Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 2:07

[1] मग मी माझे डोळे वर करून पाहिले असता मापनसूत्र घेतलेला एक मनुष्य माझ्या दृष्टीस पडला.

[2] तेव्हा मी त्यास विचारले, “तू कोठे चाललास?” तो मला म्हणाला, “मी यरूशलेमची मोजणी करायाला, तिची लांबी-रुंदी पाहण्यास जात आहे.”

[3] मग माझ्याशी बोलत असलेला देवदूत निघून जात असता दुसरा देवदूत त्याच्याशी बोलायला गेला.

[4] दुसरा देवदूत त्या पहिल्या देवदूताला म्हणाला, “धावत जा आणि त्या तरुणाशी बोल; त्यास सांग, ‘यरूशलेमेत मनुष्यांचे व गुराढोरांचे वास्तव्य जास्त झाल्याने तटबंदी नसलेल्या गावाप्रमाणे तिच्यांत वस्ती होईल.’

[5] परमेश्वर म्हणतो, ‘मी तिच्या सभोवती अग्नीची भिंत बनेन, आणि मी तिच्यामध्ये गौरवी तेज होईन.”

[6] परमेश्वर असे म्हणतो, “त्वरा करा, उत्तरेकडील प्रदेशातून पळून जा. होय! मी तुम्हास आकाशाच्या चार वाऱ्याप्रमाणे चहूकडे पांगवले आहे.”

[7] “अहो! बाबेलकन्येसोबत राहणाऱ्यांनो, सियोनेकडे पळून स्वतःचा बचाव करा!”

[8] कारण, सेनाधीश परमेश्वराने माझे गौरव केले आणि तुम्हास लुटणाऱ्या राष्ट्रांविरूद्ध मला पाठवले आहे; जो कोणी तुला स्पर्श करतो तो देवाच्या डोळ्याच्या बुबुळाला स्पर्श करतो! परमेश्वराने हे केल्यानंतर, तो म्हणाला,

[9] “मी आपला हात त्यांच्यावर उगारीन, आणि ते त्यांच्या गुलामांसाठी लूट होतील तेव्हा तुम्हास कळेल की सेनाधीश परमेश्वराने मला पाठवले आहे.”

[10] परमेश्वर असे म्हणतो, “हे सियोनकन्ये, हर्षित होऊन गा! कारण मी स्वतः येईन व मी तुझ्यात वास्तव्य करीन.”

[11] त्यानंतर त्या दिवसात पुष्कळ राष्ट्रे परमेश्वराकडे येऊन त्यास मिळतील. तो म्हणतो, “तेव्हा तुम्ही माझी प्रजा व्हाल; कारण मी तुम्हामध्ये वस्ती करीन.” आणि मग तुला समजेल की मला तुझ्याकडे सेनाधीश परमेश्वराने पाठवले आहे.

[12] स्वत:ची पवित्र नगरी म्हणून परमेश्वर यरूशलेमची फेरनिवड करील यहूदा म्हणजे परमेश्वराच्या पवित्र भूमीचा वाटा असेल.

[13] लोकहो शांत राहा! कारण, परमेश्वर आपल्या पवित्र निवासातून येत आहे.

जखऱ्या — Chapters