Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 3:30

[1] म्हणून पवित्र बंधूनो, ज्यांना देवाने बोलाविलेले आहे, त्यांनी येशूविषयी विचार करावा. तो देवाचा प्रेषित (प्रतिनिधी) आणि आमच्या विश्वासाचा मुख्य याजक आहे.

[2] ज्या देवाने त्याला प्रेषित व मुख्य याजक म्हणून नेमले त्याच्याशी येशू विश्वासू होता, जसा देवाच्या संपूर्ण घराण्यात मोशे देवाशी विश्वासू होता.

[3] ज्याप्रमाणे घरापेक्षा घर बांधणाराला अधिक मान असतो, त्याप्रमाणे येशू हा मोशेपेक्षा अधिक सन्मानास पात्र गणला गेला.

[4] कारण प्रत्येक घर बांधणारा कोणीतरी असतो, पण देवाने सर्व काही बांधलेले आहे.

[5] देवाच्या संपूर्ण घराण्यात मोशे हा सेवक म्हणून अधिक विश्वासू होता, देव च्या गोष्टी पुढील काळात सांगणार होता, त्याविषयी त्याने लोकांना साक्ष दिली.

[6] परंतु ख्रिस्त हा पुत्र म्हणून देवाच्या घराण्यात विश्वासू आहे आणि जर आम्ही आपला विश्वास व आशा यांचा अभिमान बाळगतो व धीर धरतो, तर आपणही त्याचे घर आहोत.

[7] म्हणून, पवित्र आत्मा म्हणतो, त्याप्रमाणे, “आज, जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल,

[8] तर आपली अंतःकरणे कठीण करू नका. ज्याप्रमाणे तुम्ही अरण्यामध्ये देवाची परीक्षा पाहण्यासाठी देवाविरुद्ध बंडखोरी केली,

[9] जेथे तुमच्या वाडवडिलांनी माझी परीक्षा पाहिली व मला कसोटीस लावले, तेथे त्यांनी चाळीस वर्षे सामर्थ्यशाली कामे पाहिली.

[10] त्यामुळे मी या पिढीवर रागावलो आणि म्हणालो, ‘या लोकांच्या मनात नेहमी चुकीचे विचार येतात, या लोकांना माझे मार्ग कधीही समजले नाहीत’

[11] म्हणून रागाच्या भरात मी शपथ वाहून म्हणालो, ‘हे लोक मी देऊ केलेल्या विसाव्याच्या ठिकाणी कधीच प्रवेश करणार नाहीत.’”

[12] सावध असा, बंधूंनो, तुमच्यापैकी कोणाचीही अंतःकरणे दुष्ट व अविश्वासू असू नयेत, ती जिवंत देवापासून दूर नेतात.

[13] उलट, “आज” म्हटलेला काळ आहे तोपर्यंत, प्रत्येक दिवशी एकमेकांना उत्तेजन द्या, यासाठी की तुमच्यापैकी कोणाचीही पापामुळे फसगत होऊन तुमची अंतःकरणे कठीण होऊ नयेत.

[14] कारण आपण सर्व जण ख्रिस्तामध्ये त्याच्यावरील विश्वासाचे वाटेकरी आहोत. जर आम्ही सुरुवातीला धरलेला आमचा विश्वास शेवटपर्यंत दृढ धरून राहिलो, तर

[15] पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे: “आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तेव्हा तुम्ही देवाविरुद्ध बंड केलेत; तशी आपली अंतःकरणे कठीण करू नका.”

[16] ज्यांनी देवाची वाणी ऐकली पण त्याच्याविरुद्ध बंड केले असे कोण होते? तेच लोक नव्हते का, ज्यांना मोशेने इजिप्त देशातून बाहेर नेले होते?

[17] आणि तो (देव) कोणावर चाळीस वर्षे रागावला होता? ते सर्व तेच नव्हते काय, ज्यांनी पाप केले आणि ज्यांची प्रेते अरण्यात पडली होती.

[18] कोणाविषयी देवाने अशी शपथ वाहिली की ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करणार नाहीत? ज्यांनी त्याच्या आज्ञा मोडल्या तेच नव्हते काय?

[19] म्हणून आपण पाहतो की, ते लोक देवाच्या विसाव्याच्या ठिकाणी त्यांच्या अविश्वासामुळे येऊ शकले नाहीत.

इब्री लोकांस — Chapters