरी तीसुद्धा गरोदर आहे व तिच्या पोटी पुत्र आहे. आणि ज्या स्त्रीला ते म्हणाले की तुला मूल होणार नाही तिला आता सहावा महिना आहे!

[37] कारण देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही.”

[38] मरीया म्हणाली, “मी प्रभूची दासी आहे, आपण म्हणालात तसे माझ्याबाबतीत घडो.” मग देवदूत तिला सोडून गेला.

[39] त्याच वेळी मरीया तयार झाली आणि लगेच यहूदीयाच्या डोंगराळ भागातील एका गावी गेली.

[40] तिने जखऱ्याच्या घरात प्रवेश केला आणि अलीशिबेला अभिवादन केले.

[41] आणि असे झाले की, जेव्हा अलीशिबेने मरीयेचे अभिवादन ऐकले तेव्हा तिच्या पोटातील बालकाने उडी मारली. आणि अलीशिबा पवित्र आत्म्याने भरुन गेली.

[42] ती मोठ्या आवाजात बोलली, “सर्व स्त्रियांमध्ये तू अधिक धन्य आहेस, तुझ्या पोटचे फळ धन्य आहे.

[43] परंतु माझ्या बाबतीत अशी कोणती गोष्ट घडली की माझ्या प्रभूच्या आईने माझ्याकडे यावे?

[44] कारण तुझ्या अभिवादनाचा आवाज माझ्या कानी पडताक्षणीच, माझ्या पोटातील बाळाने आनंदाने उडी घेतली.

[45] प्रभूने तुला ज्या गोष्टी घडतील असे सांगितले त्यावर तू विश्वास ठेवलास म्हणून तू धन्य आहेस.”

[46] आणि मरीया म्हणाली,

[47] “माझा आत्मा प्रभूची स्तुति करतो; माझा आत्मा माझ्या तारणाऱ्या देवामध्ये आनंद करतो.

[48] कारण त्याने त्याच्या नम्र दासीची काळजी वाहिली होय, येथून पुढे सर्व लोक मला धन्य म्हणतील.

[49] कारण सर्वसमर्थाने माझ्यासाठी महान कृत्ये केली आहेत, त्याचे नाव पवित्र आहे.

[50] जे त्याचे भय धरतात, त्यांच्यावर तो पिढ्यानपिढ्या दया करतो.

[51] त्याने आपल्या बाहूंनी आपले सामर्थ्य दाखविले; गर्विष्ठ लोकांना त्यांच्या बढाईखोर विचारांसह विखरुन टाकले आहे.

[52] सत्ताधीशांना त्याने त्यांच्या सिंहासनावरुन खाली आणले आहे, आणि नम्र जनांना त्याने उंच केले आहे.

[53] त्याने भुकेलेल्यांना उत्तम पदार्थांनी समाधान दिले आहे. श्रीमंत लोकांना त्याने रिकामे पाठविले आहे.

[54] त्याचा सेवक जो इस्राएल याला मदत करण्यास तो आला आहे.

[55] त्याने आपल्या पूर्वजांना जे अभिवचन दिले होते त्याप्रमाणे अब्राहाम व त्याच्या वंशजांवर दया करण्याचे तो लक्षात ठेवतो.”

[56] मरीया अलीशिबेबरोबर तीन महीने राहिली, आणि मग ती तिच्या घरी परत गेली.

[57] अलीशिबेला तिचे मूल होण्याची वेळ आली, तेव्हा तिने एका मुलाला जन्म दिला.

[58] तिच्या शेजाऱ्यांनी व नातेवाईकांनी ऐकले की, देवाने तिच्यावर मोठी कृपा केली आहे, ते तिच्या आनंदात सहभागी झाले.

[59] मग असे झाले की, आठव्या दिवशी मुलाची सुंता करण्यासाठी ते आले, ते, त्याच्या बापाचे जे नाव होते तेच म्हणजे जखऱ्या नाव ठेवणार होते.

[60] पण त्याची आई म्हणाली, “नाही, त्याला योहान असे म्हणावे.”

[61] ते तिला म्हणाले, “तुझ्या कोणत्याच नातेवाईकाचे नाव ते नाही.”

[62] नंतर त्यांनी त्याच्या वडिलांना खुणेने विचारले, “त्याला कोणते नाव ठेवायचे आहे?”

[63] त्याने लिहिण्यासाठी पाटी मागितली आणि लिहिले, “त्याचे नाव योहान आहे.” त्या सर्वांना खूपच आश्चर्य वाटले.

[64] लगेच त्याचे तोंड उघडले आणि त्याची जीभ मोकळी झाली, आणि तो बोलू लागला व देवाची स्तुति करु लागला.

[65] सर्व शेजारी भयभीत झाले आणि यहूदीयाच्या सर्व डोंगराळ प्रदेशात लोक या सर्व गोष्टींबद्दल बोलत होते.

[66] ज्या कोणी हे ऐकले त्या प्रत्येकाने याविषयी नवल केले, ते म्हणाले, “हे मूल पुढे कोण होणार आहे?” कारण देवाचा वरदहस्त त्यांच्यावर होता.

[67] मग त्याचा पिता जखऱ्या पवित्र आत्म्याने भरला गेला, त्याने भविष्यवाणी केली; तो म्हणाला,

[68] “प्रभु, इस्राएलाचा देव धन्यवादित असो, कारण तो त्याच्या लोकांना मदत करण्यास, व त्यांना मुक्त करण्यास आला आहे.

[69] त्याने आमच्यासाठी आपला सेवक दाविद याच्या घराण्यातून आम्हांला सामर्थ्यशाली तारणारा दिला आहे.

[70] देव म्हणाला की, मी असे करीन त्याच्या पवित्र भविष्यवाद्यांकरवी तो हे बोलला व ते फार वर्षां पूर्वी होऊन गेले.

[71] जे आमचे शत्रु आहेत व जे आमचा द्वेष करतात त्यांच्यापासून मुक्त करण्याचे अभिवचन त्याने आम्हांला दिले.

[72] आमच्या पूर्वजांवर दया दाखविण्यासाठी तो हे करणार आहे. व त्यांच्याशी केलेला पवित्र करार लक्षात ठेवण्यासाठी तो आमचे रक्षण करणार आहे.

[73] हा करार एक शपथ होती, जी त्याने आमचा पूर्वज अब्राहाम याच्याशी घेतली

[74] ती अशी की, तो आम्हांला शत्रुच्या सामर्थ्यापासून मुक्त करील, अशासाठी की, आम्ही त्याची सेवा निर्भयपणे करु शकू.

[75] त्याची अशी इच्छा होती की, आम्ही त्याच्यासमोर धार्मिकतेने व पवित्रतेने आमच्या आयुष्याचे सर्व दिवस जगावे.

[76] “मुला, आता तुला सर्वोच्च देवाचा संदेष्टा म्हणातील. प्रभूच्या येण्यासाठी लोकांना तयार करण्यासाठी तू त्याच्या (प्रभु) पुढे चालशील.

[77] कारण तू प्रभूसमोर, त्याचा मार्ग तयार करण्यासाठी आणि पापक्षमा मिळून तुमचे तारण होईल हे त्याच्या लोकांना सांगण्यासाठी पुढे जाशील.

[78] “कारण देवाच्या हळुवार करुणेमुळे स्वर्गीय दिवसाची पहाट उजाडेल व मरणाच्या दाट छायेत जे जगत आहेत त्यांच्यावर प्रकाशेल.

[79] आणि शांतीच्या मार्गावर आमच्या पावलांना मार्गदर्शन करील.”

[80] अशा रीतीने तिचा मुलगा मोठा होत गेला आणि आत्म्यात सामर्थ्यशाली झाला. इस्राएल लोकांना प्रगट होण्याच्या दिवसापर्यंत तो अरण्यात राहिला.

लूक — Chapters